यवतमाळ : उन्हाळ्याची चाहूल लागताच वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी वणवण आता जीवघेणी ठरू लागली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर वनपरिक्षेत्रात येणाऱ्या बाणगाव येथे आज, ४ मार्च रोजी सकाळी अशाच एका घटनेने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवला. पिण्याच्या पाण्याच्या शोधात असलेला एक बिबट्या थेट विहिरीत कोसळला, मात्र मृत्यूच्या दाढेतून त्याला बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले आहे.
…तर बिबट्याला जलसमाधी निश्चित होती!
बाणगाव शिवारात विक्रम राठोड या शेतकऱ्याची शेती आहे. नेहमीप्रमाणे सकाळी शेतात कामासाठी गेलेल्यांना विहिरीतून काहीतरी विचित्र आवाज ऐकू आले. डोकावून पाहिले असता, समोरचे दृश्य पाहून सर्वांचीच पाचावर धारण बसली. एक पूर्ण वाढ झालेला बिबट्या विहिरीच्या खोल पाण्यात पडला होता. आपला जीव वाचवण्यासाठी त्या बिबट्याने विहिरीतील पाईपला घट्ट पकडून ठेवले होते. तो पाईप त्याचा एकमेव आधार होता; जर पकड ढिली झाली असती, तर जलसमाधी निश्चित होती.
बिबट्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली…
बिबट्या विहिरीत पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि काही वेळातच बाणगाव शिवारात बघ्यांची मोठी गर्दी जमली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने नेर वनपरिक्षेत्र कार्यालयाला कळवण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी आणि त्यांच्या रेस्क्यू टीमने कोणतीही वेळ न घालवता घटनास्थळ गाठले.
…अखेर बिबट्या पिंजऱ्यात आला!
सुरवातीला बिबट्या घाबरलेला असल्याने तो अधिकच आक्रमक होत होता. स्थानिकांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र वनविभागाने तातडीने सुरक्षा कडे करत रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली. विहिरीत लोखंडी पिंजरा सोडण्यात आला. बिबट्याने सुरुवातीला प्रतिकार केला, पण अखेर थकलेल्या बिबट्याने पिंजऱ्यात प्रवेश केला आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर बिबट्याला पिंजऱ्यासहित विहिरी बाहेर काढण्यात आले.
जंगलातलं पाणी आटलं, बिबट्यानं गाव गाठलं
वनविभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे हा बिबट्या पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे आला असावा. रात्रीच्या अंधारात विहिरीचा अंदाज न आल्याने तो थेट पाण्यात कोसळला. सुदैवाने, पाईपचा आधार मिळाल्याने तो मृत्यूशी झुंज देऊ शकला.
वनविभागाच्या सतर्कतेमुळे आणि टीमच्या धाडसामुळे बिबट्याला सुखरूप बाहेर काढता आले. सध्या त्याची वैद्यकीय तपासणी केली जात असून, त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल, नेर वनपरिक्षेत्राच्या वन अधिकाऱ्यांनी सांगितले. या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर बाणगावच्या ग्रामस्थांनी वनविभागाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. मात्र, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच घडलेल्या या घटनेने वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
