अकोला : गवताळ प्रदेशातील ‘लेसर फ्लोरिकन’ म्हणजेच तणमोर हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अकोला जिल्ह्यातील सिसामासा परिसरात तणमोराचे वास्तव्य आढळून येते. एकेकाळी शिकार करणारा फासे पारधी समाजच आता तणमोराच्या संवर्धनासाठी सरसावला. समाजातील जाणकारांकडून पक्ष्याची माहिती ठेऊन संशोधनाकांना पुरवली जाते.

परिसरात गवताळ प्रदेश देखील राखीव ठेवण्यात आला. या उपक्रमाची केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दखल घेतली. तणमोर अत्यंत दुर्मीळ पक्षी. या पक्ष्याचा अधिवास धोक्यात आल्याने त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. तणमोराच्या संवर्धनासाठी अकोला जिल्ह्यात मात्र आश्वासक चित्र आहे. हा पक्षी अकोला जिल्ह्यात भंडवळी, कलकीडा नावाने सुद्धा ओळखला जातो.

सिसामासा येथील हिम्मतराव पवार तणमोरावर अनेक वर्षांपासून लक्ष ठेऊन आहेत. दोन्ही बाजूला राखडा, खाली व पोटात पांढरा असा अतिशय आकर्षक तणमोर पक्षी असतो. शिकारीमुळे त्यांची संख्या घटल्याचे तज्ज्ञ सांगतात. पूर्वी खाण्यासाठी तणमोराची शिकार केली जात होती, असे हिम्मतराव पवार यांनी सांगितले. ‘आययूसीएन’ या संस्थेने तणमोराचा समावेश नामशेष होण्याच्या मार्गावर असा केला आहे.

अकोला परिसरात हा पक्षी पुन्हा दर्शन देत असल्याचे या भागातील संवर्धकांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांनी त्यासाठी पुढाकार घेतला. नागपूर येथील तज्ज्ञ कौस्तुभ पांढरीपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामस्थांना मदत केली. एक ते दीड वर्ष तणमोर शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे दर्शन झाले नाही. दरम्यान, अकोला व वाशीम जिल्ह्यातील फासे पारधी समाजातील नागरिकांनी दोन, तीन वर्षांपूर्वी हा पक्षी पाहिल्याचे सांगितले.

फासे पारधी समाजाकडे तणमोराविषयी महत्त्वाची माहिती असल्याने या समुहासोबत पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काम करणे शक्य असल्याचे लक्षात आले. त्यामुळे प्रयत्न करण्यात येत आहे. फासे पारधी समाजातील संवर्धकांकडून माहिती मिळाल्यावर त्याची जीपीएस नोंद केली जाते. नागरिकांच्या मदतीने तणमोर शोधला आहे, याची नोंद करून वनविभागाला संबंधित जागेचे संवर्धन व व्यवस्थापन करण्यासाठी माहिती दिली जाते.

लोकसहभाग, वनविभाग व संस्थेच्या मदतीने अभ्यास केला जातो, असे पक्षीमित्र तथा तज्ज्ञ कौस्तुभ पांढरीपांडे यांनी सांगितले. २०१२ साली ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी यांच्यासह इतरांना तणमोर पक्षी आढळून आला होता.

तणमोरासाठी २००७ पासून गवताळ प्रदेशाचे व्यवस्थापन

परिसरातील फासे पारधी समाजातील अनेक जण तणमोरावर लक्ष ठेऊन त्याची माहिती संशोधकांना देत असतात. तणमोर दिसल्यास त्याचे वास्तव्य, पाणी पिण्यासाठी कुठे गेला, कोणत्या दिशेला तो जातो, याची माहिती ग्रामस्थांकडून ठेवण्यात येते. शिकारीसोबतच शेती व खाण कामामुळे तणमोराचा अधिवास नष्ट होत आहे. २००७ पासून परिसरातील वडाळा गावाजवळ पारधी समाजाने ११० एकर जमिनीवर गवताळ प्रदेशाचे व्यवस्थापन केले. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला, असे गावातील कुलदिप राठोड म्हणतात.

मान्सून काळात प्रजनन; आगळीवेगळी उडी

मान्सूनच्या काळात या पक्ष्यांचे प्रजनन होते. डौलदार तुरा असलेला नर तणमोर मादीला आकर्षित करण्यासाठी आगळ्यावेगळ्या ‘स्प्रींग’ लावलेल्या पद्धतीने उडी घेतो. गवताचे कोंब, धान्य आणि किटक हे तणमोरांचे अन्न. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश हा पक्षी आढळतो. परिस्थितीनुसार त्यांचे स्थलांतरणही होते.