डॉ. अरुण जाधव यांचा संशोधनाद्वारे दावा

ज्योती तिरपुडे, नागपूर</strong>

मेंदूतील ‘कॅल्शिअम बाईडिंग प्रोटिन’ची (सीबीपी) पातळी नियंत्रित करून माणसाला होणाऱ्या मेंदू आजारांच्या उपचारांवर मदत मिळू शकेल, असा विश्वास या क्षेत्रातील संशोधकांना वाटतो.

सीबीपी नामक प्रथिने  मेंदूत असतात. अशाच प्रकारची  कारलाटेनिन, पारव्होम्बुलिन, कालबान्डिंग नावाची सुमारे २५० प्रकारची सीबीपी मानवी मेंदूत आहेत. मेंदूच्या कामाला चालना देण्याचे काम ही प्रथिने करतात. त्याची कमतरता किंवा अतिरिक्त होण्याने मेंदूच्या कामावर परिणाम होत असल्याचा दावा, डॉ. अरुण जाधव यांनी संशोधनाद्वारे केला आहे. मेंदूतील पेशी मृत होण्यासाठी सीबीपीची कमतरता हे सुद्धा एक कारण आहे. पेशी मृत होण्याने मेंदूचे अनेक आजार संभवतात. यापैकी ‘ब्रेन स्ट्रोक’, ‘पार्किन्सन’, ‘अल्झायमर’ आणि इतरही आजारांवर उपाय शोधण्यासंबंधी जगभरात संशोधने सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर सीबीपीचे मेंदूतील महत्त्व अधोरेखित होते.  त्यामुळे डॉ. जाधव यांचे संशोधन मैलाचा दगड ठरणारे आहे. सीबीपीच्या संरक्षणार्थ पुढे काय प्रयत्न करता येतील, पेशी मृत पावणे कसे थांबवता येईल, यावर संशोधन होणे आवश्यक असल्याचे डॉ. अरुण जाधव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

डॉ. जाधव हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. ते जर्मनीच्या ‘हॅम्बोल्ट कॉलेग’ अभ्यासवृत्तीचे मानकरी आहेत. नोबेल पारितोषिकाचे लघुरूप अशी हॅम्बोल्ट कॉलेगकडून मिळणाऱ्या अभ्यासवृत्तीची ख्याती आहे. कुठलेही संशोधन मानवी शरीरावर पहिल्यांदा होत नसते तर उंदीर, मासे अशांवर प्रयोग केले जातात. तसे जाधव यांनी मेंदूतील कॅल्शिअम बाईंडिंग प्रोटिन संदर्भात ‘झेब्राफिश’वर अभ्यास, प्रयोग केले आहेत. मानव आणि झेब्राफिश यांच्यात ९२ ते ९६ टक्के साधर्म्य आहे. झेब्राफिशच्या मेंदूवर प्रयोग करताना सीबीपीची कमतरता किंवा अधिक मात्रा परिणामकारक असल्याचे त्यांना आढळले. त्या संशोधनासाठी त्यांना भारत सरकारचे विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि जैवतंत्रज्ञान विभागाचे अनुक्रमे २६ लाख आणि ५० लाखांचे प्रकल्प लाभले. ते प्रकल्प अलीकडेच पूर्णत्वास गेले आहेत.

मेंदूमध्ये सीबीपी असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांनी झेब्राफिशच्या मेंदूतून ‘कारलाटेनिन’ (सीबीपी) काढून टाकले. त्याच्या अभावामुळे झेब्राफिशच्या मेंदूचा विकास म्हणजेच संबंधित पेशी तयार होत नाहीत, हे त्यांच्या लक्षात आले. मेंदूचा विकास होण्यासाठी सीबीपी फार महत्त्वाची भूमिका बजावते, असे डॉ. जाधव म्हणाले.

मेंदूतील ‘कॅल्शिअम बाईंडिंग प्रोटिन’ हा फार महत्त्वाचा घटक असल्याचे माझ्या संशोधनातून पुढे आले. त्याच्या कमी-जास्त असण्याने मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. किती परिणाम होतो, कसा होतो, त्यासाठी काय केले पाहिजे, कशाप्रकारे मेंदूला कॅल्शिअम बाईंडिंग प्रोटिन देता येईल यावर भविष्यात चांगला अभ्यास होऊ शकतो. सीबीपीची पातळी नियंत्रित ठेवता आली तर मेंदूशी संबंधित पार्किन्सन, अल्झायमर, ब्रेन स्टोक यासारख्या आजारावर प्रतिबंध घालता येऊ शकतो.

– डॉ. अरुण जाधव, प्रमुख, प्राणिशास्त्र विभाग, नागपूर विद्यापीठ