लोकसत्ता टीम नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर शहर (आरटीओ)कडून शहातील विविध मार्गांवर वाहतुकीचे नियम मोडणारे, मद्य प्राशन करून वा अनियंत्रित वाहने चालवून धिंगाणा घालणाऱ्या दीड हजारांवर वाहनचालकांचे वाहन चालवण्याचे परवाने (लायसन्स) निलंबित करण्यात आले आहे. गंभीर संवर्गातील वाहतुकीशी संबंधित गुन्ह्यांसाठी वाहनचालकांचे वाहन परवाने निलंबित करण्याचे प्रावधान मोटार वाहन कायद्यात आहे. परंतु, सहसा या पद्धतीची कारवाई होत नव्हती. नागपुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर शहराकडून १ जानेवारी ते जुलै २०२४ दरम्यानच्या काळात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या शहरातील ३ हजार १०१ वाहनांवर कारवाई केली. या सगळ्यांकडून तब्बल १ कोटी ९४ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. सोबत गंभीर संवर्गातील वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या गुन्ह्यातील तब्बल १ हजार ५३० वाहन चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित केले गेले. आणखी वाचा-पैशांसाठी देहव्यापार : ‘त्या’ दाम्पत्याने गरजू विद्यार्थिनी, विवाहित महिलेला हेरले अन्… वाहतुक नियम मोडण्याचे गंभीर प्रकार कोणते? धोकादायक वाहन चालवणे, दखलपात्र गुन्ह्यात वाहनाचा वापर करणे, दारु पिवून वाहन चालविणे, ट्रॅफिक सिग्नलचे पालन न करणे, अतिभार वाहतूक करणे, हेल्मेटचा वापर न करणे, वाहन चालवतांना मोबाईलचा वापर करणे, अतिवेगाने वाहन चालविणे, अपघात प्रसंगी जखमींना मदत न करणे इत्यादी गुन्ह्यांसाठी वाहन चालकांचे वाहन चालवण्याचे परवाने निलंबित करण्याचे प्रावधान मोटार वाहन कायद्यात आहे. दहा हजार रुपये दंड वाहन चालवण्याचा परवाना निलंबित करण्यात आलेल्या वाहनचालकांना सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे. हे वाहन चालक रस्त्यावर वाहन चालवताना आढळल्यास त्यांना दहा हजार रुपये दंडाची तरतूद आहे. तसेच या वाहनचालकाचे वाहन कायमस्वरूपी रद्दही करण्याची तरतूद मोटार वाहन कायद्यात असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर शहर किरण बिडकर यांनी दिली. आणखी वाचा-वर्धा : पाणी पुनर्भरणाचा नवा अध्याय; डॉ. सचिन पावडे यांच्या उपकरणास आंतरराष्ट्रीय पेटंट… नागपूर जिल्ह्यातील अपघात बळी किती? ‘सेव्ह लाईफ’ संस्थेनुसार मागच्या वर्षी नागपूर ग्रामीणमध्ये ४४० जणांना रस्ते अपघातात मृत्यू झाला. नागपूर शहरामध्ये ३०८ मृत्यू झाले. एकूण मागच्या वर्षी ७४८ जणांचा अपघाती मृत्यू झाला. त्यात ११२ पादचाऱ्यांचा समावेश आहे. शहरातील रस्त्यांवर ७३ जीवघेण्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यात १७१ मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेने, १२१ मृत्यू वाहनाला मागून धडक झालेल्या अपघाताने, २१ मृत्यू दोन्ही वाहनांची धडक झाल्याने, १९ मृत्यू वाहनांला बाजूने धडक दिल्याने तर १९ मृत्यू हे वाहनाच्या मध्ये प्राणी आल्याने झालेल्या अपघातात झाले आहेत. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये अपघाताच्या संख्येत चार टक्के घट झाली.