वर्धा : शनिवारी रात्री विजेचा कडकडाट व मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात रात्रभर बरसलेल्या पावसाने सर्वत्र ठप्प पडले होते. याच सुमारास हिंगणघाट तालुक्यात चानकी येथे दुर्घटना घडली. कानगाव येथील बाजार आटोपून लाला सुखदेव सुरपाम ५५ व त्यांची नात नायरा साठोणे ९ हे दोघे गावी चाणकी येथे परत निघाले होते. गावाजवळ असलेल्या नाल्यावर असतांना त्यावरील पूल खचला. त्यात हे दोघेही वाहून गेलेत. याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी बचाव पथक घटनास्थळी पाठविले तीन चमू प्रयत्न करीत आहे. पण पाण्याचा प्रवाह जलद असल्याने बचावसाठी नौका टाकण्यास अडचण जात असल्याची माहिती आहे. नाल्यापासून पुढे एक किलोमीटर अंतरावर यशोदा नदीचे पात्र आहे. मग ही यशोदा नदी नंतर वर्धा नदीला मिळते. त्यामुळे शोध कार्य एक आव्हान ठरते.
हा पूल यापूर्वी पण खचला होता. मात्र त्याची डागडुजी करण्यात आल्याने गावकरी ये जा करू लागले. आता ही डागडुजी किती कुचकामी होती हे दिसून आले आहे. शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. १० जुलै पासून जवळपास रोजच वृष्टी होत आहे. परिणामी नदी, नाले, जलाशय ओसंडू लागले आहे. ग्रामीण भागात वाहतूक ठप्प पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहे. या जोरदार पावसाने निम्न वर्धा धरणाच्या पाणी साठ्यात चांगलीच वाढ झाली. या धानोडी धरणाच्या ३१ पैकी २५ द्वारातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. साठा अधिक वाढला तर धरणाचे आणखी दारे उघडून विसर्ग सुरू होण्याची शक्यता व्यक्त होते.
हेही वाचा…वर्धा : ३३ लाखांचे मोबाईल सापडले, मालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले…
हिंगणघाट तालुक्यात यशोदा नदीचे पाणी आलमडोह ग्रामपंचायती पुढे आले आहे. अल्लीपूर ते आलमडोह वाहतूक बंद पडली आहे. या अनुषंगाने तालुक्यात सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे तहसीलदार शिंदे यांनी सांगितले. स्थानिक प्रशासनास धोक्याची ठिकाणे तूर्तास बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना अश्या ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अद्याप कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही.आलमडोह ते कानगाव वाहतूक सूरू असून अन्य मार्गावर सध्या धोका नसल्याची माहिती आहे. आज सकाळ पासून काही भागात पावसाची रिपरिप सुरूच आहे. रात्री विजेच्या कडकडाट व मुसळधार पावसाने अन्य भागात नुकसान झाले अथवा नाही, याची अद्याप माहिती पुढे आली नाह