देवेंद्र गावंडे devendra.gawande@expressindia.com

स्पृश्य-अस्पृश्यता पाळू नका, महिलांना योग्य सन्मान व बरोबरीचा दर्जा द्या, उच्चवर्णीय, शोषित यांच्यातला भेदभाव समाजाच्या प्रगतीच्या हिताचा नाही. आपण सारे एक आहोत. मानव म्हणून सर्व समान आहोत, हा संदेश देत लाखो अनुयायांना सोबत घेणाऱ्या चक्रधरस्वामींच्या कार्यकाळाला आता नऊशे वर्षे  लोटली आहेत. या काळात त्यांनी स्थापलेल्या महानुभाव पंथाची प्रगतीच व्हायला हवी होती. पण झाले उलटेच. आज हा पंथ वादात अडकला आहे. वादातून विचार तर पुढे जात नसतोच पण प्रगतीही होत नाही. याचा विसर या पंथातील अनेकांना पडलेला दिसतो. वादाचे कारण आहे ‘लीळाचरित्र’ हे पुस्तक. बंदी असलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन काही दिवसांपूर्वी अगदी थाटात नागपुरात झाले. आता त्यावरून या पंथातले दोन गट समोरासमोर उभे ठाकले असले तरी यातून पंथाची बदनामीच होणार व चक्रधरांच्या प्रागतिक विचारांचा तो पराभव ठरेल, हे यातल्या अनेकांच्या गावीही नाही. हे चरित्र लिहिले वि.भि. कोलतेंनी. त्यांच्या विद्वत्तेविषयी वाद नाही पण यात त्यांनी अखेरच्या प्रकरणात घेतलेला मजकूर अश्लील आहे. इतिहास किंवा चरित्र मांडताना असा मजकूर घ्यावा का, यावर भिन्न मतप्रवाह असू शकतात. तरीही अशाप्रकारचे लेखन करताना वादाचे व पुराव्याविषयी दुमत असलेले मुद्दे टाळावेत यातच शहाणपण असते. कोलतेंनी त्या काळात ते दाखवले नाही. त्यातून न्यायालयीन लढाई सुरू झाली व त्यांना दंडही झाला. तरीही त्याच पुस्तकाचा नव्याने शब्दानुवाद करून या वादाला  तोंड फोडणे कितपत उचित समजायचे?

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
Jupiter transits in Taurus sign
वृषभ राशीत गुरुचा प्रवेश होताच निर्माण होईल कुबेर योग! ‘या’ ३ राशींच्या लोकांना मिळेल अमाप पैसा!
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार
solapur lok sabha marathi news, ram satpute latest news in marathi
सोलापूरमध्ये धर्मगुरू, मठाधीशांच्या आशीर्वादासाठी उमेदवारांचा आटापिटा

मुळात चक्रधरस्वामींचा मृत्यू उच्चवर्णीयांच्या छळामुळे झाला असे मानणारा एक मतप्रवाह या पंथात आहे. असे मत बाळगणे हाच स्वामींच्या विचाराचा पराभव ठरतो. कारण त्यांनी समाजातला हा भेद मिटावा यासाठीच प्रयत्न केले. कुणाविषयी आकस बाळगू नका, हाच यामागचा हेतू होता. तरीही इतिहासाच्या माध्यमातून या आकसाला उजाळा देणे योग्य कसे? समाजाच्या सर्वच क्षेत्रात स्त्री-पुरुष समानता हवी. अगदी ज्ञानाच्या क्षेत्रात सुद्धा, असे म्हणत स्वामींनी महिलांना व त्या काळातल्या विधवांना आदराचे स्थान दिले. महादाईसा ही मराठीतली पहिली कवयित्री त्यांच्याच विचाराने भारलेली. हे ठाऊक असूनही त्यांच्या चरित्रात स्त्रियांविषयी अश्लील मजकूर यावा असा आग्रह का धरला जात आहे? यातून स्वामींचे मोठेपण कसे अधोरेखित होईल? यातला दुसरा वादाचा मुद्दा आहे तो स्वामींच्या एका बनावट शिष्याचा. त्याच्या काळात जे लिहून ठेवले गेले त्याला कोणताही आधार नाही, असे पंथातील एका गटाचे म्हणणे. नेमके तेच चरित्रात घेतले गेले. यामुळे स्वामींची उंची कमी होते. पंथाकडे संशयाने बघितले जाऊ शकते, अशी भीती दुसऱ्या गटाला वाटत नाही. वाद निर्माण झाला की पंथ वाढतो ही समजूतच मुळात चुकीची. पण, त्याच्या आहारी गेल्याने शेकडो वर्षांपूर्वी झालेल्या या सामाजिक क्रांतीचेच नुकसान होत आहे. परंतु, यावर या पंथातले कुणीही विचार करायला तयार नाही. स्वामींनी उच्चवर्णीयांच्या पंक्तीला मागासांना बसवले. शूद्रांच्या घरी तयार केलेले पंचपक्वान जाणीवपूर्वक खाल्ले. हेतू हाच की समाजातला वर्ग, जातिभेद मिटावा. त्यामुळे त्यांच्या अनुयायांमध्ये सर्व वर्गातले लोक होते. स्वामींचे कार्यक्षेत्र तसे पश्चिम विदर्भातले. त्यांच्या या भूमिकेमुळे पूर्व विदर्भातील मागास व शोषित समाज मोठय़ा संख्येत या पंथाशी जोडला गेला. तसे बघितले तर पूर्व व पश्चिम विदर्भातील सांस्कृतिक व सामाजिक बंध वेगवेगळे. रितीरिवाजातही फरक. राजवटी सुद्धा प्रत्येकाने वेगवेगळ्या अनुभवलेल्या. त्यातूनच भाषेतही भिन्नता उद्भवलेली. पहिल्यांदा महानुभाव पंथाने या दोन्ही प्रदेशांना एकत्र जोडले. यातून तयार झालेली एकीची वीण काळानुरूप अधिक घट्ट होत जाणे अपेक्षित होते. दुर्दैवाने तसे झाले नाही.

पन्नास वर्षांपूर्वी याच पंथातल्या शोषित पीडितांनी स्वत:चा वेगळा संघ तयार केला. ही कृतीच चक्रधरांच्या विचाराला छेद देणारी होती. तरीही ती केली गेली व त्याला कोलतेंची फूस होती, असा आरोप तेव्हापासून केला जातो. अर्थात, ही वेगळी चूल मांडणाऱ्या संघाचे लोक हा आरोप नाकारतात. पण, सध्याच्या वादाला ही फूट जबाबदार आहे. पिढय़ान्पिढय़ा स्वत:ला महानुभावी म्हणून घेत आचरण केल्यावरही जातिभेदाचे विष डोक्यातून जात नसेल तर अनुयायीत्वाला काही अर्थच उरत नाही. दुसरीकडे याच पंथातले उच्चवर्णीय त्यांच्याच अनुयायी बंधूंकडे जातीच्या चष्म्यातून बघत असतील व त्यातून या फुटीची बीजे रोवली गेली असतील तर तेही वाईटच. खरे तर त्याचवेळी हा वेगळा संघ कसा पंथासाठी मारक आहे, यावर दोन्ही गटात साधकबाधक चर्चा होऊन तोडगा निघणे अपेक्षित होते. पण, दुर्दैवाने तसे झाले नाही व ही फुटीची बीजे विस्तारत गेली. आताच्या वादाला ही पार्श्वभूमी तेवढीच जबाबदार आहे. अशी पंथीय वादावर सरकार अथवा न्यायालये तोडगा काढू शकत नाही. तो याच पंथातील समंजसांना पुढाकार घेत काढावा लागेल. तसे प्रयत्न होणे दूरच राहिले पण आता या वादाला चरित्राच्या माध्यमातून फोडणी देण्याचा प्रकार सुरू झालेला.

मुळात चक्रधरस्वामींचा कार्यकाळ अनेकांनी ओवीबद्ध करून ठेवलेला. अशा स्थितीत राज्य शासनाने त्यांच्या चरित्र लेखनाचा प्रकल्प हाती घेतल्यावर पंथातील सर्वाना विश्वासात घेत एक समिती नेमून हे काम तडीस नेले असते तर वादग्रस्त चरित्राचा जन्मच झाला नसता. तेव्हा अनेकांशी तशी विनंतीही केली. पण, ती अव्हेरली गेली. शासनाने एकटय़ा कोलतेंवर विश्वास टाकला. त्यामुळे बंदीचे प्रकरण उद्भवले. आता त्याच पुस्तकातील संदर्भ जसेच्या तसे कायम ठेवत कुणा दुसऱ्याच्या नावाने प्रसिद्ध केले गेले. नव्याने वाद उभा राहिल्यावर आता हे लेखकमहोदय त्यांनी न्यायालयात जावे असा सल्ला माध्यमातून देत आहेत. म्हणजे पुन्हा वाद. यातून होणारे नुकसान हे महानुभाव पंथाचे मात्र याच्याशी कुणाला घेणेदेणे दिसत नाही. या वादामुळेच चांगले तत्त्वज्ञान असूनही आज अनेकजण या पंथाच्या वाटेला जाणे टाळतात. हे असेच होत राहिले तर एक दिवस हा पंथही आक्रसत जाईल. सध्याच्या विद्वेषाच्या कालखंडात या पंथाची खरी गरज आहे. याचे भान हा वाद उकरून काढणाऱ्यांना नसावे, हे आणखी खेदजनक.

समाजातील भेदाभेद नष्ट होण्यासाठी आवश्यक असलेले दर्जेदार लिखाण महानुभावी साहित्यात आहे. त्याचा प्रसार करावा, समाजाला जोडावे

हे खरे तर त्यातील अनुयायांचे काम. ते सोडून सारे चरित्राच्या मागे लागले आहेत. इतिहास असो वा चरित्र, त्यातल्या वाईटांकडे दुर्लक्ष करून चांगल्या गोष्टींना समाजासमोर आणणे हेच प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य ठरते. त्यात हा पंथ मागे पडला आहे. वैदर्भीय भूमीत मोठय़ा प्रमाणावर रुजलेल्या या पंथाची ही वाटचाल दु:ख देणारी आहे.