‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर शेकडो उमेदवारांना दिलासा

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(एमपीएससी) संकेतस्थळावरील तांत्रिक गोंधळामुळे शेकडो उमेदवार पूर्व परीक्षेला मुकणार असल्याच्या ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर परीक्षा शुल्कामुळे अर्ज भरू न शकलेल्या उमेदवारांसाठी पुन्हा एकदा ‘लिंक’ खुली करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून परीक्षेची संधी मिळणार आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी तब्बल दोन वर्षांनी परीक्षा घेतली जाणार असतानाही आयोगाच्या संकेतस्थळावरील तांत्रिक गोंधळामुळे शेकडो उमेदवार परीक्षेपासून मुकणार असल्याचे वृत्त लोकसत्ताने प्रकाशित केले होते. अनेक उमेदवारांनी २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीमध्ये अर्ज केला. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर यासाठी आवश्यक ते परीक्षा शुल्कही जमा करण्यात आले.  मात्र, एमपीएससीच्या संकेतस्थळावर पैसे जमाच न झाल्याचे दाखवत होते. एमपीएससीच्या संकेतस्थळावर तांत्रिक गोंधळ असल्यामुळे उमदेवारांकडून पैसे भरले गेल्यानंतरही ते जमा होत नव्हते. त्यामुळे उमेदवारांनी आयोगाशी संपर्क साधला असता ही अडचण दूर करून तुमचा अर्ज स्वीकारला जाईल असे सांगण्यात आले. मात्र २ नोव्हेंबपर्यंत उमेदवारांच्या प्रोफाईलवर पैसे जमाच झाले नाही. पैसे जमा झाल्याशिवाय अर्ज पूर्ण होत नाही. त्यामुळे चिंताग्रस्त उमेदवारांनी आयोगाशी संपर्क साधला असता तुमचे पैसे परत केले जातील, असे सांगितले जात आहे. आयोगाच्या चुकीमुळे उमेदवारांची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली नसून आता पैसे परत करण्याची भाषा केली जात असल्याने प्रचंड रोष आहे. लोकसत्ताने याबाबतचे  वृत्त प्रकाशित करताच उमेदवारांसाठी ‘लिंक’ खुली करून देण्यात आली आहे.