नागपूर : रेल्वे किंवा विमानाने प्रवास करताना दारूची बाटली सोबत बाळगता येते का, याबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम असतो. मात्र, मद्य वाहतुकीचे नियम केवळ रेल्वे किंवा विमान कंपन्यांपुरते मर्यादित नसून संबंधित राज्यांच्या उत्पादन शुल्क कायद्यांवरही ते अवलंबून असतात.

रेल्वे प्रवासात नियम कडक

भारतीय रेल्वेत मद्यपान करण्यास तसेच मद्यधुंद अवस्थेत प्रवास करण्यास मनाई आहे. मद्याची वाहतूक करण्याबाबत राज्यनिहाय नियम लागू होतात. विशेषतः एका राज्यातून दुसऱ्या राज्यात रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. एका राज्यात कायदेशीर असलेले मद्य दुसऱ्या राज्यात नेणे बेकायदा ठरू शकते. दारूबंदी असलेल्या राज्यात मद्य घेऊन प्रवेश केल्यास कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे बाटली सीलबंद असली तरी प्रवासाचा मार्ग आणि गंतव्य राज्यातील मद्यविषयक नियम तपासणे आवश्यक आहे.

विमानात पाच लिटरची मर्यादा

देशांतर्गत विमान प्रवासात २४ ते ७० टक्के अल्कोहोल प्रमाण (एबीव्ही) असलेले मद्य सीलबंद अवस्थेत चेक-इन बॅगेजमधून कमाल पाच लिटरपर्यंत नेता येते. त्यासाठी बाटली सुरक्षितरीत्या पॅक केलेली असणे आवश्यक आहे. उघडलेल्या किंवा अर्धवट वापरलेल्या बाटल्यांना परवानगी नसते. मात्र, चेक-इन बॅगेज आणि हँड बॅगेजचे नियम वेगवेगळे आहेत. विमानतळ सुरक्षा नियमांनुसार केबिन बॅगेजमध्ये द्रवपदार्थाच्या प्रमाणावर मर्यादा असल्याने प्रवाशांनी संबंधित विमान कंपनीचे नियम तपासणे आवश्यक आहे.

राज्यांचे कायदे महत्त्वाचे

विमान कंपनीने मद्य वाहतुकीस परवानगी दिली असली, तरी गंतव्य राज्यातील कायदे त्यापेक्षा कठोर असू शकतात. गुजरात आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये मद्यबंदी अथवा कठोर निर्बंध असल्याने तेथे मद्य घेऊन पोहोचल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे विमान प्रवासातही संबंधित राज्याच्या कायद्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

समस्तीपूरमध्ये कारवाई

दरम्यान, बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात दिल्ली-जयनगर स्वातंत्र्यसैनिक एक्स्प्रेसमधून ब्रँडेड विदेशी मद्याची कथित तस्करी केल्याप्रकरणी २५ वर्षीय पदवीधर महिलेला अटक करण्यात आली. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) तपासणीदरम्यान तिच्या सामानातून सुमारे १.५ लाख रुपयांचे मद्य जप्त केल्याचे सांगण्यात आले. संबंधित महिला एका नातेवाइकासह प्रथम श्रेणी वातानुकूलित डब्यातून प्रवास करीत होती. दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती आहे.

यासंदर्भात नागपूर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे ठाणेदार गौरव म्हणाले, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मद्य बाळगण्यास प्रतिबंध आहे. राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाकडून मद्य वाहतुकीचा परवाना मिळालेला असला, तरी रेल्वेतून मद्याची वाहतूक करता येत नाही. मात्र, लष्करी अधिकाऱ्यांना प्राप्त असलेल्या परवान्यानुसार रेल्वेतून मर्यादित प्रमाणात मद्य वाहतूक करता येऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ‘बाटली सीलबंद आहे, त्यामुळे कोणतीही अडचण नाही’ असा समज करून न घेता, प्रवासापूर्वी संबंधित राज्यांतील मद्यविषयक नियम आणि वाहतूक व्यवस्थेच्या अटी तपासणे आवश्यक आहे.