नागपूर : थोर साहित्यिक, किल्ले अभ्यासक गो.नी. दांडेकर (गोनीदा) यांनी तरुणपणात भरपूर भ्रमंती केली. त्यातून आलेल्या अनुभवातून ते समृद्ध होत गेले. बहुरंगी, बहुढंगी असे व्यक्तिमत्त्व लाभलेल्या गोनीदांचा किल्ल्यांचा तपशीलवार अभ्यास होता. शिवाजी महाराजांचे भक्त असलेले गोनीदा किल्ल्यांचा ज्ञानकोश होते, किल्ल्यांच्या कुशीतले ते किल्लेदार होते. पण विदर्भातील साहित्य क्षेत्र गोनीदांना विसरले, अशी खंत शिवकथाकार विजयराव देशमुख उपाख्य सद्गुरूदास महाराज यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ निर्मित दुर्ग तपस्वी गोपाळ नीलकंळ दांडेकर यांच्या ध्यासपूर्ण दुर्ग भ्रमंतीच्या मनस्वी जीवन पटावर आधारित माहितीपट ‘किल्ले पाहिलेला माणूस’चे सादरीकरण करण्यात आले. कविकुलगुरू कालिदास सभागृहात शनिवारी झालेल्या या कार्यक्रमाला सद्गुरुदास महाराज, राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे व पर्सिस्टंट कंपनीचे समीर बेंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी देशमुख यांनी गोनीदांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. विदर्भाच्या मातीत जन्मलेल्या या साहित्य क्षेत्रातील हिऱ्याचे विदर्भाने स्मरण केले नाही, त्यांना मानाचा फेटा बांधला नाही. शंभूराजांच्या जन्मतिथी दिवशी गिर्यारोहण संघाने त्यांचे स्मरण केल्याबद्दल महाराजांनी आनंद व्यक्त केला. गोनीदांना जिजामाता गौरव पुरस्कार देऊन आम्ही त्यांचा सन्मान केला होता. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्ही सुखावलो होतो, अशी आठवणीही महाराजांनी सांगितली.

राहुल पांडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज येथील माणसांसाठी, किल्ल्यासाठी कसे जगले, हे गोनीदांनी जगासमोर आणले होते. पायाला भिंगरी लावून गोनीदांनी गडकिल्ल्यांवर भ्रमंती केली होती. आज त्याच किल्ल्यांची स्थिती वाईट असून तेथे रेव्ह पार्टी, इव्हेंट होत आहेत. आपली शक्तीस्थळे, प्रेरणा स्थळे असलेल्या या किल्ल्यांना आपण विसरलो आहोत. ती आपली तीर्थक्षेत्रे असून त्यांचे जतन करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. यावेळी सचिन कोलारकर यांनी नागपूर जिल्हा गिर्यारोहक संघाबद्दल माहिती दिली. संचालन राहुल हरदास यांनी केले तर कल्याणी देशपांडे यांनी आभार मानले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Literary field siva storyteller vijayrao deshmukh grief experience ysh
First published on: 17-05-2022 at 00:02 IST