scorecardresearch

दिले पांचाभूती परत करणे ते निज ऋण !

नरेंद्र लांजेवार यांच्या शेवटच्या पत्राने समाजमन गहिवरले

नरेंद्र लांजेवार यांच्या शेवटच्या पत्राने समाजमन गहिवरले

नागपूर : मृत्यू ही संकल्पना म्हणजे केवळ शरीराचा अंत नव्हे. मृत्यू शब्दाच्या साहचर्याने येणाऱ्या अनेक प्रतिमा अशा असतात, ज्या तिमिरातूनी तेजाकडे जाण्याची दृष्टी देतात, विरक्तीच्या फुलपाखरातून आसक्तीच्या सृजनाची नांदी ऐकवतात. अर्थात अशी नांदी सगळय़ांनाच ऐकायला येते, असे नाही. साहित्यिक नरेंद्र लांजेवार यांच्यासारखे मोजकेच अपवाद असतात जे देहाच्या पल्याड आयुष्य पाहत असतात. आपण अतिशय आर्ततेने मृत्यूकडे झेपावतोय, हे लक्षात येताच लांजेवारांनी खूप आतल्या ओढीने मुलाला एक पत्र लिहिले. हे पत्र जसे जन्म-मृत्यूमधल्या असंख्य भावभावनांचे विभ्रम दाखवते तसेच समाजाने जे दिले त्याच्या परतफेडीचा आदर्शपाठही शिकवते.

ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र लांजेवार यांचा मृत्यू १३ फेब्रुवारीला बुलढाणा येथे झाला. तब्बल तीन ते चार महिने असाध्य आजाराशी त्यांनी कडवी झुंज दिली. मात्र, त्यांना जणू मृत्यूची चाहूल लागली होती. म्हणूनच की काय, त्यांनी २० जानेवारीलाच मुलगा मकरंदला एक पत्र लिहिले.

त्यासाठी त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपचा आधार घेतला. या आजारपणात मी चुकून कोमात गेलो तर उपचार करत बसू नका. याउलट जे जे अपयव दान करता येतील ते करा, त्वरित प्रक्रियेला लागा. औरंगाबाद किंवा अकोल्यातील वैद्यकीय महाविद्याालयाला देहदान करा. मृत्यूनंतरच्या धार्मिक विधीला पूर्णपणे फाटा द्या. अवयवदान, देहदानात अडचणी आल्या तर सरळ अग्नी द्या, पण तिरडी, टिटवे नकोतच. थेट स्ट्रेचरवर मृतदेह न्या, असे त्यांनी या पत्रात बजावले आहे. लांजेवारांचे हे हृयस्पर्शी पत्र इथेच संपत नाही.

ते म्हणतात, माझ्या मृतदेहाला खांदा देण्याचा मान मित्रवर्य डॉ. गणेश गायकवाड, रवीकिरण टाकळकर, शाहिना पठाण, सुजाता कुल्ली, मनजीत सिंग, विनोद देशमुख, अरिवद िशगाडे, डी.डी. देशमुख व मुलगा मकरंद, मुलगी मैत्री यांना द्या. देहदान झाले नाही आणि चिताग्नी द्यावा लागला तर राख नदी, नाल्यात टाकून प्रदूषित करू नका. सरळ सालईबनात न्या आणि याच राखेत पाच झाडे लावा. वड, िपपळ, उंबर घरूनच घेऊन जा. एक बेल व एक कडूिलब किंवा कदंब लावा. ही पाच झाडे म्हणजेच माझी जीवनसमाधी समजा. पर्यावरणाचा ध्यास घेत एका साहित्यिकाने त्याची अखेर करावी, यापेक्षा आणखी काय हवे? त्यांच्या पश्चात मिळणाऱ्या पैशाची देखील त्यांनी तरतूद करून ठेवली. तो कसा आणि कुठे खर्च करायचा तसेच मुलांनी त्यांच्या विवाहावर खर्च न करता आदर्श विवाहाची इच्छा त्यांनी या पत्रात व्यक्त केली आहे. साहित्य, कला, संस्कृती, वाचन प्रेरणा, समाजप्रबोधन, पर्यावरण रक्षण, लेखन, सामाजिक बांधीलकी या क्षेत्रात माझ्या मुलांनी काम करावे, अशी माझी अपेक्षा आहे. मला चांगला बाबा म्हणून तुमच्यासाठी खूप काही करता आले नाही, याची खंत असली तरी तुम्ही काय करता, हे पाहणारे हजार डोळे नेहमी तुमच्याकडे राहतील एवढे काम मी निश्चितच करून ठेवले आहे. त्यामुळे नरेंद्र लांजेवार यांची मुलं वाईट निघाली, असे बोट दाखवण्याची कोणाला संधी देऊ नका, असे भावनिक आवाहनही नरेंद्र लांजेवार यांनी या पत्रात केले आहे.

श्राद्ध नको, कवीसंमेलन घ्या

श्राद्धाच्या भानगडीत न पडता जयंती किंवा पुण्यतिथीला कवीसंमेलन घ्या. राहते घर शक्यतोवर २५-३० वर्षे विकू नका. खरा साहित्यिक काय असतो आणि वाचनाची आवड असेल तर पुस्तके विकत घेऊनच किंवा ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे जाऊनच वाचायला हवी, या मताचे ते होते. म्हणूनच या पत्रातही त्यांनी शक्य ती पुस्तके पुनप्र्रकाशित करावी. फुकट कुणाला वाचायला न देता घरातील किंवा शाळेतील सर्व पुस्तके कपाटात मांडणी करून येथेच वाचकांना उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी सुचवले आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Literary narendra lanjewar last letter to son makrand zws

ताज्या बातम्या