scorecardresearch

चंद्रपूर : शेतीच्या कुंपणात सोडलेला जिवंत वीज प्रवाह ठरतोय वाघांसाठी कर्दनकाळ! यावर्षी चार वाघांचा मृत्यू

वाघ तथा इतर वन्यप्राण्यांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने, तसेच मनुष्य व वन्यजीव संघर्ष वाढल्याने गेल्या काही वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून वाघाच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

tigers
ताडोबातील गावांच्या स्थलांतरणामुळे वन्यप्राण्यांची संख्या वाढली (संग्रहित छायाचित्र)

चंद्रपूर : सन २०२३ मध्ये अवघ्या ३८ दिवसांत ४ वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यात भद्रावती व पोंभूर्णा या दोन तालुक्यांत शेतकऱ्यांनी सोडलेल्या जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होवून दोन पूर्णवाढ झालेल्या वाघांचा मृत्यू झाला आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, तसेच या जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वन विभाग, चंद्रपूर वन विभाग तथा मध्य चांदा वन विभागात वाघांची संख्या वाढली आहे. या जिल्ह्यातील जंगल वाघांसाठी पोषक असल्याने वाघांचा जन्मदर येथे अधिक आहे. परंतु, वाघ तथा इतर वन्यप्राण्यांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने, तसेच मनुष्य व वन्यजीव संघर्ष वाढल्याने गेल्या काही वर्षांत या जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून वाघाच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

हेही वाचा – वर्धेतील मराठी साहित्य संमेलनासाठी आमदार निधीतून अपेक्षित ५० लाख रुपयांच्या निधीचे काय?

वर्षभरापूर्वी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात अशाच पद्धतीने विषप्रयोग करून वाघाची व त्याच्या पिल्लांची शिकार करण्यात आली होती. तर यावर्षी १५ जानेवारी रोजी भद्रावती तालुक्यात शेतकऱ्याने शेतीच्या कुंपनात सोडलेल्या जिवंत विद्युत प्रवाहाला स्पर्श होवून सहा वर्षीय वाघिणीचा मृत्यू झाला होता. शेतकऱ्याने वीज प्रवाह सोडल्यामुळेच या वाघिणीचा मृत्यू झाला होता. आता पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातील नांदगाव येथेही अशाच प्रकारे जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होवून वाघाचा मृत्यू झाला. अवघ्या ३८ दिवसांत दोन वाघ विद्युत प्रवाहाने मृत्यू झाल्याने वन विभागाला संरक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.

हेही वाचा – अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख मुंबईबाहेर जाऊ शकणार

पोंभूर्णाच्या घटनेत तर शेतकऱ्याने वाघाचा मृतदेह तणसाच्या खाली लपवून ठेवला. या प्रकरणात शेतकरी मारोती नहागमकर याला वन खात्याने अटक केली आहे. तर ३ जानेवारी रोजी ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंढकी येथे विहीरीत पडून वाघाचा मृत्यू झाला, तर ४ जानेवारी रोजी सावली तालुक्यात वाघाला जेरबंद करण्यात आले होते. हा वाघ जखमी झाला, त्याला गोरेवाडा प्रकल्पात ठेवण्यात आले होते. तिथे १४ जानेवारी रोजी वाघाचा मृत्यू झाला.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यात व्याघ्र संरक्षणाकडे तथा जनजागृतीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्याचाच परिणाम अशा घटना सातत्याने घडत आहेत. तेव्हा वाघांचे मृत्यू बघता वन विभागाला व्याघ्र संरक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 17:44 IST
ताज्या बातम्या