अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगर पालिका व नगर पंचायतींच्या निवडणुकीत बदलेल्या राजकीय समीकरणानंतर आपआपले गड कायम राखण्याचे मोठे आव्हान पक्षांपुढे राहणार आहे. सर्वांचा डोळा थेट नगराध्यक्ष पदांवर आहे. पदांसाठी आरक्षण निश्चित झाले असून इच्छुकांची सर्वच पक्षांत गर्दी आहे. त्यामुळे उमेदवार निवडीची कसरत वरिष्ठ नेतृत्वाला करावी लागेल. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत उमेदवार व युती-आघाडीचा निर्णय गुलदस्त्यात राहण्याची चिन्हे आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा अखेर मुहूर्त निघाला आहे. नगर पालिका व नगर पंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला. राजकीय पक्षांसह इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला जोर आला आहे. पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्यात अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर नगर पालिका आणि हिवरखेड व बार्शीटाकळी नगर पंचायतसाठी निवडणूक होत आहे.

वाशीम जिल्ह्यातील वाशीम, रिसोड, कारंजा, मंगरुळपीर नगर पालिका आणि मालेगाव नगर पंचायतीची रणधुमाळी सुरू झाली. या नगर पालिकांचा कार्यकाळ संपून चार वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर या निवडणुका होत आहेत. गेल्या निवडणुकीप्रमाणेच नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाईल. हे पद आपल्याकडे ठेवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये ओढाताण सुरू असल्याचे चित्र आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा आणि मूर्तिजापूर नगर पालिकेवर भाजपचा झेंडा होता, तर बाळापूर आणि पातूर नगर पालिका काँग्रेसच्या ताब्यात होती. हिवरखेड व बार्शीटाकळी नगर पंचायतीची प्रथमच निवडणूक होत आहे. आता नगर पालिकांचे गड कायम राखण्यासाठी राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत.

जिल्ह्यातील सर्वच नगर पालिकांवर झेंडा फडकवण्याचे भाजपचे प्रयत्न दिसून येतात. पक्षाने जबाबदारी निश्चित करून उमेदवाराची चाचपणी सुरू केली. पूर्वीच्या तीन नगर पालिका कायम राखण्याचे देखील भाजपपुढे मोठे आव्हान राहील. काँग्रेसने बाळापूरसह इतर चार नगर पालिका व दोन नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदासाठी नियोजन सुरू केले. पातूरची निवडणूक प्रक्रियानंतरच होणार आहे. नगर पालिका व नगर पंचायतींमध्ये वर्चस्व निर्माण करण्याचे वंचितचे देखील प्रयत्न आहेत. शिवसेना व राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. नगराध्यक्ष पदांसाठी तुल्यबळ लढतीचे संकेत आहेत.

वाशीम जिल्ह्यात चारपैकी दोन नगर पालिकांवर वंचितकडे नगराध्यक्षपद होते. वाशीम शिवसेना, मालेगाव नगर पालिका राष्ट्रवादी व रिसोड नगर पालिकेवर माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या जनविकास आघाडीचा झेंडा होता. आता शिवसेना व राष्ट्रवादी विभागली आहे. दोन्ही गटांकडून नगराध्यक्ष पदावर दावा असेल. अनंतराव देशमुख भाजपमध्ये गेल्याने रिसोडमध्ये भाजप व काँग्रेसमध्ये लढतीची शक्यता आहे. महायुती व महाविकास आघाडी अस्तित्वात येणार की स्वबळावर निवडणुका लढल्या जाणार यावर बहुतांश समीकरण अवलंबून राहणार आहे.

नगराध्यक्ष पदांसाठी आरक्षण काय?

अकोला जिल्ह्यातील अकोट, बाळापूर नगर पालिका व हिवरखेड नगर पंचायतचे नगराध्यक्षपद नामाप्र महिलेसाठी, तेल्हारा नगर पालिका अनुसूचित जाती महिला, बार्शीटाकळी नगर पंचायत सर्वसाधारण महिला, मूर्तिजापूर व पातूर नगर पालिकेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. वाशीम जिल्ह्यातील वाशीम, मंगरुळपीर नगर पालिका व मालेगाव नगर पंचायतीचे नगराध्यक्षपद नामाप्र, तर कारंजा सर्वसाधारण महिला, रिसोड सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे.