देवेंद्र गावंडे

गुन्हेगारी हे शास्त्र आहे व त्याचे रितसर शिक्षण घेऊनच या विश्वाकडे वळावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर बेधडक नागपूर विद्यापीठात प्रवेश घ्या. हे शास्त्र शिकवणारी कोणतीही विद्याशाखा येथे नाही हे खरे असले व तुम्ही येथील कोणत्याही शाखेत प्रवेश घेतला तरी केवळ अनुभवाने तुम्हाला गुन्हेगारीचे शिक्षण घेता येईल. आजवर हे शिक्षण घेण्यासाठी एखादा कुख्यात गुंड अथवा सराईत पांढरपेशा गुन्हेगाराच्या हाताखाली तालीम घ्यावी लागायची. यात जोखीम होती. विद्यापीठाच्या परिसरात ती अजिबात नाही. येथे दररोज आले, गुन्हे करण्यात तरबेज असलेल्यांना नुसते न्याहाळले, प्रसंगी त्यांचे बारकाईने निरीक्षण केले तरी तुम्ही या शास्त्रात पारंगत होऊ शकता. शेवटी कोणत्याही पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवावर आधारित शिक्षण केव्हाही फायद्याचे ठरते. त्यामुळे या विश्वाकडे वळण्यासाठी अपराधजन्य वेबसिरीज बघण्याची सुद्धा आवश्यकता नाही. येथे गुन्हा कसा घडवून आणावा एवढेच शिकवले जात नाही तर त्यातून सहीसलामत बाहेर कसे पडावे? गुन्ह्यात अडकलेल्याला मदत कशी करावी? त्यासाठी चौकशी समित्यांचा फार्स कसा उभा करायचा? पोलिसांकडे प्रकरण जाणार नाही याची काळजी कशी घ्यायची? गुन्हेगारांमध्ये सुद्धा आपला व परका कसा ओळखायचा? या सर्व प्रश्नांची उत्तरे केवळ अनुभवातून मिळतील अशी सोय या विद्यापीठात आहे.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई

एकदा का तुम्ही जवळून हा अनुभव घेतला की सध्या चलती असलेल्या या विश्वात घट्ट पाय रोवून उभे राहण्यासाठी तुम्ही मोकळे. येथे घडणाऱ्या गुन्ह्यांचे स्वरूपही वेगवेगळे. त्यामुळे याचे शिक्षण घेताना तुमच्या आकलनाचा पट सुद्धा विस्तारेल याची हमी या परिसरात पाय ठेवल्याबरोबर मिळते. ताजेच उदाहरण घ्यायचे झाले तर सध्या गाजत असलेल्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाचे. प्राध्यापक, विभागप्रमुखांना बदनामीचा धाक दाखवून खंडणी कशी उकळायची याचा आदर्श वस्तुपाठच यातून एकाने घालून दिला. हे महाशय पत्रकार घडवणारे. नागपूरच्या माध्यम विश्वाची एवढी दुरवस्था का झाली याचे उत्तर या व्यक्तीच्या गुन्हेगारी कृत्यातून सहज मिळते. कधी विद्यार्थ्यांना फसव तर कधी प्राध्यापकांना. हेच धंदे हा माणूस आजवर बेमालूमपणे करत राहिला. तक्रारी, चौकशी समित्यांमधून निर्दोष सुटत राहिला. त्यातून त्याच्यात एकप्रकारचे निलाजरेपण आलेले. त्यामुळे यावेळी त्याची हिंमत वाढली. आता तर त्याने मतदान केंद्रावर चारचौघात एका महिलेच्या हातून थोबाड रंगवून घेतले. तरीही त्याच्यात बदल होण्याची सूतराम शक्यता नाही. कारण एकच. तो सत्तावर्तुळाच्या जवळचा. त्यामुळे यावेळीही तो सहीसलामत सुटणार हे ठरलेले. सारे पुरावे असून निर्दोष सुटायचे कसे हे गुन्हेगारी विश्वात सुद्धा शिकायला मिळत नाही. त्याकरिता प्रात्यक्षिकासह असे शिक्षण महत्त्वाचे. गुन्हा करूनही आपण निरपराध आहोत हे भासवण्यासाठी मोठे कसब अंगी असावे लागते. भल्याभल्यांना ते जमत नाही. या महाशयाने तेही साधलेले. आता तुम्हीच सांगा असे शिक्षण मिळते का दुसऱ्या कुठल्या विद्यापीठात? ‘कर नाही त्याला डर कशाला?’ अशी एक म्हण मराठीत आहे. येथे काही केले नाही तर घाबरणारे प्राध्यापक आहेत. त्यामुळे येथून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर घाबरवायचे कोणत्या वर्गाला? सहज पैसे देऊ शकतात अशी जमात कोणती? याचाही अनुभव तुमच्या गाठीशी असेल. परिणामी गुन्हे करणे तुलनेने सोपे होईल. आचार्य पदवी विनासायास व अभ्यास न करता कशी मिळवायची? त्यासाठी विषयानुरूप कसे व किती पैसे मोजायचे? याचीही उत्तरे येथे शिक्षण घेताना मिळतात. अगदी पत्रकारांकडून सुद्धा यासाठी पैसे कसे उकळायचे हेही येथे अनुभवाने शिकता येते. त्यामुळे येथून बाहेर पडल्यावर हे असले धंदे करायला तुम्ही मोकळे.

आर्थिक गैरव्यवहार एवढेच या विद्यापीठाचे वैशिष्ट्य नाही. आचार्य पदवी मिळावी म्हणून मदतीची अपेक्षा ठेवणाऱ्या विद्यार्थिनींचा छळ करणे, त्यांच्याकडून पैसे उकळणे, त्यांनी तक्रार केलीच तर त्यांना पदवीपासून वंचित कसे ठेवता येईल यासाठी डावपेच आखणे हा प्रकार सुद्धा तुम्हाला येथे वारंवार अनुभवायला मिळतो. गुन्हेगारी जगतात वावरताना याचा फायदाच होतो. शत्रू पक्षाला, पोलिसांना जेरीस आणण्यासाठी हेच डावपेच थोड्याफार फरकाने कामी येत असतात. विनानिविदा कामे कशी द्यायची? त्यावरून आरोप झाले तरी शांतपणे कसे वावरायचे? चौकशी कशी मॅनेज करायची? याही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येथे वावरताना आपसूकच सापडतात. आता काहीजण म्हणतील की अशी कृत्ये गुन्हेगारी स्वरूपाची थोडीच आहेत? हो, यात तथ्य आहे पण काळानुसार गुन्ह्यांचे स्वरूपही बदलत चाललेले. गैरव्यवहार व गुन्हा यातली सीमारेषा कधीचीच धूसर झालेली हेही लक्षात घ्यायला हवे. सहकारी महिलेचा छळ कसा करावा? तो करताना कसलाही पुरावा मागे राहणार नाही याची काळजी कशी घ्यावी? गैरकृत्याचे चित्रीकरण होणार नाही यासाठी कॅमेरे कोणत्या कोनात वळवावे? ते काढून टाकण्यासाठी काय करावे? याचीही उत्तरे येथे शिकताना सहज मिळतील. या बाबतीत तर या विद्यापीठाचा लौकिक फार प्राचीन. अगदी काही वर्षांपूर्वी असे एक प्रकरण घडले. चौकशी झाली. संबंधित प्राध्यापक निर्दोष सुटले, नंतर यथावकाश निवृत्त झाले. आज तेच महाशय नैतिकतेच्या गप्पा मारतात व सत्तावर्तुळात सक्रियपणे वावरतात. गुन्हा करून असे संतासारखे राहायला शिकणे सोपे नसते. त्यामुळे असे ‘आदर्श’ अभ्यासायचे असेल तर याच्याएवढी दुसरी चांगली जागा नाही. निवडणुकीतील गैरव्यवहार हे देशासाठी नवे नाही. त्यामुळे त्यात हे विद्यापीठ कसे मागे असेल? विरोधकांचे अर्ज बाद करणे, त्यांची दमछाक करणे, ते निवडून कसे येणार नाहीत यासाठी गैरमार्गाचा अवलंब करणे याचे अनुभवाधिष्ठित शिक्षण येथे घेता येते. याचा थेट गुन्हेगारीशी संबंध नाही हे खरे असले तरी आजकाल गुन्हेगारांना राजकारणात चांगलीच मागणी आहे. तेव्हा निवडणुकीच्या काळात या शिक्षणाचा उपयोग तुम्हाला होईल यात शंका नाही. गुन्हेगारी विश्वात वावरताना कितीही कठीण प्रसंग आला तरी हिंमत सोडायची नसते. ज्याची हिंमत खचली तो गेला बाराच्या भावात हे या विश्वाचे मुख्य सूत्र. ही हिंमत कशी टिकवून ठेवायची याचे समग्र दर्शन तुम्हाला या विद्यापीठात होते. ती खचू नये म्हणून इतर सहकाऱ्यांनी संघटितपणे मागे कसे उभे राहायचे? एकमेकांना धीर कसा द्यायचा? याचीही उत्तरे येथे सहज मिळतात. त्यामुळे अट्टल गुन्हेगार म्हणून नाव कमवायचे असेल तर या विद्यापीठात प्रवेश घ्याच. तसेही आजकाल कोणतीही पदवी घेऊन नोकरीची संधी मिळत नाही. त्यापेक्षा हा रोजगार बरा. गुन्हेगारी म्हणजे खून, दरोडे, मारामाऱ्या हा समज आता इतिहासजमा झालेला. आताचे युग हे पांढरपेशा गुन्हेगारांचे. नेमके त्याचेच शिक्षण येथे मिळते. आता कुणी याला विद्यापीठाची बदनामी म्हणत असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे. वास्तव काय ते इच्छुकांनी लक्षात घ्यावे एवढेच!