लोकजागर : उत्साह अन् औदासीन्य!

अनामिक भीतीचे सावट अजून मनात घर करून बसलेले. अशावेळी आनंदित करणारे कार्यक्रम मनाला दिलासा देत असतात.

देवेंद्र गावंडे devendra.gawande@expressindia.com

राष्ट्रभक्ती ही कुणा एका विचाराची, जाती, धर्माची मक्तेदारी असू शकत नाही. जे याविषयी मतप्रदर्शन करून आपल्या भक्तीप्रखरतेचे प्रदर्शन वारंवार घडवतात, किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त ती न बोलणाऱ्यांच्या मनात सुद्धा असू शकते. याचे मनोज्ञ दर्शन उपराजधानीत झालेल्या एकांकिका महोत्सवात झाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नितीन गडकरींनी भरवलेल्या या महोत्सवात पहिल्या क्रमांकावर आलेली एकांकिका होती महात्मा गांधींच्या जीवनावर बेतलेली. आज देशभर गांधी हा विषय अनेकांनी हेटाळणी, टर व टीकेसाठी निवडलेला. तोही जाणीवपूर्वक. या महात्म्याला कितीही शिव्याशाप दिले तरी तो आणखी अजरामर होत जातो हे ठाऊक असून सुद्धा! एवढे असूनही बाजी मारली ती याच राष्ट्रपित्याने. यावरून तो सामान्यांच्या नसानसात किती भिनला आहे याची जाणीव या हेटाळणीखोरांना एव्हाना आली असेल. राष्ट्रीय नाटय़शाळेची विद्यार्थिनी असलेल्या स्नेहलता तागडे या तरुणीने टीका करण्याआधी गांधींचे म्हणणे तर ऐकून घ्या असे सांगत अतिशय देखणा प्रयोग सादर केला. तीच गोष्ट सलीम शेखची. त्याने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून नागपूरच्या स्वातंत्र्यलढय़ाचा इतिहास मांडला. निर्थक चर्चेसाठी मान्यता पावलेल्या या ग्रुप्सचा असाही वापर करता येतो हे त्याने दाखवून दिले. गांधीसोबत सावरकर हा विषय सुद्धा सध्या टीकेचा. त्यांचे स्वातंत्र्यलढय़ातील योगदान कुणी नाकारू शकत नाही हे ठाऊक असून सुद्धा! सारंग मास्टे या तरुणाने एकांकिकेच्या माध्यमातून सावरकरांचा थेट मृत्यूशीच संवाद घडवून आणला. याशिवाय स्वातंत्र्यलढय़ाशी संबंधित अनेक विषय येथे हाताळले गेले. अगदी फाळणीसकट. पण कुणीही इतिहासाची मोडतोड केली नाही. या स्पर्धेत यश मिळवणारे हे सारे तरुण वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून समोर आलेले.  त्यातल्या कुणीही राष्ट्रभक्तीचा ढोल कधी पिटला नाही. तरी त्यांच्या आविष्कारातून या थोरांच्या महतीसोबत भक्तीचेही दर्शन तेवढय़ाच प्रखरतेने घडले. समाजमाध्यमांवर चालणाऱ्या बाष्कळ व वायफळ चर्चाना आम्ही महत्त्व देत नाही हेच या महोत्सवातून साऱ्या नाटय़कर्मीनी दाखवून दिले.

सांस्कृतिक समृद्धी ही कोणत्याही शहराच्या श्रीमंतीत भर घालत असते. करोनाकाळाने गेली दीड वर्षे ही समृद्धी हिरावून घेतली होती. या काळात सर्वाधिक हाल झाले ते कलावंतांचे. सरकारनेही त्यांच्याकडे पाठ फिरवली. चहूबाजूने निराशेचे मळभ दाटलेले असताना या साऱ्या कर्मीना गडकरींनी मदतीचा हात दिला. साऱ्यांनी या संधीचे सोने केले. विषय स्वातंत्र्यलढय़ापुरता मर्यादित असला तरी अनेकांनी केलेली त्याची हाताळणी डोळ्यात अंजन घालणारी, विचार करायला प्रवृत्त करणारी व अनेकदा अंतर्मूख करणारी होती. जाती-धर्माचे विष कालवून, महान विभूतींना लहान मोठे ठरवून, त्यांच्या विचारावरून वाद निर्माण करून समाज दुभंगेल व त्यात आपले राजकीय भले होईल, असा संकुचित विचार करणाऱ्यांना हा कलाविष्कार चपराक देणारा ठरला. जल्पकांच्या टोळ्या काहीही करोत, समाज, त्यात वावरणारे हे कलावंत असूनही समंजसपणे विचार  करणारे आहेत हे दिसून आले. नागपूर, विदर्भासाठी हा महोत्सव दिवाळीची अनोखी भेट ठरली.

याच काळात शेजारच्या हिंगण्याला विदर्भ साहित्य संमेलन झाले. याला झाले म्हणावे की उरकले असा प्रश्न तेथील एकूणच अनागोंदी बघून अनेकांना पडला. हे संमेलन शतकोत्सव साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या वि.सा. संघाचेच ना, अशी शंका वारंवार घेतली गेली. कार्यक्रमांचा बक्कळ अनुभव गाठीशी असलेल्या संघाने ६७ वर्षांची परंपरा लाभलेले हे संमेलन इतक्या भिकार पद्धतीने का घेतले असेल? राजकीय व्यासपीठावर नेते येतात व भाषण ठोकून निघून जातात, कार्यक्रम मात्र सुरूच राहतो. अगदी तसेच या संमेलनात प्रत्येक सत्रात घडत गेले. याचे अध्यक्ष होते डॉ. मधुकर जोशी. हा मराठी भाषेतला बाप माणूस. हाडाचा संशोधक. इतिहासकालीन राजवटीत मराठीचा विस्तार कसा झाला, ती कुठे कुठे बोलली जात होती याचे पुरावे शोधून लेखन करण्यात या विदूषीचे सारे आयुष्य गेलेले. किमान त्यांचा तरी अपमान होऊ नये, आदर राखला जावा असेही या संघातल्या धुरिणांना वाटू नये? एवढा कोडगेपणा काय कामाचा? हे संमेलन सुरू असतानाच साहित्य संघात वेगळे कार्यक्रम घेतले गेले. संमेलनाचे निमंत्रक  हिंगणा सोडून त्यात सहभागी झाले. हे अजिबात ‘शोभणारे’ नव्हते. साधारणपणे अशी संमेलने शनिवार, रविवारी घेतली जातात. हेतू हाच की रसिकांना येता यावे. साहित्य संघाची महत्त्वाची बैठक आहे म्हणून संमेलन शुक्रवारी सुरू झाले. याचा अर्थ ‘आटोपणे’ हा एकच हेतू यामागे होता. साहित्य संघच जर या कार्यक्रमाकडे पाठ फिरवण्याची भूमिका घेत असेल तर आयोजकांना दोष देण्यात काय अर्थ? येथे कुणाचा पायपोस कुणात नाही हे कळल्यामुळेच कदाचित देवेंद्र फडणवीस इकडे फिरकले नसावेत. ठरलेले कार्यक्रम घेणे हा जेव्हा उपचार ठरू लागतो तेव्हा त्यातले जिवंत व रसरशीतपण आपसूकच हरवते. हे संमेलन त्याचे उत्तम उदाहरण. यात वेगवेगळ्या सत्रात जे निमंत्रित होते, त्यातल्या अनेकांनी दांडी मारलेली. जे हजर होते, त्यांना दादापुता करत सत्रे निभावून न्यावी लागली. उजवे, डावे, मध्यम या साऱ्यांना सामावून घेण्याच्या संघाच्या मानसिकतेमुळे अलीकडे संमेलनाचा दर्जा खालावत चाललाय. रटाळ कार्यक्रम हीच या संमेलनाची ओळख ठरू लागलीय. पूर्वी असे नव्हते. सहभागी पाहुण्यांविषयी लोकांना आकर्षण असायचे. आता प्रतिभा नावालाच उरली व विचारसरणीला महत्त्व आले. त्यामुळे वर्गात जेवढी मुले असतात त्यापेक्षा निम्म्या प्रेक्षकांच्या हजेरीत सारी सत्रे पार पडली. अनेकदा वेळेचे नियोजन कोलमडले. काहीवेळा तर अध्यक्षांचाच मान राखला गेला नाही. हे सारे टाळता येण्याजोगे होते. वृद्धांच्या हाती एखाद्या संस्थेची सूत्रे गेली की कसा गोंधळ उडतो हे क्षणोक्षणी जाणवत राहिले. एकेकाळी याच साहित्य संघाने नागपूर व विदर्भाची सांस्कृतिक भूक भागवण्याचे काम केले, यावर आज कुणाचा विश्वास बसणार नाही. हे असे का, यावर संघाचे धुरीण विचार करणार नाही. कैक वर्षांपासून त्याच त्याच खुच्र्या उबवून त्यांच्यात एक बनेलपणा आलाय. एकीकडे एकांकिका महोत्सव व दुसरीकडे संमेलन अशा दुहेरी सांस्कृतिक मेजवानीची संधी नागपूरकरांना चालून आली होती. त्यातल्या महोत्सवाने रिझवले तर संमेलनाने निराशा केली. करोनामुळे आधीच अनेकांची मने खचलेली. अनामिक भीतीचे सावट अजून मनात घर करून बसलेले. अशावेळी आनंदित करणारे कार्यक्रम मनाला दिलासा देत असतात. त्यात गडकरींची चमू अव्वल ठरली तर संघाने साऱ्यांचा अपेक्षाभंग  केला. आता ऐन दिवाळीत संघाची शतकोत्तरी कार्यक्रमांसाठी हालचाल सुरू झालेली. त्यात असे घडायला नको अशी अपेक्षा बाळगायला काय हरकत आहे?

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Lokjagar ekankika mahotsav in nagpur one act marathi plays in nagpur zws

Next Story
प्रशासनाची कुंभकर्णी झोप कधी संपणार?
ताज्या बातम्या