देवेंद्र गावंडे

devendra.gawande@expressindia.com

Prakash Ambedkar, North Indians,
“भाजपला मनसेच्या पाठिंब्यामुळे उत्तर भारतीयांमध्ये असुरक्षिततेची भावना”, प्रकाश आंबेडकरांचे विधान; म्हणाले, “भाजपने…”
election material making work increase due to parties splits
पक्षफुटींमुळे प्रचार साहित्याला ‘अच्छे दिन’; झेंडे, टोप्या, फेटे निर्मितीस सुरुवात, चिन्हे जास्त असल्याने कामात वाढ
Drought in the state but plenty of water in Koyna dam
राज्याला दुष्काळाचा झळा, कोयना धरणात मात्र मुबलक पाणी
Bhiwandi lok sabha
महाविकास आघाडीत भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला ?

राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी व शिवसेनेला विदर्भात वाढीची लयच सापडत नाही. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत हे पुन्हा एकवार स्पष्ट झाले. यावेळी राष्ट्रवादीला ६९ तर सेनेला ६१ जागा मिळाल्या. राज्याच्या सत्ताकारणात काँग्रेसपेक्षा सक्रिय असलेल्या या दोन्ही पक्षांना एकाही स्थानिक संस्थेवर एकहाती सत्ता मिळवता आली नाही. कुठे उपद्रव्यमूल्य ठरेल एवढे संख्याबळ तर कुठे अस्तित्व दिसत राहील एवढाच विजय अशीच अवस्था राहिली. निवडणूक कोणतीही असो, प्रत्येकवेळी अपयश पदरी पडूनही हे पक्ष आत्मपरीक्षण व सुधारणा करायला तयार नाहीत. यामागील मुख्य कारण आहे ते या दोहोंचा विदर्भाकडे बघण्याचा दृष्टिकोन. आरंभीचा काळ वगळता सेनेने कायम या प्रदेशात उंटावरून शेळय़ा हाकण्याचा प्रकार केला. पदाधिकारी नेमायचे पण त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खास मुंबईतल्या माणसाची नेमणूक करायची. नेमायचे कुणाला तर जो मुंबईत नकोसा झालेला. मग अनिच्छेने विदर्भात आलेल्या या संपर्कप्रमुखाने केवळ सरबराईकडे तेवढे लक्ष द्यायचे व पदाधिकाऱ्यांना मोकळे सोडायचे.

विदर्भातले समाजकारण, सांस्कृतिक संचित, जातीपातीचे प्राबल्य याचा अभ्यास न करता निर्णय लादायचे. यामुळे सेनेचा प्रारंभी विस्तारलेला पोत नंतर आक्रसत गेला. मुंबईहून येणाऱ्या प्रमुखाला खूश ठेवले की काहीही करता येते हे लक्षात येताच गुंड, मवाली, व्यापारी वृत्तीच्या लोकांना हा पक्ष आपला वाटू लागला व तशाच लोकांचा भरणा यात होऊ लागला. अशी वृत्ती जोपासून राजकारण करणाऱ्यांना सत्ता हवी असते. त्यामुळे सेना सत्तेत असली की विदर्भात या पक्षातली गर्दी कमालीची वाढते. नंतर कमी होते. आताही तेच सुरू आहे. पूर्व विदर्भात नेमलेले संपर्कप्रमुख यायलाच तयार नसल्याने या पक्षावर नागपूरच्या चतुर्वेदींनी अक्षरश: ताबा मिळवलेला. तर पश्चिम विदर्भात या पक्षाकडे लोक ओळखतील असा चेहराच नाही.

सतीश चतुर्वेदी काँग्रेसमध्ये, त्यांचे पुत्र दुष्यंत सेनेत. दोन्ही पक्ष चालतात एकाच घरातून. इकडे जमले नाही की तिकडे ढकला अशी कार्यकर्त्यांची अदलाबदली सतत अनुभवायला मिळते ती यामुळेच. वास्तविक चतुर्वेदी यांचा राजकीय करिष्मा विदर्भातून पूर्णपणे ओसरलेला. नितीन राऊत सोडले तर सतीशबाबूंना काँग्रेसमध्ये कुणी विचारत नाही. दुष्यंतजवळ राजकारणाचा अनुभव नाही. व्यावसायिक हेतूने जवळ आलेल्या कोंडाळय़ातून ते बाहेर पडायला तयार नाहीत.

नागपूरच्या बाहेर त्यांना ओळख नाही. विशिष्ट भाषिकांचे राजकारण करण्यात त्यांचा वेळ जातो. मराठी बाण्याचा सतत जयघोष करणारी सेना अशांवर कसा काय विश्वास ठेवते हे अजूनही अनेकांना न उलगडलेले कोडे. आदित्य ठाकरेंमुळे दुष्यंत चतुर्वेदींना बळ मिळाले हे खरे असले तरी राजकारणात याचा फायदा शून्य असल्याची प्रचिती सेनेला वारंवार येतेय. येत्या पालिका निवडणुकीत सुद्धा हेच चित्र कायम राहील. मैत्री वेगळी व राजकारण वेगळे असा फरक आदित्य ठाकरेंना समजला नसेल का? ठाकरेंनी नुकताच विदर्भाचा दौरा केला. प्रदूषणाच्या प्रश्नावर भूमिका घेतली ते चांगलेच झाले. अशा गंभीर प्रश्नांवर पोळी शेकणाऱ्या स्वयंसेवी संस्थांवर त्यांनी विश्वास ठेवण्याची गरज नाही. आज वैदर्भीय स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाच्या बाजूने उभे राहायला तयार नाहीत पण आपली उपेक्षा होते ही भावना मात्र सर्वत्र प्रबळ दिसते. खरे तर सेनेला या भावनेवर फुंकर घालत राजकारणात यश मिळवणे सहज शक्य. हा पक्ष जातीपातीचा विचार न करता राजकारण करतो अशी त्याची ओळख. या दृष्टिकोनातून बघितले तर सेनेसाठी विदर्भाची भूमी सुपीक. फक्त वसाहतवादी दृष्टिकोन त्यागला की झाले! एवढे साधे सूत्र या पक्षाला कळत नसेल का?

एकीकडे भाजपला अंगावर घेण्याची भाषा करायची व दुसरीकडे त्यांचा गड असलेल्या भागात नांगी टाकायची हे सेनेचे धोरण अपयशाला कारणीभूत ठरतेय. राष्ट्रवादीचेही असेच. हुक्की आली की या पक्षाचे नेते विदर्भात येतात व बोधामृत पाजून परत जातात. विदर्भाला हिणवण्यात, नावे ठेवण्यात हे सदैव आघाडीवर. वास्तविक संघटनात्मक विस्तार करण्याची तडफ या पक्षात आहे. त्यासाठी कठोर मेहनत घेण्याची तयारी असलेले नेतेही पक्षात दिसतात. पण विदर्भ म्हटले की यांच्या कपाळावर आठय़ा चढतानाच दिसतात. या भागाचे प्रश्न सोडवावे, निधी पळवणारे अशी झालेली प्रतिमा पुसून टाकावी, मुंबईत बसूनही विदर्भाच्या प्रश्नांवर बोलावे असे या पक्षाच्या नेत्यांना कधी वाटत नाही. विदर्भात आले की इथल्या मुद्यांना हात घालायचा व परत जाताच विसरायचे हेच धोरण या पक्षाने राबवले. त्यामुळे राजकारणात सक्रिय असलेल्या तीन घराण्याच्या पुढे या पक्षाची चाल कधी सरकली नाही. काहीही निर्णय घ्यायचा असला की पटेल, देशमुख व नाईक या तिघांकडे बघायचे, बाकीच्यांना तुच्छ लेखायचे, त्यांच्यावर साधा विश्वासही टाकायचा नाही याचा मोठा फटका राष्ट्रवादीला कायम बसत आला. त्यातून बाहेर यावे असे या पक्षाला कधी वाटले नाही. भाजपसारखा प्रबळ विरोधक आपल्याला तीन जिल्ह्याचा पक्ष म्हणून हिणवतो, हे थांबवायचे असेल तर विदर्भातही शड्डू ठोकायला हवा अशी भावना या पक्षात कधी दिसली नाही. त्यामुळे पराभवाची मालिका अखंडित राहिली. जिद्दीने लढणारे कार्यकर्ते तयार करणे, नवे नेतृत्व विकसित करणे, जातीय उतरंडीचा अभ्यास करून पावले उचलणे हे या पक्षाला सहज शक्य होते. आजही विदर्भात शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याचा आधार घेता आला असता. पण पक्षनेत्यांचा विदर्भाविषयी असलेला नकारात्मक दृष्टिकोन कायम आड आला.

उरलीसुरली कसर कुणालाही समोर येऊ न देण्यात धन्यता मानणाऱ्या या तीन घराण्यांनी पूर्ण केली. आज अशी अवस्था झाली की प्रफुल्ल पटेलांच्या भंडारा-गोंदियातच पक्षाला दारुण पराभव बघावा लागला. यात नुकसान पटेलांचे नाही तर पक्षाचे आहे हेही स्वत:ला हुशार म्हणवणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना कळत नसेल का? पटेल, देशमुख व नाईक ही लाडकी अपत्ये असतील तर त्यांना डोक्यावर घेऊन नाचा पण यांना बाजूला ठेवून पक्ष तर वाढवा अशी भावना राष्ट्रवादीत अनेकजण बोलून दाखवतात पण नेते बधायला तयार नाहीत. त्यामुळे कुठे काहीच मिळत नसेल तर तात्पुरती सोय म्हणून राष्ट्रवादी असा विचार करून येणाऱ्या व जाणाऱ्या वैदर्भीय नेत्यांच्या गर्दीत हा पक्ष स्वत:ची ओळख हरवून बसलेला. पवारांसारखा जाणता नेता असूनही राज्यात एकहाती सत्ता न मिळू शकण्यामागे विदर्भातील पिछेहाट हेही एक महत्त्वाचे कारण आहेच. आगामी काळात सेनेसोबत युती करून लढण्याचे मनसुबे रचणाऱ्या राष्ट्रवादीने विदर्भात वाढायचे असेल तर सेनेला समोर करून दुय्यम भूमिका स्वीकारली तरच या दोन पक्षाचे भवितव्य उज्ज्वल, अन्यथा नाही.