स्वातंत्र्यपूर्व काळ सोडला तर काँग्रेस व शिस्त याचा तसा कधी संबंध नव्हताच. देशासाठी बलिदान करणाऱ्या नेत्यांच्या पुण्याईच्या बळावर हा पक्ष सर्वसमावेशक पद्धतीचे राजकारण करून यश मिळवत राहिला. जोवर नेहरू होते तोवर पक्षात लोकशाहीविषयक मूल्ये कसोशीने पाळली जायची. वाद-प्रतिवाद, खंडन-मंडन या लोकशाहीतील परंपरेकडे आदराने बघितले जायचे. इंदिरा गांधींचा उदय झाला आणि पक्षात एकछत्री नेतृत्वाचा अंमल सुरू झाला. त्या म्हणतील तो आदेश अशी धारणा पक्षात रुजली.

पक्षनिष्ठेपासून व्यक्तिनिष्ठेकडे प्रवास सुरू झाला. यात शिस्त मागे पडत गेली. इंदिरासमर्थक असेल तर त्याला सर्व क्षम्य असे वातावरण तयार झाले. जोवर पक्ष सत्तेत होता तोवर सत्तेच्या धाकाने नेते व कार्यकर्ते शिस्त पाळायचे. बंडाची हिंमत करायचे नाहीत. पक्ष सत्तेतून बाहेर फेकल्यावर पोळा फुटावा तशी अवस्था अनुभवायला मिळू लागली. आता जे दिसते ते त्याचेच विस्तारित स्वरूप. पक्ष अडचणीत आहे, सत्तेत येण्याची सूतराम शक्यता सध्यातरी दिसत नाही याची पूर्ण कल्पना असूनही या पक्षातले नेते ज्या पद्धतीने वागतात ते बघून सामान्यांच्या मनात अगदी घृणा निर्माण व्हावी.

ताजे उदाहरण चंद्रपूरचे. येथे वडेट्टीवार व धानोरकर यांच्यात वाद आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत तो मिटावा म्हणून अगदी राहुल गांधींपासून सर्वांनी प्रयत्न केले. त्याला यश आले व सर्वांना पदाचे वाटप करण्यात आले. पालिकेच्या गटनेतेपदी राजेश अडूर यांची वर्णी लागली ती याच तडजोडीतून. पक्षश्रेष्ठींनी त्यावर मोहोर उमटवली. आता खासदार प्रतिभा धानोरकरांनी त्यांनाच काढून टाकले व स्वसमर्थक बसवला. कारण काय तर वडेट्टीवारांनी स्थायी समितीत केलेला वचनभंग. हा उघड उघड पक्षशिस्तीचा भंग पण या दोघांनाही तसे सुनावण्याची ताकदच पक्षात उरलेली नाही.

सर्वाधिक नगरसेवक निवडून येऊनही पालिकेवर सत्ता मिळवता आली नाही याचे शल्य कुणाच्याच मनात नाही. एकमेकांना तोंडघशी कसे पाडता येईल यातच सारे मग्न. मग का म्हणून सामान्य लोकांनी या पक्षाच्या मागे उभे राहायचे? सध्या पक्षाची अवस्था काय? राज्यातले वातावरण कसे याचा कसलाही विचार न करता नेते वागत असतील तर तो पक्षाच्या नेतृत्वाचा दोष ठरतो. इतक्या वाईट अवस्थेतही नेत्यांना अंतर्गत भांडणातच रस असेल तर साक्षात देव जरी पृथ्वीतलावर अवतरला तरी तो पक्षाचे भले करू शकत नाही.

दुसरे उदाहरण अमरावतीचे. तिथे हर्षजीत देशमुख नावाच्या अनोळखी व्यक्तीला अचानक विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली. या महाशयांची नागपूरला एक कंपनी आहे. ते मूळचे अमरावतीकर असले तरी राहतात नागपूरला. त्यांना अचानक कुणी समोर केले? प्रदेशच्या नेत्यांनी की स्थानिक? तेथील नेत्या यशोमती ठाकूर यांनी ज्या पद्धतीने आकांडतांडव केले ते पाहू जाता ही उमेदवारी प्रदेशच्या नेत्यांकडूनच लादली गेली असा संशय निर्माण होतो. प्रचाराच्या काळात हेच प्रदेशचे नेते आम्ही स्थानिक नेतृत्वावर नाराज अशा बातम्या पेरताना दिसले.

शेवटी पक्षालाच शून्यावर बाद व्हावे लागले. कुठलाही समन्वय नाही याचे हे उत्तम उदाहरण. अलीकडच्या प्रत्येक निवडणुकीत विरोधकांचे अर्ज बाद करणे, ते जमले नाही तर त्याला थेट विकत घेणे यासाठी पैशाच्या थैल्या घेऊन लोक सज्ज असताना किमान विकले जाणार नाही असे उमेदवार देणेही या पक्षाला जमू नये. साधी राहणी व उच्च विचारसरणीचा उदोउदो करणारे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना हेही जमू नये? मग त्यांचा फायदा काय? या देशमुखांनी आजारपणाची जी नाटके केली त्यामुळे सर्वच चकित झाले. मुळात इतक्या प्रतिकूल परिस्थितीत असे धाडसी प्रयोग करण्याची हिंमत होतेच कशी? भलेही पराभूत झाले असले तरी.

नागपूरला अतुल लोंढे विरोधकांनी दाखवलेल्या आमिषाला पुरून उरले. अशी निष्ठा असलेला एकही माणूस या पक्षाला इतर ठिकाणी सापडू नये? हे नेते पक्ष चालवतात की किराणा दुकान? भंडारा-गोंदियात सुद्धा उमेदवार माघारीचा प्रयोग रंगला पण चाणाक्ष नाना पटोलेंनी एका अपक्षाच्या मागे ताकद उभी करून पक्षाची धुगधुगी कायम ठेवली. प्रतिकूल परिस्थितीत कसे डावपेच खेळायचे हेच जर राज्याच्या नेतृत्वाला कळत नसेल तर हा पक्ष भविष्यात उभारीच घेऊ शकणार नाही. वर्ध्यात माघार घेणाऱ्या शैलेश अग्रवालांनी आता निलंबनाविरुद्ध थेट आवाज उठवला आहे. ही हिंमत या पक्षात नावालाही शिस्त उरली नाही हेच दर्शवते. यापेक्षा तर नाना पटोले बरे होते असे म्हणण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आलेली.

नागपूरमध्ये तब्बल १२ वर्षानंतर नवा शहराध्यक्ष पक्षाने दिला. त्या प्रफुल्ल गुडधेंच्या पदग्रहण सोहळ्यावर पालिकेच्या नगरसेवकांनीच बहिष्कार टाकला. विरोधी पक्षनेतेच या कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. ही हिंमत या लोकप्रतिनिधींमध्ये येते कुठून? पक्षात कुणाचाच कुणाला धाक राहिलेला नाही हेच यातून दिसते. लोकसभेच्या निवडणुकीत विदर्भातून पक्षाला दणदणीत यश मिळाले. यातून एक सिद्ध झाले. राजकीय समीकरणे बरोबर जुळवली, लोकांच्या प्रश्नांकडे, त्यातून निर्माण होणाऱ्या आक्रोशाकडे लक्ष दिले तर सहज यश मिळू शकते. या यशाची हवा काँग्रेसच्या डोक्यात लवकर गेली व विधानसभेच्यावेळी चित्र पूर्णपणे पालटले. यापासून कुठलाही धडा अजून तरी नेत्यांनी घेतलेला नाही. पक्षात प्रत्येक नेता स्वत:च्या पद्धतीने, मर्जीने चालतो. पक्षाचे धोरण काय, तत्त्वे काय याचा विचार यांच्या मनालाही शिवत नाही. मी म्हणेल तेच पक्षाचे धोरण अशी प्रत्येकाची भूमिका असते. हे असेच सुरू राहिले तर अंतर्गत पातळीवर अराजकाची स्थिती निर्माण होईल.

विदर्भात शिवसेना, मनसे व राष्ट्रवादी यांची अवस्था अतिशय वाईट. यात सेना व राष्ट्रवादीचे दोन्ही गट आलेत. नेतृत्वाने अनेकदा प्रयत्न करूनही हे पक्ष या प्रदेशात कधीच वाढले नाहीत. यामुळे या पक्षात ज्यांना राजकारण करून पैसे कमवायचे आहेत असे दुय्यम व तिय्यम दर्जाचे नेते जातात. एखादे पद घेतात. चांगली कमाई करून घेतात. नंतर पक्ष सोडून पळून जातात. निष्ठा नावाची गोष्टही यांच्या गावी नसते. यातील अनेकांवर खंडणीचे गुन्हे नियमितपणे दाखल होतात.

भविष्यात काँग्रेसचीही अवस्था अशीच होण्याची भीती अनेक जाणकार आता व्यक्त करतात. उमेदवारी मिळवायची, पैसे कमवायचे व माघार घ्यायची. यावेळी हेच दिसले. याचीच पुनरावृत्ती होत राहिली तर या लहान पक्षांच्या रांगेत काँग्रेससुद्धा सामील होईल. पराभव झाला तरी बेहत्तर पण लढण्यापासून माघार नाही अशी इच्छाशक्ती असलेले नेते व कार्यकर्तेच नसणे, असले तरी त्यांना ओळखण्यात नेतृत्वाचे कमी पडणे हीच या पक्षासमोरची सर्वात मोठी समस्या. शिस्त व निष्ठा विसरलेले नेते या पक्षासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे.    

devendra.gawande@expressindia.com