देवेंद्र गावंडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरे हे ‘शोमॅन’ आहेत. त्यांच्या पक्षाला यश मिळत नसले व विदर्भात अजूनही तो गटांगळ्या खात असला तरी त्यांचा दौरा व वक्तव्ये मात्र सदोदित यशोशिखर गाठत असतात. एखाद्या दूरच्या प्रदेशाचा दौरा वाजतगाजत कसा करावा हे ठाकरेंकडून शिकण्यासारखे. आताही ते तसेच आले. त्यांच्या पक्षाचे चिन्ह रेल्वे इंजिन. ते विदर्भात अजून शकुंतलेचाही वेग गाठू शकले नाही. तरीही ते रेल्वेने निघाल्याबरोबर माहोल तयार झाला. तसेही मनसेला अधूनमधून विदर्भाची आठवण येत असते. यावेळी ती थेट ठाकरेंनाच आली. आता काही ‘व्यंग’खोर म्हणतात त्यांना पक्षवाढीसाठी यायचेच नव्हते. गडकरींनी फुटाळा तलावावर उभारलेला देखावा बघायचा होता. त्यासाठी चाललो असे थेट कसे सांगणार? म्हणून मग पक्षवाढीचे निमित्त समोर केले. काही म्हणतात, त्यांना ताडोबातले वाघ बघायचे होते. तसेही त्यांचे प्राणीप्रेम सर्वश्रूत. ‘व्यंग’खोरांच्या या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू व ते पक्षविस्तारासाठी आले असे गृहीत धरू. मग कोणते चित्र समोर येते?

मनसेला विदर्भात पाठबळ नाही. जेव्हा ठाकरेंनी ‘मराठी’च्या मुद्यावर पक्ष काढत विदर्भाचा दौरा केला तेव्हा त्यांना तुफान प्रतिसाद मिळाला होता. ही दशकभरापूर्वीची गोष्ट. तरुणाईचे थवेच्या थवे तेव्हा त्यांच्या मागे धावत होते. नंतर सारेच बदलले. आता तर कार्यकर्ता होऊ इच्छिणाऱ्यांसाठी मनसे हा शेवटून पहिला पर्याय उरलाय. कुठेच जमत नसेल तर चला मनसेत असाच कार्यकर्त्यांचा कल. यांची संख्या कमी. त्यामुळे पक्ष वाढण्याचा प्रश्नच नाही. ठाकरेंसारखा माध्यम वलयांकित नेता असूनही विदर्भात पक्षाची अशी अवस्था का व्हावी? याचे उत्तर त्यांच्या कार्यशैलीत दडलेले. मनसेने विदर्भात संघटनात्मक जाळे उभारताना शिवसेनेचा पॅटर्न स्वीकारला. तो वसाहतवादी दृष्टिकोनाने ओतप्रोत भरलेला. म्हणजे तुम्ही तिकडे विदर्भात काम करा, आम्ही मुंबईतून तुमच्यावर लक्ष ठेवू, निर्णय आम्ही घेऊ. हे काम सुद्धा अनेकदा रखडणारे. कारण विदर्भाविषयी फारसे ममत्वच मुंबईकरांच्या रक्तात नाही. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला व वैदर्भीय मनसैनिकांना कुणी वाली उरला नाही. यातून माजली ती बजबजपुरी. एकूणच या पक्षाचे धोरण खळखट्याककेंद्री! त्यामुळे पदाच्या बळावर ज्यांना स्वार्थ साधून घ्यायचा अशांनी या पक्षात यायचे, काम फत्ते झाले की एकतर निघून जायचे किंवा लालसेपोटी टिकून राहायचे. मनसेच्या स्थापनेपासून असेच चित्र विदर्भात निर्माण झाले व अजूनही ते कायम. हे मुंबईहून नियंत्रण ठेवून असणाऱ्यांना ठाऊक नसेल काय? नक्कीच असेल तरीही त्याला आवर घालावा असे कुणाच्या मनात आले नाही. ठाकरे तर दूरच राहिले. कुणी लक्षच देत नाही म्हटल्यावर जी अनागोंदी माजते त्याचे दर्शन या ‘इटुकल्या’ पक्षात वारंवार घडते. याही दौऱ्यात ठाकरेंना तो अनुभव आलाच. साध्या नियुक्तीसाठी पैस मागितले जातात अशा तक्रारी खुद्द त्यांच्यासमोर झाल्या. मग काय? ठाकरेच ते. भडकले व अनेक ठिकाणी नियुक्त्याच रद्द करून टाकल्या. हा सारा प्रकार इंग्लंडच्या राजाने लंडनमध्ये बसून भारताचा कारभार चालवावा तसा. तेव्हा त्यांच्यात किमान शिस्त तरी होती. मनसेत तर त्याचाही अभाव. आकर्षक वक्तव्यावरून साऱ्यांचे लक्ष वेधून घेत सभेला गर्दी जमवणे वेगळे व पक्ष चालवणे वेगळे. हा फरक विदर्भाच्या बाबतीत तरी ठाकरेंच्या लक्षात आला नाही. त्यामुळे एकेकाळी तरुणाईचे आशास्थान असलेल्या मनसेचे रूपांतर गुंडांच्या टोळीत झाले. मनसेची शाखा कुठेही स्थापन झाली की सर्वात आधी वाहतूक व उद्योग सेल सुरू होतो हे विदर्भभरातील निरीक्षण. कशासाठी, याचे उत्तर वाचकांनीच शोधायचे. इतके ते सोपे.

कोणत्याही प्रदेशात पक्ष रुजवायचा असेल तर तेथील सामाजिक, आर्थिक मुद्दे अभ्यासावे लागतात. त्यावर भूमिका घ्यावी लागते. पक्षाची म्हणून सर्वंकष भूमिका असली तरी त्याला स्थानिक मुद्यांची जोड दिली तरच पक्षविस्तार होत असतो. तुम्ही आठवा, राज ठाकरेंनी विदर्भाच्या संदर्भात कधी असे चिंतनीय विचार मांडले का? त्यांना वेळ मिळाला नसेल तर त्यांच्या एखाद्या सहकाऱ्याने तरी हे काम केले का? नाही. वैदर्भीय मुद्यावर सर्वंकष धोरण तयार करून त्यावर बोलण्याऐवजी ठाकरे ‘स्वतंत्र विदर्भाला विरोध’ हा एकच राग अनेक वर्षांपासून आळवत राहिले. आताही त्यांनी जनमत घ्या असे जुनेच पिल्लू सोडून दिले. जनमंच या संस्थेने अशी चाचणी घेतली व त्याला भरघोष प्रतिसाद मिळाला हे कदाचित त्यांना ठाऊक नसावे. स्वतंत्र विदर्भाची मागणी आता मागे पडली हे मान्यच पण या मुद्यावर वैदर्भीयांच्या भावना अजून कायम आहेत. त्या लक्षात घेऊन राजकीय चतुराई दाखवत मुद्दा हाताळणे सुद्धा त्यांना जमले नाही. स्वतंत्र विदर्भाला विरोध ही त्यांची ठाम भूमिका एकदाची समजून घेता येईल. अशा स्थितीत या भागात पाय रोवायचे असेल तर दुसरे प्रभावी मुद्दे समोर करावे लागतात. तेही त्यांना जमलेले नाही. हाच मुद्दा घेऊन मुंबईत पत्रपरिषद घेण्याचा वामनराव चटप व इतरांनी केलेला प्रयत्न याच ठाकरेंच्या सेनेने किती निर्दयीपणे उधळून लावल्याचा प्रसंग जरा आठवून बघा. या मुद्यावर विरोध व समर्थन अशा दोन्ही भूमिका असू शकतात हे मनसेला मान्यच नाही हे त्यावेळी दिसले. मग ठाकरेंनी लोकशाहीचे गोडवे गाण्याचे कारण काय? हेच ठाकरे भाजपने यावरून केलेल्या घूमजावविषयी यावेळी चकार शब्द बोलले नाहीत. अगदी काही वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा ठाकरे भाजपच्या विरोधात सर्वत्र व्हिडीओ लावत होते. तेव्हा त्यांनी मेळघाटमधील ‘हरीसाल’ या गावाचा उल्लेख करत भाजपच्या ‘डिजीटाईज’ मोहिमेवर नेमके बोट ठेवले होते. हा मुद्दा तेव्हा खूप गाजला. नंतर अनेकांनी हरीसालकडे धाव घेतली व त्याच्या बातम्या झळकत राहिल्या. यावेळी अमरावतीत गेलेले ठाकरे हा मुद्दा विसरले. माझी भूमिका बदलली नाही असे एकीकडे सांगायचे व दुसरीकडे स्वत:च उपस्थित केलेल्या मुद्यांना बगल द्यायची, हे कसे? राज्यस्तरावर पण मुंबई, पुण्यात स्थापन झालेल्या पक्षांना विदर्भ कवेत घेता आला नाही. आधी सेना, मग राष्ट्रवादी व आता मनसे. अशी ही उतरंड. हे असे का घडले असावे यावर हे पक्ष फार विचार करताना सुद्धा दिसत नाही. मनसे तर नाहीच नाही याचा प्रत्यय या दौऱ्यात आला. मनसेला विदर्भच काय पण इतर प्रादेशिक विभागात ही बांधणी जमली नाही. इतके अपयश पदरी पडूनही ठाकरे नेहमीप्रमाणे पत्रपरिषदेत पत्रकारांचा ‘क्लास’ घेताना दिसले. ही त्यांची नेहमीची सवय. समोरच्याला निरुत्तर करण्यासाठी याचा उपयोग ते खुबीने करतात. या हजरजबाबीपणाबद्दल त्यांना दादच द्यायला हवी पण मनसेला सातत्याने येणाऱ्या अपयशाचे काय? त्यावरून कुणी थेट प्रश्न विचारलाच तर मिरची का झोंबते? याची उत्तरे न देताच ठाकरेंचा दौरा संपला. आता ते पुन्हा कधी येणार ते ठाऊक नाही पण त्यांचा पक्ष विदर्भात आहे तिथेच राहणार एवढे मात्र नक्की!

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokjagar mns chief raj thackeray tour of vidarbha zws
First published on: 29-09-2022 at 00:05 IST