राजकीय क्षेत्रातील घराणेशाहीवर आता ऊर बडवणे बंद करायला हवे. हा रोग आहे व तो समूळ नष्ट व्हायला हवा अशा फुकाच्या बाता सुद्धा नकोत. अशा गोष्टी करून नैतिकतेचा आव आणता येतो पण त्याने वास्तव बदलत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुका आल्या की हा विषय हमखास चर्चेत येतो. नेत्यांच्याच मुलांना, नातेवाईकांना उमेदवारी का? आम्ही काय नुसत्या खुर्च्या व सतरंज्या उचलायच्या का, अशा छापाची वक्तव्ये या काळात ऐकायला मिळतात. प्रत्यक्षात ज्यांच्या हाती निर्णय घेण्याचे अधिकार आहेत त्यांच्यावर याचा काहीही फरक पडत नाही. निर्णय घेताना निवडून येण्याची क्षमता, त्यासाठी लागणारा खर्च करण्याची ऐपत याच गोष्टी बघितल्या जातात. याचा अर्थ घराणेशाहीचा वारसा नसलेल्या कार्यकर्त्यांकडे त्या नसतात असा नाही. तरीही विश्वास, निष्ठा व वरिष्ठ वर्तुळात असलेली पोच या बळावर प्राधान्याने विचार केला जातो तो अशा वारसदारांचाच. अगदी देश स्वतंत्र झाल्यापासून हे चक्र अव्याहतपणे सुरू आहे. त्याला एकमेव कारण म्हणजे अशा उमेदवारांना मिळणारा मतदारांचा पाठिंबा. मत देताना लोक या मुद्याचा फार विचार करत नाहीत. हे अनेक निवडणुकीत सिद्ध झालेले. यावेळचेही चित्र तेच.

हेही वाचा >>> ‘मातोश्री’ची बुलढाण्यात मोठी खेळी! नाट्यमय घडामोडी नंतर जयश्री शेळकेंना उमेदवारी!!

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

माजी मंत्री रणजीत देशमुखांचे दोन सुपुत्र आशीष व अमोल, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे पुत्र सलील, राजेंद्र मुळक, गिरीश पांडव, नितीन राऊतांचे कुणाल, महेश बंग हे सारे नागपूर जिल्ह्यातील इच्छुक. बँकरोखे घोटाळ्यात शिक्षा झालेले सुनील केदार सुद्धा पत्नी किंवा मुलीचा विचार करताहेत. गोंदिया-भंडाऱ्यात हे लोण थोडे कमी पण तिथेही विजय महादेव शिवणकर रिंगणात उतरण्यासाठी सज्ज आहेत. तिकडे गडचिरोलीत दीर्घकाळ सत्ता भोगणाऱ्या आत्राम घराण्यात धर्मरावबाबा विरुद्ध मुलगी भाग्यश्री असा संघर्ष सुरू झालाय. चंद्रपुरात खासदार प्रतिभा धानोरकरांना त्यांच्या भावासाठी उमेदवारी हवी आहे. त्यासाठी त्यांनी चक्क दीराला दूर ढकलले आहे. यवतमाळातील नाईक घराणे प्रसिद्ध. तिथेही इंद्रनील, ययाती व नीलय यांच्यात चुरस आहे. शिवाय पारवेकर कुटुंबातील एकाला तर माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे पुत्र राहुल यांनाही निवडणूक लढवायची आहे. अमरावतीत आनंदराव अडसूळांचे पुत्र अभिजीत तर आमदार श्रीकांत भारतीयचे बंधू तुषार धडपडताहेत. अकोल्यात सुधाकर गणगणेंचा मुलगा महेश, अझहर हुसेनपुत्र झिशान, वाशीममध्ये अनंतराव देशमुखांचा मुलगा नकुल, राजेंद्र पाटणींचा मुलगा ज्ञायक, नुकतेच निवर्तलेले गोवर्धन शर्मांचे पुत्र कृष्णा यांना वारसाहक्काने उमेदवारी हवी आहे. वर्ध्यात प्रभा राव यांची मुलगी व भाचे एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकलेत. हा झाला थोडक्यात गोषवारा. यात आणखी काही नावे जोडता येतील. यातील किती लोकांना संधी मिळते व कोण विजयी होतो हा भाग अलहिदा! मात्र आजवरची आकडेवारी बघितली तर या वारसदारांच्या पारड्यात लोकांनी भरभरून मते टाकली आहेत. याचा अर्थ सामान्यांना ही घराणेशाही मान्य आहे. मग ओरडण्यात हशील काय?

आजच्या घडीला एकही राजकीय पक्ष यापासून अलिप्त राहिलेला नाही. या मुद्यावरून गेली दहा वर्षे देशभर रान उठवणारा भाजपसुद्धा! पूर्वी ही घराणेशाही जोपासताना काळजी घेतली जायची. मोठ्या घराण्यात कुणी राजकारणात जायचे यावर एकमताने निर्णय घेतले जायचे. घरातले वाद बाहेर जाऊ नये याची दक्षता घेतली जायची. आता हे चित्र पार बदलले. उमेदवारीच्या मुद्यावरून याच घराण्यात भांडणे सुरू झालेली. याला पुढचा टप्पा म्हणायचे की काय हे आता लोकांनीच ठरवायचे. एकाच घरातील अनेकांच्या राजकीय आकांक्षा जागृत होणे हे लोकशाहीसाठी चांगलेच लक्षण. मात्र या भांडणाचा वीट येऊन मतदारांनी संपूर्ण घराण्यालाच बाद ठरवले असे सार्वत्रिक चित्र आजतरी दिसत नाही. यावरून एक अंदाज सहज बांधता येतो. राजकीय विश्लेषक काहीही चिंता व्यक्त करत असले तरी मतदारांना मात्र ती फारशी भेडसावत नाही. त्यामुळे हा विषय कायमचा बाद करणेच उत्तम. यातला दुसरा मुद्दा आहे तो इतर क्षेत्रातील घराणेशाहीचा. तिथेही हेच चित्र सर्वदूर दिसते. डॉक्टरच्या मुलाला डॉक्टरच व्हावेसे वाटते. तसे वाटले नाही तर पालक त्याला व्यवसाय कोण सांभाळेल असा प्रश्न करत जबरीने वैद्यकीय शिक्षणात ढकलत असल्याची उदाहरणे भरपूर. नामवंत वकिलांच्या बाबतीतही तेच. तिथेही ‘प्रॅक्टिस’ कोण सांभाळेल हाच मुद्दा अनेकदा प्रभावी ठरत असतो. इतकेच काय उच्च व सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या क्षेत्रात सुद्धा या घराणेशाहीचेच प्रदर्शन सातत्याने सर्वांना दिसत असते. देशभरातील मोजकी पाच-पन्नास घराणी, जी न्यायदानाच्या क्षेत्रात आहेत, त्यांच्यातून निवडल्या गेलेल्या न्यायमूर्तींची संख्या आजही जास्त. उद्योग, व्यवसायाच्या क्षेत्रात तर हा अलिखित करारच मानला जातो. वडील निवृत्तीला आले की मुलाने व्यवसाय सांभाळायचा. जिथे जिथे पैसा आहे, मान व प्रतिष्ठा आहे तिथे कार्यरत असलेल्या प्रत्येक पित्याला आपल्या मुलाने यातच करिअर करावे असे वाटत असते. जिथे पैसा नाही व प्रतिष्ठा नाही तिथे मात्र हे चित्र वेगळे दिसते.

हेही वाचा >>> अंबरनाथची जागा अखेर ठाकरे गटाला, राजेश वानखेडे यांच्या नावाची घोषणा, डॉ. बालाजी किणीकर यांच्याविरुद्ध लढणार

शिक्षक, शेतकरी या वर्गात मुलांनी यात अडकू नये अशी भावना असते. आजकाल समाजसेवेचे क्षेत्र सुद्धा याला अपवाद राहिलेले नाही. केवळ विदर्भच नाही तर राज्यभरातील समाजसेवकांची घराणी नजरेसमोर आणा. त्यांची रक्ताच्या नात्यातली नवी पिढी आता उदयोन्मुख समाजसेवक म्हणून स्थिरावलेली दिसते. हा वसा आम्ही आमच्या वडिलांकडून घेतला असे ते अभिमानाने सांगत असतात. आताची समाजसेवा सुद्धा व्यवसायिक (प्रोफेशनल) अंगाने जाणारी. पोटाला चिमटा काढून लोकांची सेवा करण्याचे दिवस कधीच मागे पडलेले. या पार्श्वभूमीवर या सेवकांची नवी पिढी सामान्यांना ज्ञानामृत पाजत असते. किमान या क्षेत्रात तरी सेवेचे जाळे विणणाऱ्या व्यक्तींनी मुलांना समोर न करता एखाद्या कार्यकर्त्याच्या हाती संस्थेची धुरा सोपवावी अशी अपेक्षा काहीजण बाळगतात पण ती पूर्णत्वास जाताना कधी दिसत नाही. गंमत म्हणजे राजकीय घराणेशाहीला नाक मुरडणारे वा त्यावर टीका करणारे लोक या समाजसेवकांच्या नव्या पिढीकडे मात्र आदराने बघतात. मग प्रश्न निर्माण होतो तो हाच की असा दुजाभाव कशासाठी? घराणेशाहीतून समोर येत प्रस्थापित झालेल्यांकडे बुद्धिमत्ता नसते, जबाबदारी पेलण्याची ऐपत नसते. तो किंवा ती केवळ बाहुला म्हणून वावरतो. त्याला गुणवत्ता सिद्ध करता येत नाही, हे आक्षेप सुद्धा चुकीचे. आजवर अशा अनेक वारसदारांनी संधी मिळाल्यावर स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केलेले. त्यातले काही अनुत्तीर्णही झाले पण त्याचे प्रमाण नगण्य. त्यामुळे राजकारणच नाही तर सर्वच क्षेत्रातून हा घराणेशाही नावाचा शब्द हद्दपार करण्याची वेळ आता आली आहे. ज्या समाजाच्या पाठिंब्याच्या बळावर ही वारसदारी फुलत असते त्यांनाच काही घेणेदेणे नसेल तर काही मूठभरांनी उगीच चिंता वाहण्याचे कारण काय?

Story img Loader