देवेंद्र गावंडे

devendra.gawande@expressindia.com  

lancet study on breast cancer how early diagnosis and understanding relapse can help women
भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान; महिलांकडे दुर्लक्ष होतंय का? वाचा तज्ज्ञांचं निरीक्षण
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण

एखाद्या संस्थेचे मोठेपण कशावर ठरते तर ते सर्वसमावेशकता व सक्रियतेच्या गुणावर. विशाल व व्यापक दृष्टिकोन ठेवत वाटचाल करणाऱ्या संस्था सर्वाना आपल्याशा वाटतात. त्यात संकुचितपणा येत गेला की संस्थांचा परीघ आक्रसतो. मग कालांतराने त्या विस्मृतीत जातात. असे घडू नये यासाठी किमान संस्थेच्या धुरिणांनी काळजी घेणे गरजेचे. शंभराव्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या विदर्भ साहित्य संघावर सध्या याच काळजीची छाया दाटलेली. संस्थेला हे मत भलेही मान्य नसेल पण वास्तव हेच. शंभर वर्षांचा कालखंड काही लहान नाही. या काळात संस्थेने अनेक चढ उतार बघितले. त्यातून तावून सुलाखून निघत ती इथवर पोहोचली हे कौतुकास्पदच. मात्र यापुढे वाटचाल करायची असेल तर संघाने आता कात टाकण्याची गरज. त्याला एकमेव कारण आहे ते संघात सध्या आलेल्या साचलेपणात. परवा वार्षिक कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी नेमका याचाच उल्लेख केला. त्यावरून लोकांच्या मनात संघाविषयी नेमकी कोणती भावना आहे हेच सूचित झाले.

हे मान्य की जेव्हा ही संस्था आकाराला आली तेव्हा साहित्यवर्तुळात वेगवेगळे मतप्रवाह सक्रिय नव्हते. तेव्हा साहित्याचे क्षेत्र अभिजनांच्या वर्तुळात बंदिस्त होते. त्यामुळे साहजिकच याच वर्गाचा प्रभाव संस्थेवर होता आणि राहिला. नंतर जसजशी प्रगती होत गेली तसतसे अनेक प्रवाह सक्रिय झाले. त्यांना मानणारा एक वर्ग सुद्धा समाजात तयार झाला. आमची बांधिलकी केवळ साहित्याशी, कोणत्याही विचाराशी नाही असा दावा करणाऱ्या संघाने काळानुरूप बदलत या सर्व साहित्यप्रवाहांना सामावून घेणे गरजेचे होते. तसे झाले नाही. त्यामुळे आज दलित साहित्य, पुरोगाम्यांच्या वर्तुळात वावरणाऱ्या साहित्यिकांना ही संस्था आपली वाटत नाही. संघाने ही सर्वसमावेशकता आरंभापासून जोपासली असती तर प्रमुख पाहुणे म्हणून नाव आल्यावरही नितीन राऊतांची गैरहजर राहण्याची हिंमत झाली नसती. हा संघ स्थापन झाला तोच मुळात विदर्भातील साहित्यक्षेत्राला बळ देण्यासाठी. या क्षेत्रातील कलागुणांना व्यासपीठ मिळावे म्हणून. काही मोजके अपवाद सोडले तर सर्वाना या व्यसपीठाचा लाभ मिळाला नाही. वामन इंगळेंसारख्या सोव्हियत लँड नेहरू पुरस्कार मिळवणाऱ्या साहित्यिकाकडे संघाने केलेले दुर्लक्ष कसे विसरता येईल?

गेल्या चाळीस वर्षांच्या कालखंडात वेगवेगळे प्रवाह जोपासणारे अनेक कवी, कथाकार, कादंबरीकार विदर्भात उदयाला आले. त्यातल्या अनेकांकडे संघाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. हा आपला, तो परका हीच दृष्टी त्यामागे होती. या संकुचितपणामुळेच संघापासून दूर राहून यश मिळवणाऱ्यांची संख्या विदर्भात वाढत गेली. खरे तर सर्वात जुनी संस्था या नात्याने पालकत्वाची भूमिका घेत संघाने सर्वाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे योग्य ठरले असते. तसे झाले नाही याचे आणखी एक कारण म्हणजे सर्वसमावेशकता जोपासली तर संस्था दुसऱ्यांच्या ताब्यात जाईल ही अनाठायी बाळगलेली भीती. यापोटीच आज वय झाले तरी म्हैसाळकर अध्यक्षपद सोडत नाहीत. मी बाहेर पडलो तर संस्थेत वाद उद्भवतील असे ते जाहीरपणे बोलतात. हे एकप्रकारे संस्थात्मक अपयशाची कबुली देण्यासारखेच. तुमचे विचार व प्रवाह बाहेर ठेवा व संस्थेत येऊन काम करा अशी भूमिका घेऊन अनेक नव्यांना जोडता आले असते. भलेही यात जोखीम असली तरी संस्थाविस्तार याच पद्धतीने होत असतो. याकडे संघाने कायम दुर्लक्ष केले. परिणामी ‘होयबांची’ एक फौज येथे तयार झाली. साहित्यविषयक योगदानाचा विचार न करता या मुजरे करणाऱ्यांना महत्त्व मिळत गेले. साचलेपण आले ते यामुळे.

आज अशी अवस्था आहे की संघाला शताब्दी वर्षांत धडाकेबाज कार्यक्रम करण्यासाठी गिरीश गांधी, डॉ. पिनाक दंदे सारख्यांची कार्यक्षमता उधारीवर घ्यावी लागते. कारण धावपळ करणारी, वेगवेगळय़ा लोकांना, मतप्रवाहाला जोडणारी हीच माणसे आहेत. संघाजवळ तसा कुणीही नाही. हे वर्ष पार पाडल्यावर त्यांना पुन्हा बाजूला केले जाईल व ही संस्था स्वत:च आखून घेतलेल्या चौकटीत पुन्हा बंदिस्त होईल हे नक्की! आजच्या घडीला या संघात कार्यक्रम तरी किती होतात तर बोटावर मोजण्याएवढे. त्यातही श्रद्धांजली सभाच जास्त. एक संमेलन, एक वार्षिकोत्सव व दोनचार कार्यक्रम ही शतकी संस्थेची उपलब्धी कशी म्हणायची?

संघात जे सक्रिय आहेत ते दोन प्रकारात मोडतात. त्यातल्या एका गटाला कार्यकारिणीत असल्याचा आनंद, तर दुसऱ्याला पदाचा वापर करून स्वत:चे भले कसे करून घेता येईल याची विवंचना. जे लिहिते आहेत त्यांना साहित्य अकादमी, अखिल भारतीय संमेलनाच्या वर्तुळात कसा शिरकाव करता येईल व पुरस्कार, वेगवेगळय़ा समित्यांवर स्थान कसे पदरात पाडून घेता येईल यातच रस. जे लिहिते नाहीत त्यांना म्हैसाळकर म्हणतील तसे करण्यात व पद टिकवून ठेवण्यात आवड. मग प्रश्न उरतो तो संस्थेच्या भल्याचे काय? विस्ताराचे काय? त्यात कुणालाच रस नाही. कोणत्याही संस्थेसाठी अशी अवस्था धोकादायक. सध्या संघ नेमका त्याच वळणावर. साहित्य संमेलनाला गर्दी का होत नाही? लोक आधीसारखे उत्साहाने सामील का होत नाहीत या गडकरींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे या परिस्थितीत दडलेली. युगवाणी हे संघाचे मुखपत्र. उद्देश हाच की त्यातून इतर भागातील साहित्यप्रवाहाबरोबरच वैदर्भीय लेखकांच्या साहित्याची चर्चा, चिकित्सा व्हावी. दुर्दैव हे की यात वैदर्भीयांना स्थानच नसते. उच्च अभिरूची जोपासण्याच्या गोंडस नावाखाली साहित्यवर्तुळात जो देवाणघेवाणीचा (इकडे मला प्रसिद्धी दे, तिकडे मी तुला देतो) प्रकार सर्रास चालतो त्याचेच प्रतििबब यात सतत उमटत असते. या बळावर कार्यक्रम व पुरस्कार पदरात पाडून घेणारे कोण हे वेगळे सांगायची गरज नाही. हेच इतर कार्यक्रमाच्या संदर्भात. संघात कार्यशाळेला विदर्भाबाहेरचे लेखक बोलवायचे व त्या मोबदल्यात संयोजकांनी तिकडचे कार्यक्रम पदरात पाडायचे. अलीकडच्या काळात विदर्भातून जेवढे लेखक, कवी राज्यात नावारूपाला आले, त्यातल्या एकानेही मी साहित्य संघामुळे घडलो असे म्हटलेले नाही. यावरून संघ किती चिरेबंदी वाडय़ात जगतोय याचीच प्रचिती येते. तीच गोष्ट पुरस्काराबाबत. याचे घाऊक वाटप एका विशिष्ट वर्गाचे पुनर्वसन करण्यासाठीच होते की काय, अशी शंका दरवर्षीची. एकदा तर विद्यापीठात कंत्राटी प्राध्यापक असलेल्या सुमार बुद्धिमत्तेच्या एका विदूषीच्या न प्रकाशित झालेल्या प्रबंधवजा पुस्तकाला पुरस्कार दिला गेला. यावरून या ‘मर्जीतल्या वाटपाची’ कल्पना यावी. हे चित्र बदलायला हवे असे किमान शतकोत्सवी वर्षांत तरी या संस्थेतील धुरिणांना वाटेल काय? साचलेपण घालवण्यासाठी ठरावीक कालावधीत बदल आवश्यक असतो. तो कसा व केव्हा करायचा हा चाणाक्षपणा संस्थेकडे असावाच लागतो. वि.सा. संघात नेमका त्याचाच अभाव दिसतो. हा संघ विदर्भातल्या सर्व विचारप्रवाहांना आपला वाटावा, कार्यकारिणीत कुणीही असले तरी किमान व्यासपीठ उपलब्ध करून देतात असे चित्र निर्माण व्हावे असा निर्धार या वर्षांत ही संस्था करणार नसेल तर संघाची ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ व्हायला वेळ लागणार नाही.