देवेंद्र गावंडे

devendra.gawande@expressindia.com 

रॉबीन शर्मा हे इंग्रजीतले एक नावाजलेले लेखक. त्यांची एक कादंबरी आहे. ‘द मोंक हू सोल्ड हीज फेरारी’ या नावाची. यातला भंते असलेला नायक विपश्यनेसाठी स्वत:ची फेरारी गाडी विकतो. अतिशय रंजक कथानक असलेल्या या पुस्तकाची आठवण झाली ती सनदी अधिकारी वैभव वाघमारेंच्या नव्या पवित्र्यामुळे. सध्या मेळघाटातल्या धारणीत आदिवासी विकास खात्यात प्रकल्प अधिकारी असलेल्या वाघमारेंना अवघ्या तीन वर्षांपूर्वी हाती घेतलेल्या प्रशासकीय सेवेची धुरा सोडायचीय. उदात्त हेतूने समाजसेवा करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या हेतूविषयी शंका घेण्याचे काही कारण नाही तरीही त्यांचा निर्णय अनेक प्रश्न उपस्थित करणारा ठरतो. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी यासाठी घेतलेला समाजमाध्यमांचा आधार. काहीही करायच्या आधी समाजमाध्यमाला जवळ करायचे ही आजकाल रूढ झालेली पद्धत. त्याचा मोह वाघमारेंना आवरता आला नाही. राजीनामा मंजूर झाल्यावर ते माध्यमावर प्रकटले असते तर ते एकदाचे समजून घेता आले असते पण त्याआधीच ते व्यक्त झाले. यातून दिसून येते ती घाई, जी खडतर प्रशिक्षण घेतलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला शोभणारी नाही.  अवघ्या तीन वर्षांच्या सेवेत आपण २० वर्षांचा अनुभव घेतला हे त्यांच्या निवेदनातले वाक्य अपरिपक्वपणाचे  निदर्शक.

या देशातली समाजव्यवस्था, त्याच्या भल्यासाठी कार्यरत असलेली प्रशासकीय व्यवस्था व त्यावर नियंत्रण ठेवून असणारी राज्यव्यवस्था एवढय़ा गुंतागुंतीची आहे व तिला एवढे पदर व कांगोरे आहेत की भल्याभल्यांना ती समजायला आयुष्य खर्ची घालावे लागते. ती वाघमारेंना केवळ तीन वर्षांत समजली यावर विश्वास कसा ठेवायचा? साधारणपणे या सेवेतल्या व्यक्तीने जिल्हाधिकारीपद सांभाळल्यावर तो अनुभवसमृद्ध व्हायला सुरुवात झाली असे समजले जाते. वाघमारे तर तिथवर पोहोचलेच नाहीत. तरीही व्यापक अनुभव गाठीशी जमा झाल्याची गोष्ट ते कशाच्या बळावर करतात? मूळचे मराठवाडय़ातील असलेल्या वाघमारेंची कौटुंबिक पार्श्वभूमी अगदी साधी. याचाच अर्थ सामान्यांना या व्यवस्थेतून मार्गक्रमण करताना कोणते चटके सहन करावे लागतात याची जाणीव त्यांना असणारच. असे तावून, सुलाखून पदावर विराजमान झालेल्यांकडून समाजही भरपूर अपेक्षा बाळगून असतो. त्यातल्या त्यात वाघमारे अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून आलेले. त्यामुळे अपेक्षांचे ओझे आणखी वाढलेले. सेवेत राहून त्याची पूर्तता करण्याचे सोडून ते राजीनाम्याची भाषा बोलतात हा अपेक्षाभंग नाही का? आरक्षण हे सामाजिक न्यायाचे प्रतीक ही व्याख्या गृहीत धरली तर वाघमारेंचे इथवर पोहोचणे हे मागास समाजाचे प्रतिनिधित्व ठरते. या न्यायाने ते संपूर्ण समाजावरच अन्याय करत आहेत. आपला राजीनामा हे एकाचे नुकसान नाही तर समाजाचे आहे याची जाणीव त्यांना झाली नसेल का? या सेवेत राहून समाजाची सेवा करता येणे शक्य नाही याचा साक्षात्कार त्यांना आधीच झाला असता तर त्यांच्याभोवती आणखी कुणा गरजूला ती जागा मिळाली असती. ती संधी वाया घालवायला आपण जबाबदार हे वाघमारेंना उमगत नसेल का?

त्यांच्या निवेदनाचा सूर सेवेत राहून समाजसेवा करता येत नाही असा. हे पुन्हा चूक. हे मान्य की सध्याची प्रशासकीय व्यवस्था अतिशय जर्जर व अहंगंडाने ग्रस्त आहे. आपण जनतेला उत्तरदायी आहोत ही भावनाच या व्यवस्थेतून हद्दपार होत चाललेली. काही वर्षांपूर्वीपर्यंत शहाण्याने कोर्टाची व पोलीस ठाण्याची पायरी चढू नये अशी म्हण प्रचलित होती. दुर्दैवाने आता त्यात शासकीय कार्यालयांची सुद्धा भर पडलेली. सर्वसामान्यांना प्रशासनाकडून येणारे अनुभव इतके वाईट की चांगला अनुभव आला तर माध्यमात त्याची बातमी होते. इंग्रजांनी रुजवलेल्या या व्यवस्थेत सुधारणेला भरपूर वाव. ती आणखी लोककेंद्रित करण्याची गरज. त्यादृष्टीने सरकारांनी प्रशाकीय सुधारणेच्या गप्पा केल्या. त्यातून अनेक अहवाल तयार झाले पण ते लागू न झाल्याने आमूलाग्र म्हणावा असा बदल प्रशासनात झाला नाही. त्यामुळे या व्यवस्थेत आलेले साचलेपण, त्यातून निर्माण झालेल्या बेपर्वा वृत्तीमुळे प्रशासनाविषयी समाजात एक नकारात्मक भावना तयार झाली. त्याचे दर्शन आपल्याला पदोपदी होते. या वाईटाच्या पार्श्वभूमीवर वाघमारेंनी हा निर्णय घेतला का? तसे असेल तर त्यांचे आकलन कमी पडले असाच अर्थ निघतो. प्रशासकीय व्यवस्था कितीही किडलेली असली तरी त्यात सुधारणा करण्याची, ती समाजाभिमुख करण्याची ताकद याच व्यवस्थेत असलेल्या प्रत्येकात आहे. त्यातल्या त्यात ती व्यक्ती जर सनदी सेवेतली असेल तर नक्कीच चांगले काही घडू शकते. अशी अनेक उदाहरणे आहेत. वाघमारेंना ही संधी होती व आहे, तरी ते तिचा उपयोग करण्याऐवजी पळ का काढत आहेत?

प्रशासनात राहून लोकांची सेवा करण्याचे ठरवले तर अनेक अडथळे येतात. ते कुणाकडून हे येथे सांगण्याची गरज नाही. ते पार करत समोर जाणे हेच चांगल्या अधिकाऱ्याचे लक्षण. यात तो यशस्वी सुद्धा होऊ शकतो. कारण, सेवेच्या उद्देशाला अधिकाराची मिळालेली जोड. प्रशासनाच्या बाहेर राहून सेवा करतो म्हटले की अधिकार सोबतीला नसतात. त्यामुळे बाहेर राहून सेवेचा मार्ग अधिक खडतर होतो. अनेकदा यात अपयश पदरी पडले की निराशा येते. याची जाणीव वाघमारेंना नसेल का? सध्या ते धारणीला आहेत व उत्कृष्ट काम करत आहेत. लोकही त्यांच्याविषयी चांगले बोलतात. हीच पद्धत ते सर्व पदावर काम करताना वापरू शकतात. ते करायचे सोडून बाहेर पडण्याची धडपड का? सेवेच्या माध्यमातून समाज बदलण्याचे स्वप्न बघण्यात काहीच वाईट नाही. मात्र हे काम मी एकटय़ानेच करीन हे विधान धाडसाचे. आजवर अनेकांनी अशी स्वप्ने बघितली. त्यातले यशस्वींची संख्या अत्यल्प. त्याउलट प्रशासनाच्या माध्यमातून सेवा हा मार्ग सोयीचा. कारण अख्खी यंत्रणा उद्दिष्टपूर्तीसाठी राबवून घेता येते. आयुष्याच्या योग्य वळणावर आलेल्या या संधीचे सोने करायचे सोडून वाघमारे हा अधिक संकटाचा मार्ग का स्वीकारत आहेत? काही जण म्हणतात ते विपश्यना करून आले व त्यांच्यात बदल झाला. त्यातून त्यांनी आधी राजीनामा व नंतर दीर्घ सुट्टीचा पवित्रा घेतला. हे खरे असेल तर वाघमारे चुकताहेत. मानवतेचे कल्याण व लोकांना न्याय हा बुद्धाचा मार्ग आहेच. तोच मार्ग प्रशासकीय व्यवस्थेतूनही निवडला जाऊ शकतो. त्यासाठी सर्वसंगपरित्याग करण्याची गरज नाही. काळाच्या ओघात सेवेचे हे बदलते स्वरूप वाघमारेंनी ध्यानात घेतलेले नाही. आजच्या काळात बुद्धाचा हा विचार अंमलात आणायचा असेल तर सेवा हीच विपश्यना आहे व तेच खरे अध्यात्म. सनदी सेवेचे कवच अंगावर बाळगूनही बुद्धाची शिकवण अंमलात आणता येते हे वाघमारेंना कळायला हवे. त्यामुळे रजेवरून परत आल्यावर ते पुनर्विचार करतील अशी आशा करायला हरकत नाही. अशा संवेदनशील अधिकाऱ्याची या व्यवस्थेला गरज आहे.