देवेंद्र गावंडे  devendra.gawande@expressindia.com

सत्याचा शोध घेणे हे येऱ्यागबाळय़ाचे काम नव्हे. आजवर अनेक महनीय व्यक्तींनी असा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यातल्या साऱ्यांनाच यश मिळाले असे नाही. त्यातील अनेकांनी नंतर सत्याचा शोध घेण्यात कमी पडलो, अशी प्रांजळ कबुली दिली. सत्य, मग ते एखाद्या घटनेमागचे असो वा जीवनाशी संबंधित. ते शोधायचे असेल तर विशाल व निरपेक्ष मन आणि सद् विवेकबुद्धी असावी लागते. ज्याचा शोध घ्यायचा आहे ते केवळ आणि केवळ सत्य असेल व ते कुणावरही अन्याय करणारे नसेल याचे भान असावे लागते. पूर्वग्रहदूषित व विशिष्ट विचारसरणीने प्रेरित होऊन सत्य शोधता येत नाही. असा शोध हा निव्वळ बनाव असतो. आपल्यांची बाजू घेण्याचा व परक्यांना दोषी ठरवण्याचा उपद्वय़ाप असतो. याला शोध कसे म्हणायचे? मात्र अलीकडे याच पद्धतीने आपल्याला हवे ते, हवे तसे सत्य शोधण्याची प्रथा पडू लागलीय. खरे तर हा सत्याचाच अवमान! तो सर्रास केला जाऊ लागलाय. ताजे उदाहरण अचलपूरच्या दंगलीचे. यामागचे सत्य शोधण्यासाठी उजव्यांनी  एक समिती नेमली. त्याची निष्पक्षता लोकांना पटावी म्हणून त्यात विधि, माध्यम व प्रशासकीय वर्तुळातील लोकांचा समावेश केला. तो करताना हे लोक आपल्याच विचाराचे असतील याची काळजी घेण्यात आली. सत्याचा पहिला पराभव झाला तो इथेच.

नंतर या समितीने दोन दिवसाचा दौरा करून एक अहवाल जाहीर केला. तो किती एकतर्फी आहे याची साक्ष वाचताक्षणी पटते. या दंगलीसाठी केवळ एकाच धर्माला जबाबदार ठरवून ही समिती मोकळी झाली. हा निष्कर्ष ज्यांना दोषी ठरवण्यात आले त्यांच्याशी न बोलताच काढण्यात आला. तशी जाहीर कबुलीच या समितीने माध्यमांसमोर दिली. मुळात दंगल ही होत नसते, ती घडवून आणली जाते. आजकाल मतांच्या धृवीकरणासाठी सर्रास हे आयुध वापरले जाते. त्यामुळे अशा दंगलींना कोण कारणीभूत हे सर्वाना समजत असते. तरीही त्यातील सत्य शोधायचेच असेल तर दोन्ही घटकांशी बोलणे, प्रत्येकाची बाजू ऐकून घेणे आवश्यक. अशाच काय पण कोणत्याही समितीसमोर आम्हीच दंगलीला जबाबदार असे कुणीही सांगणार नाही. हे ठाऊक असल्याने सर्वाशी बोलून अंतिम निष्कर्षांवर येणे हे समितीचे काम. हा निष्कर्ष थोडा जरी सत्याच्या जवळ जाणारा असला तरी समितीने योग्यरितीने जबाबदारी पार पाडली असे म्हणता येईल. या समितीने तेही म्हणायला जागा ठेवली नाही. सत्य तर दूरच राहिले.

या समितीच्या दौऱ्यामागचा हेतू  आधीच कळल्यामुळे अमरावतीचे प्रशासनही त्यापासून चार हात लांब राहिले हे बरेच झाले. मुळात अशा समित्या या सत्य शोधण्यासाठी नाही तर दंगलीमुळे झालेल्या धृवीकरणाला बळकटी देण्यासाठी असतात. आजवरचा इतिहास चाळून बघितला तर हेच दिसते. समजा आज राज्यात उजव्यांची सत्ता असती व प्रशासन त्यांच्या ताब्यात असते तर अशी समिती स्थापन झाली असती का? अशा स्थितीत हे काम मग विरोधकांनी केले असते आणि त्यांचीही सत्य शोधण्याची कार्यशैली अशीच राहिली असती यात वाद नाही. मुळात हे असले प्रयोग सत्याचा अपलाप करणारे. सामान्यांच्या डोळय़ात धूळ झोकणारे. आज उजवे सत्तेत असते तर अचलपुरात बुलडोझर चालले असते. एखाद्या घटनेमागचे सत्य शोधणे हे काम सरकार व प्रशासकीय यंत्रणेचे. ते एकतर्फी वागतात हे लक्षात आले तर इतरांना पुढाकार घेता येतो. त्यात गैर काही नाही. मात्र तो प्रयत्न किमान पारदर्शी असायला हवा. तेही आपल्याकडे होताना दिसत नाही. त्यामुळेच सत्यशोधन हा वजनदार व प्रभावी शब्दच आज हलका झालाय. विदर्भाचा विचार केला तर आजवर असे सत्याचा शोध घेण्याचे सर्वाधिक प्रकार घडले ते गडचिरोलीत. हा नक्षलवादाने ग्रस्त असलेला जिल्हा. त्यामुळे तिथे हिंसा नित्याचीच. पोलिसांच्या गोळीबारात नक्षली ठार झाले की देशभरातील डाव्यांनी सक्रिय व्हायचे व गडचिरोलीत एक सत्यशोधन समिती पाठवायची हा  नेहमीचा शिरस्ता. आजवर अशा अनेक समित्या गडचिरोलीत येऊन गेल्या. दिल्ली, मुंबई, हैदराबादहून नक्षलींना पाठिंबा देणाऱ्यांनी नागपुरात उतरायचे व एक किंवा दोन दिवसात दौरा करून आम्ही सांगतो तेच सत्य असे माध्यमासमोर जाहीर करायचे. मारले गेलेले नक्षली नव्हते, आदिवासी होते. ही चकमक नव्हे तर सामान्यांची हत्याच, असे दावे करायचे. शोधनाचा हा सारा प्रयत्न एकतर्फी. त्यामुळे तोही अक्षम्यच. नक्षलींनी निरपराध्यांची हत्या केली की याच सत्य शोधणाऱ्या मंडळींच्या तोंडाला कुलूप. मग कुणी गडचिरोलीत येण्याची तसदी घेत नाही. नक्षलींच्या हल्ल्यात पोलीस ठार झाले तरी ही मंडळी चूप. जे घडले ते वाईट असेही कधी म्हणणार नाहीत. इतके एकतर्फी व विशिष्ट विचाराने प्रेरित होऊन वागणाऱ्या या मंडळींच्या तोंडी सत्याचे शोधन हा शब्दच शोभत नाही. तरीही हा प्रकार गडचिरोलीत अगदी नित्यनेमाने घडत आलाय.  या पार्श्वभूमीवर उजव्यांच्या या कृतीकडे बघितले तर काय दिसते? दोघांमध्येही दिसते ते साम्य. कडवा व जहाल विचार कोणताही असो. डावा अथवा उजवा. विचार करण्याची पद्धती सारखीच. मुळात या दोघांच्याही तोंडी सत्याचा शोध हा शब्द न शोभणारा. लोकशाही व्यवस्थेत या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व होते व आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य व लोकशाही स्थापनेसाठी संघर्ष करताना काँग्रेसने सर्वप्रथम सत्यशोधन या आयुधाचा वापर केला. तेव्हा इंग्रजांनी केलेल्या अत्याचाराच्या घटनांमागील वास्तव समोर आणण्यासाठी अशा अनेक समित्या नेमण्यात आल्या. त्यांनी दिलेल्या अहवालामुळे विदेशी राजवटीविरुद्ध जनमत तयार होण्यास मदतच झाली. तेव्हा संपर्कसाधने कमी होती. माध्यमांचा अतिरेक नव्हता. त्यामुळे नेमके काय घडले हे या अहवालांच्या माध्यमातून समोर येत गेले व सत्य काय ते सामान्यांना उमगत गेले. आता तशी स्थिती नाही. आज घडलेली घटना, त्यामागचे सर्व पैलू व कंगोरे क्षणात सर्वदूर पोहचतात. त्यामुळे त्यामागचे सत्य काय हे लोकांना समजते. तरीही सत्याचा अंतिम शोध घेण्याचा प्रयत्न विभिन्न विचारधारांकडून सुरूच आहे. यामागचे कारण स्पष्ट आहे. अशा समित्यांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करणे, व्यवस्थेला धारेवर धरणे हाच हेतू असतो. म्हणजेच एका अर्थाने हे विरोधकांचेच काम. तरीही लोकांचा आणखी  विश्वास बसावा, यासाठी अशा समित्यांचे फार्स उभे केले जातात. त्यात मुद्दामहून वेगवेगळय़ा क्षेत्रातील लोकांना सामील करून घेतले जाते. समितीत सामील असलेले लोक कसे निष्पक्ष आहेत हे जनतेच्या मनावर ठसवले जाते. मात्र यामागचा मूळ उद्देश एकच असतो, तो म्हणजे राजकीय फायदा उठवणे. उजवे असोत वा डावे, या समित्यांच्या माध्यमातून आजवर सत्याऐवजी असत्याचाच प्रचार व प्रसार केला जातोय. हे वास्तव समाजाने ध्यानात घेणे गरजेचे. आजच्या सत्योत्तरी युगात सत्याचे हे कथित प्रयोग दीर्घकाळ सुरू राहतीलच. प्रश्न आहे तो लोकांनी यावर विश्वास किती ठेवायचा हा?