देवेंद्र गावंडे
तुम्हाला भर रस्त्यात तलवार घेऊन एखाद्याचा जीव घेण्यासाठी धावत असलेले गुंड बघायचे आहेत. भर चौकात थांबलेल्या वाहनावर गोळीबार करून एखाद्याला ठार करण्याचा प्रसंग ‘याची देही याची डोळा’ अनुभवायचा आहे. आठ रस्ते एकत्र आलेल्या चौकात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकू हल्ला करणारा माथेफिरू बघायचा आहे, वाहनाला साधी धडक लागली म्हणून झालेल्या भांडणाचे पर्यवसान खुनात झालेल्या प्रसंगाचे साक्षीदार व्हायचे आहे, तुमची इच्छा असेल तर बिहारमधल्या पाटणा वा तत्सम शहरात जाण्याची काहीएक गरज नाही. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ बघून दुधाची तहान ताकावर भागवण्याची सुद्धा काही आवश्यकता नाही. त्यापेक्षा तुम्ही सरळ नागपुरात या, इथल्या मोकळय़ा रस्त्यावर मनसोक्त फिरा, हमखास तुम्हाला या हिंसक प्रसंगाचे साक्षीदार होता येईल.

हे शहर म्हणायला राज्याची उपराजधानी आहे. प्रत्यक्षात ते गुन्हेगारांची राजधानी आहे. इथेही पोलीस आहेत पण चित्रपटाप्रमाणे घटना घडल्यावर येणारे. मुंबई, पुण्याच्या तुलनेत नागपूर तसे शांत हा सार्वत्रिक समज या गुन्हेगारांनी चक्क मोडून काढण्याचा विडा उचललाय. त्यात ते कमालीचे यशस्वी ठरले आहेत. आता तुम्ही म्हणाल की पोलीस काय करतात. ते व्यस्त आहेत वाळूच्या तस्करीवर ‘लक्ष’ ठेवण्यात, देहविक्रय करणाऱ्या गंगाजमुनातील अबलांना बडवण्यात, सत्ताधाऱ्यांनी सांगितलेल्यांवर कारवाई करण्यात, राजकीय सूड उगवण्याच्या प्रकरणात मदत करण्यात, सट्टा व जुगार अड्डे चालवणाऱ्या बडय़ा धेंडांवर कारवाई करून नंतर ‘दिलासा’ देण्यात, एवढे करून दलाची प्रतिमा निष्कलंक व भ्रष्टाचारमुक्त कशी राहील याची काळजी घेण्यात. नागपूर पोलिसांचे कामच इतके ‘मोठ्ठे’ आहे की ही यादी वाढूही शकते. मग तुम्हाला प्रश्न पडेल की एवढी सगळी कामे करूनही गुन्हेगारी वाढते कशी? त्याचेही साचेबद्ध उत्तर पोलिसांकडे आहेच. म्हणजे असे की, या शहराचे रक्तच थोडे गरम आहे. क्षुल्लक कारणाहून खून होतात. हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने देशभरातील गुंड येथे आश्रयाला येतात, वाळू, कोळसा चोरीमुळे गुन्हेगारी वाढते. अशी बचावाची अनेक कारणे पोलिसांकडून समोर केली जातात. आता काही म्हणतील की हा तर कर्तव्यच्युतीवर पांघरुण घालण्याचा प्रकार. असेल कदाचित पण गुन्हेगारी वाढूनही पोलीस त्यांची प्रतिमा ‘स्वच्छ’ राखण्यात यशस्वी ठरलेत हे सर्वानी गृहीत धरायचे. गुन्हेगारांना एवढे मोकळे रान मिळूनही पोलिसांना हे स्वच्छतेचे गमक कसे उलगडले असले तात्त्विक प्रश्न कृपया विचारायचे नाहीत. ‘दीडशहाणा’ या शब्दात तुमची गणना केली जाईल. तसेही पोलिसांना प्रश्न विचारायचे नसतात. या प्रहसनानंतर आता देशपातळीवर जाहीर झालेल्या गुन्हेविषयक आकडेवारीवर नजर टाकू.

महिलांवरील लैंगिक अत्याचारात हे शहर देशात पहिल्या क्रमांकावर. सायबर गुन्ह्यातही हा क्रमांक कायम. सेक्सार्टशनमध्ये दुसरा क्रमांक. दुचाकी चोरीतही दुसरा. बलात्कारात मुंबईनंतर आपणच. आत्महत्यांमध्ये देशात नंबर वनवर. मुलांवरील अन्याय, अत्याचारात देशात पाचवे. बालगुन्हेगारीत पहिले, घरफोडी, चोरी, लूटमार यात नागपूरचा क्रमांक पहिला. हातोहात सोन्याची साखळी चोरणे यात नागपूरकर गुंडांचा हातखंडा, त्यामुळे क्रमांक एक कायम. अपहरणातही प्रथम. वयोवृद्धांचे शहर अशी नागपूरची ओळख जगभर पसरलेली. इथले टॅलेंट नोकरीच्या शोधात बाहेर पडते व आईवडील एकटे राहतात. अशा एकटय़ा वृद्धांना लुटण्यात, त्यांच्यावर हल्ले करण्यात हे शहर देशात पहिल्या क्रमांकावर. खुनाचा प्रयत्न करण्यात दुसऱ्या तर अपघातात पहिल्या स्थानावर. बाकी शेतकरी आत्महत्या तर आपल्या पाचवीलाच पुजलेल्या. त्यामुळे यातला पहिला क्रमांक आपण कधीच सोडलेला नाही. आता गुन्हेगारांचे नंदनवन असलेले हे शहर गुन्हे दाखल होण्यात देशात आघाडीवर असणार हे ओघाने आलेच. एक राहिलेच. अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्याच्या घटनांमध्येही हे शहर पहिल्या पाचात आहेच, तर आर्थिक गुन्ह्यात दुसऱ्या. दोन मोठे राष्ट्रीय महामार्ग या शहरातून जातात. त्यावरून धावणाऱ्या वाहनांकडून लाच न घेता त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न पोलीस करतात. तरीही अपघातात हे शहर देशात पहिल्या क्रमांकावर. ही सारी माहिती राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाची.

ती खोटी आहे असे पोलीस म्हणू शकतात. स्वच्छ प्रतिमेवर डाग नको या भूमिकेतून हे नाकारणे समोर येऊ शकते पण वास्तवाचे काय? सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या भावनेचे काय? या गुन्हेगारीमुळे शहराच्या होणाऱ्या बदनामीचे काय? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधायचीच नाहीत! या साऱ्यांची अपेक्षा एकच. गुन्हेगारीच्या मुद्यावर नागपूरची बदनामी नको. कुणी केली तर ती सहन केली जाणार नाही. यामुळे वस्तुस्थिती लपेल या गोड गैरसमजात वावरण्याचा हा प्रकार. तोच आजकाल रूढ होत चाललेला. आता परवाच आयटी क्षेत्रात काम करणारे एक मोठे व्यवसायिक भेटले. मुंबई, पुण्यातच काय पण अमेरिकेतही त्यांच्या नावाचा मोठा दबदबा. अनेक सुशिक्षित तरुण त्यांच्याकडे रोजगाराच्या संधीचे जनक म्हणून बघतात. नागपूरला का येत नाही? येथील तरुणांना संधी का उपलब्ध करून देत नाही? असे दोनच प्रश्न विचारायचा अवकाश. ते भडाभडा बोलू लागले. कशावर तर येथील गुन्हेगारीवर. दिवसाढवळय़ा खून, मारामारी, लूटमार जिथे होते तिथे हजारो नोकरदारांना सुरक्षित कसे ठेवणार हा त्यांचा कळीचा प्रश्न. अजूनतरी येथे कंपन्यांकडून खंडणी उकळणाऱ्या व राजकीय वरदहस्तात हे काम करणाऱ्या टोळय़ा तयार झाल्या नाहीत. पुण्यात हा त्रास अलीकडे खूप वाढला, पण येथील गुन्हेगारी बघून भीतीच वाटते. ती अशीच वाढत राहिली तर अशा टोळय़ाही लवकरच तयार होतील. त्यापेक्षा दक्षिणेतील शहरे बऱ्यापैकी सुरक्षित असतात. त्यामुळे हैदराबादला जाण्याचा विचार सुरू आहे. त्यांचे हे उत्तर नेमके मर्मावर बोट ठेवणारे. आजवर विदर्भात असाच समज होता की मुंबई, तिथल्या पोर्टपासून दूर असल्याने या भागात उद्योग येत नाहीत. यात काही अंशी तथ्यही आहे. मात्र आयटी, औषध संशोधन क्षेत्रातील उद्योगांना हा भौगोलिक अडथळा नसतो. तरीही ते यायला तयार नाहीत याचे कारण वाढती गुन्हेगारी. उद्योग स्थापन केला आणि बाहेर म्हणजेच शहरात कर्मचाऱ्यांना काही झाले की त्याचा परिणाम एकूण युनिटच्या कार्यक्षमतेवर होतो. आयटीमध्ये ते परवडणारे नसते हे त्यांचे उत्तर बरेच काही सांगून जाणारे. भर रस्त्यावरचे गुन्हे आता देशभरातील मोठय़ा शहरात कमी झालेले. संघटित गुन्हेगारी सुद्धा मोडीत निघालेली पण नागपूरचे चित्र अजून कायम. मोठय़ा शहरांच्या तुलनेत कमी लोकसंख्या असूनही येथील गुन्हेगारीचा आलेख वाढताच. त्याची चिंता कुणालाच नाही. त्यामुळे या शहराची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत जाणार यात शंका नाही. यावर सारेच सहमती दर्शवतील फक्त पोलीस सोडून!

devendra.gawande@expressindia.com