लोकसत्ता टीम
भंडारा : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कौशल्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शिक्षक प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ संपल्यानंतर कालावधी वाढविला असताना देखील सदर प्रशिक्षणार्थींना कार्यमुक्त करण्यात आले होते. याबाबत वृत्त सर्वप्रथम लोकसत्ताने प्रकाशित केले होते. त्यानंतर काल आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांना दिलेल्या निर्देशानंतर तात्काळ वाढीव आदेश निर्गमित करण्यात आल्याने शेकडो प्रशिक्षणार्थींना दिलासा मिळाला आहे.
आमदार सुधाकर अडबाले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या समस्या निवारणार्थ ७ एप्रिल २०२५ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कौशल्य योजनेअंतर्गत १० मार्च २०२५ च्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील ७१३ प्रशिक्षणार्थी यांचा ६ महिन्यांचा कालावधी वाढवून ११ महिने करण्यात आलेला असताना सदर प्रशिक्षणार्थींना वाढीव आदेश न देता कार्यमुक्ततेचा आदेश देण्यात आला होता.
त्यामुळे सदर बैठकीत प्रशिक्षणार्थी यांनी हा विषय मांडताच आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांना वाढीव आदेश तात्काळ देण्यात यावा, असे निर्देश दिले. त्यावर ८ एप्रिल रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कौशल्य योजनेअंतर्गत शिक्षक प्रशिक्षणार्थींना ५ महिन्यांचा वाढीव आदेश शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी यांना दिला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ७१३ प्रशिक्षणार्थींना दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल सदर प्रशिक्षणार्थ्यांना आमदार सुधाकर अडबाले यांचे आभार मानले आहे.
बैठकीला माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) रवींद्र सोनटक्के, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले, जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे, जिल्हा कोषाध्यक्ष धीरज बांते, नितेश बावणकर व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.