लोकसत्ताच्या ‘विदर्भरंग’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

प्रास्ताविकातून देवेंद्र गावंडे यांनी विदर्भरंग दिवाळी अंकाच्या विषयनिवडीची पार्श्वभूमी उलगडली.

‘विदर्भरंग’ दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना गिरीश गांधी, विवेक रानडे, तनुका रानडे, विजय संत, वीरेंद्र रानडे, देवेंद्र गावंडे, नीलेश खांडेकर व श्रीराम काळे.

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी,  ज्येष्ठ छायाचित्रकार विवेक रानडे यांची उपस्थिती

नागपूर : संकटात धावून जाणे ही जशी भारतीयांची विशेषत:, तशीच संकटात डगमगून न जाता संधी शोधणे ही हिंमत केवळ भारतीयच दाखवू शकतात. गेल्या दोन वर्षांत करोनामुळे एकीकडे अवसान गळाले असताना एकमेकांच्या मदतीसाठी चाललेला ओघ आणि त्याचवेळी संधी हेरून त्याचा केलेला सकारात्मक वापर लोकसत्ताने ‘विदर्भरंग’ दिवाळी अंकातून वाचकांसमोर मांडला आहे. या अंकाचे प्रकाशन मंगळवारी वनराईचे विश्वस्त व ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी, ज्येष्ठ छायाचित्रकार विवेक रानडे, तनुका रानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी लोकसत्ता विदर्भ आवृत्तीचे उपनिवासी संपादक देवेंद्र गावंडे, उपमहाव्यवस्थापक (वितरण विभाग, इंडियन एक्सप्रेस समूह) वीरेंद्र रानडे, मुख्य जाहिरात व्यवस्थापक विजय संत, वनराईचे सचिव नीलेश खांडेकर, कृषी विकास प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्रीराम काळे उपस्थित होते.

बातमीवर भाषेचा साज हल्ली दुर्मिळ होत चालला असताना तो फक्त लोकसत्ताने जपला आहे, असे प्रतिपादन यावेळी गिरीश गांधी यांनी केले. सामाजिक प्रश्नाची जाण असणाऱ्या वृत्तपत्राचा दिवाळी अंक देखील तितकाच दर्जेदार असल्याचे गांधी म्हणाले. लोकसत्तासोबत असलेल्या ऋणानुबंधाला त्यांनी यावेळी उजाळा दिला. लोकसत्ताबद्दल सुरुवातीपासूनच आकर्षण आहे. या वृत्तपत्रातील मजकूर आणि त्याची उंची मोठी आहे. त्यामुळे लोकांची या वृत्तपत्राकडे पाहण्याची दृष्टी वेचक आणि वेधक आहे, असे प्रतिपादन विवेक रानडे यांनी केले. तनुका रानडे यांनी देखील यावेळी विदर्भरंग दिवाळी अंकाला शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकातून देवेंद्र गावंडे यांनी विदर्भरंग दिवाळी अंकाच्या विषयनिवडीची पार्श्वभूमी उलगडली. मागील वर्षी करोनाच्या संकटसमयी केलेल्या समाजकार्याची दखल तर यावर्षी संकटातही संधी शोधणाऱ्यांची दखल लोकसत्ताच्या विदर्भरंग दिवाळी अंकाने घेतल्याचे त्यांनी सांगितले. या अंकाचे संपादन करणारे शफी पठाण यांचे पाहुण्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार  राम भाकरे यांनी मानले. यावेळी लोकसत्तातील सर्व सहकारी उपस्थित होते.

संकटात संधी शोधणाऱ्यांची यशोगाथा

यंदाच्या विदर्भरंग दिवाळी अंकात करोनाला हरवून सनदी अधिकारी झालेला आदित्य जीवने, वायूने प्राण वाचवणारा वैभव गंधर्व, मृत्यूला परतावून मानवसेवा उभारणारे संदीप बानेवार, मुस्लीम समाजात जनजागृती करून अनेकांचे प्राण वाचवणारे डॉ. शोएब खान, वीज संचयाचा प्रभावी पर्याय देणारे एनआयटीचे विद्यार्थी, करोनाग्रस्ताच्या मृत शरीराबाबतची भीती घालवणारे डॉ. संजय ढोबळे, इन्सेट वॉक ही जगावेगळी संकल्पना समाजाला देणारा शुभम छापेकर, कृषिक्रांती घडवणारे डॉ. संतोष बोथे, श्वासांची तुटू पाहणारी लय जोडणारे रवींद्र केसकर, तुका नावाच्या गावाला ग्रामहिताची पंढरी करणारे पंकज व श्वेता महल्ले, झाडांना बोलके करणारे सारंग धोटे, अभिनव स्टार्टअप उभारणारे कल्पक तरुण, हळद लागवडीतून प्रगतीचे कॅप्सूल निर्माण करणारे पंकज भगत, देवदूतच्या रूपात धावून येणारा रोबोट बनवणाऱ्या डॉ. शीतल चिद्दरवार आणि त्यांचे विद्यार्थी हे सारेच संकटाचे संहारक  वाचकांना भेटणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta vidarabrang diwali issue 2021 published zws

Next Story
नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तपदासाठी गडकरी-फडणवीस समर्थकांमध्ये चढाओढ
ताज्या बातम्या