नागपूर : मानवी सृष्टीसमोर करोनारूपी संकट उभे असतानाही त्याला घाबरून न जाता शेकडो हातांनी या संकटाला संधीत परावर्तीत केले. या संधीचे सोने करणाऱ्या हातांची आणि त्यांच्या सोनेरी कथांची मेजवानी लोकसत्ताच्या ‘विदर्भरंग’ दिवाळी अंकात यंदा रसिक वाचकांना मिळणार आहे. हा नाविन्यपूर्ण दिवाळी अंक तयार झाला असून या अंकाचे प्रकाशन वनराईचे विश्वस्त व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी व ज्येष्ठ छायाचित्रकार विवेक रानडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मंगळवार, दोन नोव्हेंबरला धनत्रयोदशीच्या दिवशी दुपारी १२.३० वाजता लोकसत्ता कार्यालयात हा प्रकाशन सोहोळा होणार आहे. करोनाकाळात अस्पृश्य ठरलेल्या रुग्णांसाठी देवदूत बनून येणारा रोबोट किंवा हळद लागवडीतून प्रगतीचे कॅप्सूल निर्माण करणारा पंकज भगत, करोनावर जिद्दीने मात करून सनदी अधिकारी झालेले आदित्य जीवने आणि करोनाकाळात सर्व काही ठप्प झाले असताना एका छोटय़ाशा उपक्रमातून आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणारा शुभम छापेकर अशा एक ना अनेक जिद्दीच्या कथा वाचकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहेत. त्याच दृष्टिकोनातून लोकसत्ताने विषयाची आखणी केली आणि ती ‘विदर्भरंग’च्या रूपाने प्रत्यक्षात उतरली. हा वैविध्यपूर्ण अंक वाचकांच्या हाती पडणार आहे.