बुलढाणा : जिल्ह्यातील लोणार तालुका रविवारी (१ फेब्रुवारी) रोजी झालेल्या भीषण अपघाताने हादरला. महिला मजुरांना कामावर घेऊन जाणाऱ्या ॲपेला भरधावं वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिल्याने हा अपघात झाला. यामध्ये एका मजूर महिलेचा जागीच मृत्यू ओढावला तर किमान ८ महिला मजूर जखमी झाल्या आहे. यातील काही महिलांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर नजिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
लोणार तालुक्यातील लोणार ते मातळ मार्गावर आज १ फेब्रुवारी रोजी सकाळी हा भीषण अपघात घडला. भरधाव वेगात येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने महिला मजुरांना घेऊन जाणाऱ्या ॲटोला जोरदार धडक दिली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीची संख्या जास्त असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लोणार तालूक्यातील किनगावजटू येथून मातळ या गावाकडे नेट शेड च्या कामासाठी महिला मजूर ॲपे (क्रमांक एम एच २८ आर २२११) ने जात होत्या. बाजड यांच्या शेताजवळील वळणावर सरस्वती गावाच्या च्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक एम एच ४३ एएफ ५८२१) ने ॲपेला समोरून धडक दिली.कारची धडक इतकी जोरदार होती की धडकेमुळे ॲपे पलटला व त्यातील महिला मजूर रस्त्याच्या कडेला फेकल्या गेल्या.
या अपघातात जरीनाबी अयुबशहा (वय ४५) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रंजना जना परमेश्वर कास्तोडे (वय ५३), शांताबाई शेवाळे (वय ४५), कल्पना विठ्ठल जमधाडे (वय ४०), अलका मधुकर शेवाळे (वय ४०), लक्ष्मण बबन करवते (वय ४५), चंद्रभागा गजानन नागरे (वय ४०), राधा गजानन नागरे तसेच ॲपे चालक आसिफ निंशालशहा (वय ३०) हे आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर स्विफ्ट डिझायर कारचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. सदर वाहन हे हिवराखंड येथील असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना तातडीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे लोणार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिगंभीर जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलविण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच लोणार पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

