लोकसत्ता टीम

वर्धा : सेलू तालुक्यातील हिवरा शिवारात गावाकऱ्यांच्या हाती बिबट्याचे पिल्लू लागले होते. अखेर ते पिल्लू व माता बिबट यांची भेट घालून देण्यात वन खात्याच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. गुरुवारी रात्री ते आज पहाटे चार पर्यंत ही घडामोडी चालली.

गुरुवारी रात्री नऊ वाजता शेतकरी व बिबट यांच्यात झटापट झाली होती. बिबटने पळ काढला. पण दीड महिन्याचे पिल्लू आरव करीत असल्याने पडून होते. तेव्हा उपस्थित गावाकऱ्यांनी त्यास ताब्यात घेत घरी आणले. ही माहिती वन खात्यास देण्यात आल्यानंतर उपवनसंरक्षक राकेश सेपट व सहाय्यक वनसंरक्षक अमरजीत पवार यांनी प्रथम पिल्लू ताब्यात घेण्याची तत्परता दाखविली.

ताब्यात घेतल्यावर हे पिल्लू तापाने ग्रस्त असल्याचे तसेच एका डोळ्यास जखम झाली असल्याचे दिसून आले. त्यास वर्धेत आणून आशिष गोस्वामी यांच्या करुणाश्रम या पशु आश्रमात ठेवण्यात आले. उपचार झालेत. पिल्लाची चांगली अवस्था पाहून त्यास जंगलात त्याच्या मातेकडे सुपूर्द करण्याचे ठरले. गोस्वामीसह त्याचे सहकारी कौस्तुभ गावंडे तसेच ऋषिकेश गोडसे, वन खात्याचे घनश्याम टाक, अमोल ढाले, अस्लम मौजान, शारिक सिद्दीकी, विठ्ठल उडान यांनी पिल्लास बास्केटमध्ये ठेवून रात्रीच जंगल गाठले. ठराविक ठिकाणी ती बास्केट ठेवण्यात आली आणि ही रेस्क्यू चमू ताटकळत मादा बिबटची वाट बघू लागली. अक्षय आगाशे हे जंगलात तळ ठोकून होते.

आणखी वाचा-नागपुरात काँग्रेसच्या वाढत्या मताधिक्याने भाजप चिंतेत! विधानसभेसाठी काय नियोजन…

अखेर पहाटे साडे तीन वाजता ती आलीच. आजूबाजूला सावध नजरेने बघत बास्केटजवळ पोहचलीच. पिल्लास बघून हरखली. त्यातून त्यास बाहेर कसे काढायचे म्हणून बास्केट भोवती काही क्षण येरझऱ्या केल्या. मार्ग मिळाला. अलवारपणे पिल्लास तोंडात पकडून चालत गेली आणि मग किट्ट अंधारात गडप झाली. बाळ व मातेची ही भेट वन खात्यासाठी अविस्मरणीय ठरल्याचे पवार सांगतात.

सेलू तालुक्यातील हिवरा येथील असलेले एक शेतकरी सायंकाळी सात वाजता शेतात जात होते. तेव्हा गावाच्या लगत हाकेच्या अंतरावर नदीकाठी त्यांना वाघ असल्याचा भास झाला. हातातील टॉर्चच्या प्रकाशात त्यांनी पाहणी सूरू केली. तेव्हा झुडपात बिबट दिसायन आला. प्रकाश डोळ्यावर पडल्याने बिबट चवताळला. त्याने शेतकऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हल्ला पाहून घाबरगुंडी उडालेल्या शेतकऱ्याने हातातील पिशवी बिबटच्या दिशेने भिरकावली आणि गावाकडे धूम ठोकली.

आणखी वाचा-विदर्भात १ जुलैला वाजेल शाळेची पहिली घंटा

पण बिबट्यानेही हार नं मानता शेतकऱ्याचा पाठलाग सूरू केला. घाबरलेल्या त्या शेतकऱ्याने दगडफेक करीत कसेबसे बिबट्यास हाकलून लावले. बिबट आणि शेतकऱ्यात असे युद्ध रंगले असतांनाच बिबट्याच्या पिल्लाचा टाहो सूरू झाला. पळ काढलेल्या शेतकऱ्याच्या आवाजाने गावकरी जमा झालेत. बिबट पळून गेला असल्याने शेवटी उपस्थित गावाकऱ्यांनी त्या अनाथ पिल्लास ताब्यात घेतले.

रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, असा नेहमी अनुभव घेणाऱ्या गावाकऱ्यांनी भूतदया दाखवीत त्या पिल्लास सोबत नेत गावातील एका घरी सुरक्षित ठेवले. काही काळ त्यास जोपासले. या घटनेची माहिती मिळाल्यावर दोन तासांनी वन विभागाचे कर्मचारी गावात पोहचले. तेव्हा गावाकऱ्यांच्या संतापास त्यांना सामोरे जावे लागले. घरात ठेवलेल्या बिबटाच्या पिल्ल्याचा त्यांनी ताबा घेतला होता.