Premium

मुलांच्या प्रेमापोटी डॉक्टर दाम्पत्याचा संसार पुन्हा फुलला; ‘भरोसा सेल’च्या समुपदेशनाचा सकारात्मक परिणाम

दोघांचेही समुपदेशन करण्यात पोलिसांना यश आले आणि दोघांचाही संसार मुलांच्या प्रेमापोटी पुन्हा फुलला.

childe with parents

अनिल कांबळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : पती-पत्नी दोघेही उच्चशिक्षित आणि व्यवसायाने डॉक्टर. दोघांनी कुटुंबीयांच्या सहमतीने लग्न केले. संसारात दोन फुले फुलली. काही वर्षे दोघेही अमेरिकेत वैद्यकीय सेवेत लागले. मात्र, करोनामुळे भारतात परतले आणि दोघांच्या संसारात संशयाने विष कालवले. त्यामुळे संसार विस्कटला आणि तुटण्याच्या काठावर पोहचला. प्रकरण भरोसा सेलपर्यंत पोहचले. दोघांचेही समुपदेशन करण्यात पोलिसांना यश आले आणि दोघांचाही संसार मुलांच्या प्रेमापोटी पुन्हा फुलला.

डॉ. स्नेहा आणि डॉ. यश दोघेही गरीब कुटुंबातील. दोघांनीही अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. शेतात मोलमजुरी करून स्नेहाने शिक्षणासाठी पैसा गोळा केला. दोघांचेही वैद्यकीय शिक्षण संपल्यानंतर कुटुंबाच्या समहतीने लग्न केले. सुरुवातीला पती-पत्नीने खासगी रुग्णालयात नोकरी केली. दोघांच्या संसारात दोन मुले झाली. एक दहा वर्षांचा तर दुसरा ८ वर्षांचा. त्यानंतर स्नेहा आणि यश यांना अमेरिकेतील एका मोठ्या रुग्णालयात नोकरी करण्याची संधी मिळाली. दोघेही अमेरिकेत नोकरी करीत असताना करोना आला. त्यामुळे दोघेही भारतात परतले.

हेही वाचा >>> “लोकहितासाठी आक्रमक भूमिका घेणारे…’’, वनमंत्री मुनगंटीवार यांची खा. धानोरकर यांना श्रद्धांजली

मुंबईतील सदनिकेत राहत असताना वैद्यकीय साहित्य पुरवणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या स्विटी नावाच्या तरुणीशी यशची ओळख झाली. त्या तरुणीवरून स्नेहाच्या मनात संशयाने घर केले. करोनानंतर अमेरिकेतून फक्त यशला पुन्हा बोलावणे आले. त्यामुळे स्नेहाला दोन मुलांसह नागपुरात सासू-सासऱ्यांच्या आधाराने थांबावे लागले. अमेरिकेत यश आणि स्विटीची पुन्हा भेट झाली आणि दोघांनी सोबत फोटो काढून फेसबुकवर टाकला. त्यामुळे स्नेहाच्या मनात संशयाचे वादळ निर्माण झाले. त्यावरून डॉक्टर पती-पत्नीत वाद झाला. स्विटीमुळे दोघांच्याही संसाराला ग्रहण लागले.

स्नेहाची भरोसा सेलमध्ये धाव

स्विटीची अमेरिकेत भेट म्हणजे योगायोग असल्याचे यशने सांगितले तर स्नेहाने त्यांच्या वारंवार भेटीवर आक्षेप घेतला. यशने मुलाला अमेरिकेत नेले. पण, स्नेहाला नेण्यास नकार दिला. त्यामुळे स्नेहाने भरोसा सेलमध्ये धाव घेतली. एकटीला भारतात ठेवून यश घटस्फोटाच्या तयारीत असल्याची तक्रार पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांच्याकडे केली.

…अन् संशयाचे भूत पळाले

डॉ. यशचे दोन्ही मुलांवर खूप प्रेम. त्यामुळे तो मुलांच्या प्रेमापोटी दर दोन महिन्याला भारतात येत होता. हीच बाब हेरून पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी यशचे समूपदेशन केले. त्याला दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी पैसे आणि पत्नीला मुंबईतील सदनिकेत राहण्याचा सल्ला दिला. डॉ. स्नेहा हिलाही अमेरिकेत नोकरी बघण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. त्यामुळे स्नेहाच्या मनातील संशयाचे भूत पळाले तर डॉ. यशनेही स्विटीसोबतची मैत्री तोडून आपल्या संसाराकडे लक्ष देण्याचे ठरविले. अशाप्रकारे विस्कटलेला संसार भरोसा सेलमुळे पुन्हा फुलला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Love of children doctor couple love again in marriage life adk 83 ysh

First published on: 30-05-2023 at 14:36 IST
Next Story
“नागपुर की ट्रैफिक, बोलें तो सच में तकलीफ” वाहतूक व्यवस्था कोलमडली; बेशिस्त वाहतुकीमुळे नियम पाळणाऱ्यांना मनस्ताप