पत्नीला प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करणाऱ्या मूकबधिर युवकाची रुग्णालयातील मूकबधिर असलेल्या परिचारिकेशी ओळख झाली. रुग्णालयातील १० दिवसांच्या मुक्कामात परिचारिका आणि युवक दोघेही एकमेकांशी हातवारे-खाणाखुनाच्या सांकेतिक भाषेतून संवाद साधत होते. त्यामुळे त्यांच्यात जवळिकता वाढली.

हेही वाचा- नागपूर : ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरच समपुदेशकाची नियुक्ती’

दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांचाही संसार तुटण्याच्या काठावर येऊन पोहचला. हे प्रकरण भरोसा सेलमध्ये पोहचले. चौघांपैकी तिघे मूकबधिर असल्यामुळे पोलिसांची पंचाईत झाली. त्यांनी लगेच शंकरनगरातील मूकबधीर शाळेतील शिक्षकांची मदत घेतली. दोन्ही दाम्पत्यांची समजूत घालून दोघांचाही विस्कळित होणारा संसार सुरळित मार्गावर आणला. भरोसा सेलने केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.

सुशांत (बदललेले नाव) हा अजनीत राहतो. तो जन्मापासून मूकबधीर आहे. मूकबधिर शाळेत शिक्षण घेतल्यानंतर एका नामांकित कंपनीत नोकरीला लागला. मूकबधीर सुशांतसाठी एखादी मूकबधीर मुलगी शोधून लग्न करण्याचे आईवडिलांनी ठरविले. त्यांची नातेवाईक असलेली रिया (बदललेले नाव) ही सुशांतला आवडली. तिची आर्थिक परिस्थिती खूपच बेताची होती. आईवडिलांनी रियाची समजूत घातली. त्यामुळे तिने मूकबधिर मुलाशी लग्नास होकार दिला. दोघांचे लग्न झाले व त्यांच्या संसारवेलीवर मुलगा जन्मास आला. घरात आनंदीआनंद होता.

हेही वाचा- नागपूर : विदर्भाचे आंदोलन संसदेपर्यंत घेऊन जाणार – डॉ. श्रीनिवास खांदेवाले

त्यानंतर रियाला पुन्हा प्रसुतीसाठी एका रुग्णालयात दाखल केले. रियाला गोंडस मुलगी झाली. त्या रुग्णालयात असलेली मूकबधीर परिचारिका प्रियंका (काल्पनिक नाव) हिच्याशी सुशांतची ओळख झाली. दोघेही हातवारे आणि खुणांच्या सांकेतिक भाषेत संवाद साधत होते.

मूकबधिर प्रियंका ही विवाहित असून तिचा पती अक्षय (काल्पनिक नाव) सुध्दा मूकबधिर आहे. अक्षय शासकीय कर्मचारी आहे. प्रियंका-अक्षय यांना ६ वर्षांचा मुलगा आहे. सुशांतला त्याची सांकेतिक भाषा समजणारी प्रियंका आवडायला लागली. रुग्णालयातील १० दिवसांत दोघांचेही सूत जुळले. दोघेही विवाहित आणि दोन मुलांचे आईवडिल असल्याचे विसरून एकमेकांच्या प्रेमात पडले.

हेही वाचा- शाळांमध्ये तांदूळ आहेत; पण इंधन, तेल नाही.. ; राज्यात शालेय पोषण आहार योजनेची दयनीय स्थिती

सुशांतचे संसारात लक्ष नव्हते. त्यामुळे रियाला संशय आला. तो वारंवार कुणाशीतरी ‘व्हिडिओ कॉल’वर असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने रात्रीच्या सुमारास सुशांतचा मोबाईल घेतला. त्यात दोघांचे फोटो, व्हिडिओ आणि प्रेमाचे संदेश दिसून आले. तिने पतीला याबाबत विचारले असता घरात वाद सुरू झाला. मूकबधीर सुशांत तिच्याशी हातवारे करून भांडायला लागला. प्रेम असल्याचे सांगायला लागला. त्यामुळे रियाने भरोसा सेलमध्ये धाव घेतली.

हेही वाचा- यवतमाळ : देशाची वाटचाल विनाशाकडे; अर्थतज्ज्ञ प्रा. देसरडा यांची टीका

भरोसा सेलला तक्रार मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी रिया आणि सुशांतला बोलावले. त्यानंतर प्रियंका आणि अक्षयला बोलावले. चारपैकी तीन मूकबधिर असल्याने त्यांची सांकेतिक भाषा पोलिसांना कळत नव्हती. भाषेची अडचण सोडविण्यासाठी सूर्वे यांनी लगेच चौघांनाही मूकबधीर शाळेत नेले. तेथे दोन शिक्षकांना विनंती केली. सुशांत-प्रियंका आणि अक्षय यांच्याशी शिक्षकांनी संवाद साधला. त्यांचा संसार विस्कटू नये म्हणून सामजस्याने समजूत घातली. सुशांत आणि प्रियंका यांच्या चूक झाल्याचे लक्षात आले. शेवटी दोघांनीही नाद सोडून आपापल्या संसारात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्यानंतर गुंता सुटला