पुण्यात कपड्याच्या दुकानात काम करीत असताना सहकारी तरुणीशी युवकाचे सूत जुळले. दोघेही ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायला लागले. मात्र, दुकानात नव्याने लागलेल्या तरुणीवर युवकाचा जीव जडला.

दुसऱ्या प्रेयसीसोबत राहता यावे, यासाठी युवकाने पहिल्या प्रेयसीचा गळा आवळून खून केला आणि दुसऱ्या प्रेयसीला घेऊन पलायन केले. पोलिसांनी दोघांचाही शोध घेऊन नागपुरातून अटक केली. आशीष भोलसे (२० रा. सासवड, पुरंदर, पुणे) आणि रिया (२०) अशी अटकेतील प्रेमीयुगुलांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशीष भोसले हा पुण्यातील हिंजवडमध्ये कपड्याच्या मोठ्या दुकानात कामाला होता. त्याच दुकानात कीर्ती देढेकर (२०, रा. हिंजवड) ही तरुणी दीड वर्षांपूर्वी दुकानात नोकरीवर लागली. दुकानात सोबत काम करताना दोघांचे सूत जुळले. आशीषने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, कीर्तीने आपल्या आईवडिलांना आशीषवर प्रेम असून लग्न करणार असल्याचे सांगितले. मात्र, कीर्तीच्या घरच्यांचा दोघांच्या लग्नाला विरोध होता. काही दिवस दोघांत ताटातूट झाली. मात्र, दोघांनाही करमत नव्हते. त्यामुळे कीर्ती आणि आशीषने लग्न न करता ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. गेल्या ९ महिन्यांपूर्वीपासून दोघेही पती-पत्नीप्रमाणे राहू लागले होते. दोघांचाही विनालग्नाचा संसार सुरळीत सुरू होता. दोघेही सोबत कामाला जात होते.

नागपूरची एक तरुणी पुण्यातील एका कपड्याच्या शोरुममध्ये व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. तिने आपल्या २० वर्षीय लहान बहीण रियाला हिंजवडीतील कीर्ती व आशीष कार्यरत असलेल्या कपड्याच्या दुकानात नोकरी लावून दिली. काही दिवसांतच आशीषची नजर रियावर पडली. त्याने तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर तिलाही प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आशीष व रियामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. कीर्तीच्या लक्षात येताच तिने आशीषशी वाद घालून भांडण केले. तसेच रियालाही मारहाण करीत प्रियकराच्या आयुष्यातून निघून जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे रिया नागपूरला घरी परतली.

आशीषचा जीव रियावर जडला होता. त्यामुळे त्याने कीर्तीला आईकडे जाण्यास सांगितले. मात्र, ती परत कुटुंबीयांकडे जाण्यास तयार नव्हती. रियाचे प्रेम मिळवण्यासाठी त्याने कीर्तीचा काटा काढण्याचा कट रचला. १९ जुलैला आशीषने कीर्तीचा गळा आवळून खून केला आणि पळ काढला. हत्याकांडाची घटना २० जुलैला उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यासाठी तपासचक्र फिरवत आरोपी आशीषचा शोध सुरू केला.

पहिली प्रेयसी कीर्तीचा खून केल्यानंतर आशीष मुंबईला पळून गेला. तिथून नागपूरची प्रेयसी रियाला फोन केला. कीर्तीने आत्महत्या केल्याचे सांगून लग्न करून सोबत राहण्याची ‘ऑफर’ त्याने दिली. आशीषने रियाला मुंबईला बोलावले. ती लगेच मुंबईला पोहोचली आणि प्रियकर आशीषला घेऊन नागपूरला आली. पुणे पोलीस सतत आरोपीच्या मोबाईल लोकेशनवर लक्ष ठेवून होते. त्याचे नागपुरातील लोकेशन मिळाले. त्यांनी नागपूर पोलिसांना आशीष आणि रियाला ताब्यात घेण्यासाठी मदत घेतली. दोघेही हातात हात घालून अंबाझरी तलावावर जात असताना सीताबर्डी पोलिसांनी दोघांनी ताब्यात घेतले आणि पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले.