लोकसत्ता टीम
नागपूर: शालेय वयापासून प्रेमसंबंध ठेवल्यानंतर वयाची १८ वर्षे पूर्ण होताच प्रेयसीने लग्नास नकार दिला. तिच्या प्रेमात वेडा झालेला प्रियकर नकार पचवू शकला नाही. त्याने ब्लेडने हाताच्या नसा कापण्याचा प्रयत्न करीत गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनील (२१, कळमना) असे मृत प्रियकराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहाव्या वर्गात शिकत असतानाच आठव्या वर्गात शिकणाऱ्या रिया (काल्पनिक नाव) हिच्यासोबत सुनीलची मैत्री झाली. तेव्हापासूनच दोघेही प्रेमात पडले. दोघांनीही एकाच महाविद्यालयात प्रवेश घेतला. दोघांचे प्रेमप्रकरण कायम होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ती वयाच्या १६ व्या वर्षीच लग्न करण्यासाठी तयार झाली. दोघांनीही घरातून पळ काढला. मात्र, ती अल्पवयीन असल्यामुळे तिच्या आईवडिलांनी पोलिसांत अपहरण केल्याची तक्रार दिली. त्यामुळे सुनीलवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. मात्र, दोघांच्याही भेटी-गाठीत खंड पडला नाही. कुटुंबीयांचा विरोध झुगारून दोघांचे संबंध होते.
आणखी वाचा- नागपूर: उपराजधानीत दुसरा ‘एच ३ एन २’ग्रस्ताचा मृत्यू, परंतु मृत्यूचे कारण…
सुनील बुटीबोरीतील टायरच्या कंपनीत नोकरीला लागला. १८ वर्षे पूर्ण झाल्यामुळे आता लग्न करण्यासाठी दोघेही प्रयत्नात होते. गेल्या महिन्यांत सुनीलच्या भावाचे लग्न पार पडले. त्याच्या लग्नानंतर या दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. मात्र, ९ मार्चला रियाने त्याची भेट घेतली. तिने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे सुनील नैराश्यात गेला. त्याने हाताची नस ब्लेडने कापली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला कुटुंबीयांनी रुग्णालयात नेले. त्यानंतर तो स्वत:ला खोलीत कोंडून घेऊन एकटा राहायला लागला. प्रेयसीने दिलेल्या नकारामुळे तो पूर्णत: खचला होता. त्याने १५ मार्चला दुपारच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा भाऊ बाजारातून घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
प्रियकराने आत्महत्या केल्याची वार्ता कळताच प्रेयसीने घराला कुलूप लावून कुटुंबासह पळ काढला. त्यामुळे परिसरातील वातारण तापले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली. सुनीलला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्यामुळे रियावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी भूमिका घेतली आहे.