नागपूर : सध्याच्या जागतिक भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः पश्चिम आशियातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा एलपीजी आयातदार असल्याने त्याचा परिणाम देशावर होऊ शकतो.

भारतात दरवर्षी सुमारे ३३ दशलक्ष मेट्रिक टन एलपीजीची मागणी असून त्यातील जवळपास दोन-तृतीयांश भाग आयातीवर अवलंबून आहे, तसेच आयातीपैकी सुमारे ८५–९० टक्के पुरवठा मध्यपूर्व देशांकडून येतो. त्यामुळे त्या प्रदेशातील युद्धजन्य परिस्थिती, समुद्री वाहतुकीतील अडथळे किंवा पुरवठ्यातील खंड यांचा थेट परिणाम भारतातील स्वयंपाक गॅस उपलब्धतेवर होऊ शकतो.

याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संभाव्य तुटवडा टाळण्यासाठी देशांतर्गत रिफायनऱ्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले असून पर्यायी आयात स्रोतांचा शोधही सुरू केला आहे. काही भागांत नागरिकांनी संभाव्य तुटवड्याच्या भीतीने आगाऊ बुकिंग करण्यास सुरुवात केल्यामुळे मागणीत अचानक वाढ झाली असून काही शहरांत सिलिंडर बुकिंगमध्ये किमान २१ दिवसांचा अंतराचा नियम लागू करण्यात आला आहे, जेणेकरून साठेबाजी रोखता येईल.

अधिकाऱ्यांच्या मते सध्या देशात एलपीजीचा प्रत्यक्ष तुटवडा नसला तरी जागतिक परिस्थिती दीर्घकाळ तणावपूर्ण राहिल्यास आयात, वाहतूक आणि किंमतींवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने आयात स्रोतांचे विविधीकरण, देशांतर्गत उत्पादन वाढ आणि साठा व्यवस्थापन या उपाययोजना महत्त्वाच्या ठरत आहेत.

१० मार्चनंतर काय होणार ?

नागपूरमध्ये गॅस सिलिंडरच्या संभाव्य टंचाईबाबत ग्राहकांना सतर्क करण्यासाठी काही गॅस वितरकांकडून सूचना फलक लावण्यात येत आहेत. अशाच एका फलकावर दिलेल्या माहितीनुसार, येत्या १० तारखेपासून गॅस सिलिंडरची मोठ्या प्रमाणावर कमतरता निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय परिस्थिती तसेच इंधनाशी संबंधित तणावपूर्ण घडामोडींमुळे गॅस पुरवठा प्रभावित होऊ शकतो, असे या सूचनेत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी तातडीने गॅस बुकिंग करून सिलिंडर भरून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सरकारच्या निर्देशानुसार बुकिंग आणि ओटीपी पडताळणी अनिवार्य करण्यात आल्याने, बुकिंग किंवा ओटीपीशिवाय गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिला जाणार नाही,

असेही या सूचनेत स्पष्ट करण्यात आले असून संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी वेळेत आवश्यक कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या सिलिंडर मिळणे बंद होण्याबाबत काहीही अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.