HPCL LPG Gas Subsidy : नागपूर : ‘उपलब्ध आयकर नोंदीनुसार तुमचे वार्षिक उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. सात दिवसांत हरकत नोंदवा, अन्यथा गॅस अनुदान बंद केले जाईल,’ असा संदेश अलीकडे अनेक गॅस ग्राहकांच्या भ्रमणध्वनीवर येत असून त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा संदेश खरोखरच अधिकृत आहे की फसवणुकीचा प्रकार, याबाबत अनेकजण साशंक आहेत.

ग्राहकांच्या मोबाईलवर येणारा सदर संदेश हिंदुस्तान पेट्रोलियम महामंडळाच्या नावाने पाठविण्यात येत आहे. त्यात ग्राहकांना टोलमुक्त क्रमांक १८००-२३३३-५५५ वर संपर्क करण्यास किंवा दिलेल्या दुव्यावर हरकत नोंदविण्यास सांगण्यात आले आहे. “निर्धारित वेळेत प्रतिसाद न दिल्यास गॅस अनुदान बंद केले जाऊ शकते,” असा इशाराही संदेशात देण्यात आला आहे. दरम्यान, अनेक ग्राहकांना गेल्या काही वर्षांत अनुदान अत्यल्प प्रमाणात मिळत असल्याने प्रत्यक्ष आर्थिक परिणाम कमी असला तरी अचानक आलेल्या संदेशामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या ग्राहकांच्या मोबाईलवर येणाऱ्या संदेशाबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

काय आहे नियम?

केंद्र सरकारने २०१६ पासून वार्षिक करपात्र उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या कुटुंबांना गॅस अनुदानासाठी अपात्र ठरविले आहे. पती-पत्नीचे एकत्रित उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यासही हा नियम लागू होतो. त्यामुळे अशा ग्राहकांचे अनुदान बंद केले जाऊ शकते. त्यामुळे दहा लाखावर उत्पन्न असलेल्या ग्राहकांचे अनुदान बनवण्याची शक्यता आहे.

संदेश अधिकृत असण्याची शक्यता

ग्राहकांना आलेल्या संदेशातील टोलमुक्त क्रमांक हा गॅस ग्राहक सेवा क्रमांकाशी जुळत असल्याने हा संदेश अधिकृत प्रक्रियेचाच भाग असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र संदेशात देण्यात आलेला दुवा हा कंपनीच्या मुख्य अधिकृत संकेतस्थळाचा नसल्याने अनेक ग्राहक साशंक झाले आहेत. सायबर तज्ज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत ग्राहकांनी थेट संदेशातील दुव्यावर स्पर्श करण्याऐवजी अधिकृत संकेतस्थळ किंवा भ्रमणध्वनी अनुप्रयोगाचा वापर करून माहिती तपासावी.

ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?

भ्रमणध्वनीवर आलेल्या कोणत्याही दुव्यावर थेट स्पर्श करू नये. एकवेळ संकेतांक, बँक तपशील, आधार किंवा कायम खाते क्रमांकाची माहिती शेअर करू नये. अधिकृत संकेतस्थळ किंवा अनुप्रयोगावर जाऊन अनुदानाची स्थिती तपासावी. शंका असल्यास अधिकृत ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधावा.