अकोला : मध्य प्रदेशमधील खंडवा येथील एक ११ वर्षीय चिमुकला घरातून अचानक बेपत्ता झाला होता. तो अकोला रेल्वेस्थानकावर आढळून आला. मूकबधिर असल्याने त्याचा पत्ता आणि कुटुंबाचा शोध घेणे प्रचंड आव्हानात्मक होते. किचकट तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून ‘आधार कार्ड’द्वारे चिमुकल्याची माहिती मिळवण्यात आली. अखेर ५३ दिवसांनंतर त्या चिमुकल्याची प्रशासनाने कुटुंबीयांसोबत भेट घडवून आणली. आपल्या मुलाला सुखरुप बघताच आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.

कुटुंबाचा शोध घेणे होते अत्यंत अवघड

लोहमार्ग ‘चाइल्ड हेल्पलाईन’च्या कर्मचाऱ्यांना ८ एप्रिल रोजी अकोला रेल्वेस्थानकावर एक बालक एकटाच आढळून आला. त्याला बाल कल्याण समितीच्या आदेशाने शासकीय बालगृहात दाखल केले. तो चिमुकला मूकबधिर असल्याने त्याच्या कुटुंबाचा शोध घेणे अत्यंत अवघड होते. मुकबधिर विद्यालयाच्या शिक्षिकेला त्याच्याशी संवाद साधण्यासाठी पाचारण केले. प्रयत्न झाला, मात्र त्या मुलाचा पत्ता कळू शकला नाही.

आधार कार्डद्वारे असा लागला शोध

आधार क्रमांकाच्या मदतीने पत्त्याचा शोध सुरू झाला. त्या मुलाच्या आधार नोंदणीचा प्रयत्न झाला. अगोदरच आधार नोंदणी असल्याने नवी नोंदणी रद्द झाली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर यांनी प्रकरणाची माहिती देत मूळ कार्डवरील पत्ता मिळवून देण्याची विनंती आधार कार्ड प्रतिनिधींकडे केली. नियमांमुळे तसे करता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जुना आधार क्रमांक मिळण्यासाठी तक्रार नोंदवून घेतली. जुने कार्ड मिळवण्यासाठी लागणारा ओटीपी व इतर तांत्रिक सहकार्य महाआयटी जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद ठाकूर यांनी केले.

मुंबईच्या आधार कार्यालयाशी संपर्क करून जुना आधार क्रमांक प्राप्त केला. आधार प्रणालीत स्कॅनिंग, बालकाच्या डोळ्यांचे छायाचित्र घेऊन पूर्ण माहिती मिळवण्यात आली. त्यावर मोबाइल क्रमांक मिळाला. त्यावर संपर्क साधून मुलाच्या वडिलांशी संवाद साधला. मुलाच्या शोधात असलेल्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. त्यांनी ‘व्हिडिओ कॉल’ करून मुलाशी संवाद साधला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुलगा आई-वडिलांकडे सुपूर्द

त्या मुलाचे आई, वडील व काका आज, १ जूनला अकोला येथे आले. बालकल्याण समितीने सर्व प्रक्रिया पूर्ण करून मुलाला प्रवेश मुक्त केले. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या उपस्थितीत मुलाला आई-वडिलांना सुपूर्द केले. यावेळी बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. अनिता गुरव, सदस्य राजेश देशमुख, प्रांजली जयस्वाल, डॉ. विनय दांदळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, शासकीय बालगृहाच्या अधीक्षक जयश्री हिवराळे, शिक्षक संजय मोटे, राजेश अंभोरे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील लाडुलकर, सुनील सरकटे, स्वयंसेवी संस्थेचे महेंद्र गणोदे आदी उपस्थित होते.