नागपूर : माडिया संस्कृतीची जगाला ओळख करून देण्यासाठी आणि आदिवासी युवकांचे कौशल्य जगासमोर आणण्यासाठी भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने माडिया महोत्सवाचा घाट घातला खरा, पण या महोत्सवापासून माडिया जमातीलाच दूर ठेवण्यात आले. एवढय़ावरच प्रशासन थांबले नाही तर शिळे अन्न देऊन महोत्सवातील आदिवासी युवकांची एकप्रकारे थट्टा करण्यात आली. त्यामुळे कोटय़वधी रुपये खर्चून आयोजित केलेला महोत्सव नेमका कुणासाठी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 माडिया महोत्सव आयोजित करताना भामरागड व परिसरातील दुर्गम भागातील माडिया समाजाला  मुख्य प्रवाहात आणण्याचा उद्देश असल्याचे सांगितले गेले. त्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून कोटय़ावधींच्या निधीची व्यवस्था करण्यात आली. मात्र, ज्यांची संस्कृती प्रशासनाला जगासमोर आणायची होती, तोच घटक या महोत्सवातून बाहेर राहिला. ज्यांना माडिया संस्कृतीचा गंधही नाही, अशा उपराजधानीतील कार्यक्रम व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीला आयोजनाची धुरा सोपवण्यात आली. त्यामुळे माडिया संस्कृतीची झलक किंवा त्यांच्या भाषेचा कुठेही वापर होताना दिसून येत नव्हता.

स्थानिकांना या महोत्सवात  सहभागी करण्यात आले नाही. १०९ गावांची भामरागड पट्टी पारंपरिक इलाका समिती आहे. माडिया संस्कृतीच्या प्रसाराचे काम करणाऱ्या या समितीलाही महोत्सवात स्थान नव्हते. उद्घाटन सोहोळय़ात मात्र विभागीय आयुक्तांपासून इतर अधिकाऱ्यांनी पुरेपूर आनंद लुटला. महोत्सवात अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेसाठी परिसरातून स्पर्धक आले होते. परंतु, मुलींसाठी स्वच्छतागृह वा इतर कोणतीही व्यवस्था नव्हती. ही मुले अक्षरश: उपाशी राहिली होती. त्यांनी अन्न मागितल्यानंतर मुलांना शिळे आणि आंबलेला भात देण्यात आला. त्याची तक्रार करण्यासाठी जात असताना त्यांना मध्येच थांबवण्यात आले. त्यावरून अखेरच्या दिवशी आयोजकांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

आपल्याच जिल्ह्यात उपेक्षा

याआधी राष्ट्रीय स्तरावर आम्ही आमची कला सादर केली.  त्या ठिकाणी आमचे अतिशय सन्मानपूर्वक आतिथ्य करण्यात आले.  येथे मात्र आपल्याच जिल्ह्यात आम्ही आदरतिथ्यांपासून वंचित राहिलो. जेवणाची आबाळ झाली, अशी खंत चामोर्शी तालुक्यातील राष्ट्रीय कलावंत चंगोमी शेडमाके यांनी व्यक्त केली.

माडिया महोत्सवातील स्पर्धकांची आम्ही उत्तम व्यवस्था केली. जेवणाचा दर्जा थोडाफार कमी-जास्त होऊ शकतो. तसेच स्थानिकांना आम्ही महोत्सवात सन्मानाने आमंत्रित केले होते. स्थानिक समितीच्या लोकांना कदाचित व्यासपीठावर स्थान मिळाले नाही. मात्र, समारोप सोहोळय़ात आम्ही या त्रुटी नक्कीच दूर करू.

-शुभम गुप्ता, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, भामरागड