scorecardresearch

राज्यात आता ‘मगर सफारी’

गेल्या काही वर्षांत कांदळवन कक्षाने अनेक नवे उपक्रम राबवले असून राज्यात पहिल्यांदाच खारफुटीच्या जंगलात ‘मगर सफारी’चा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

नागपूर : गेल्या काही वर्षांत कांदळवन कक्षाने अनेक नवे उपक्रम राबवले असून राज्यात पहिल्यांदाच खारफुटीच्या जंगलात ‘मगर सफारी’चा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील घनदाट खारफुटीच्या जंगलात मागील आठवडय़ात अशा सफारीला सुरुवात झाली.

राज्य वनविभागाच्या खारफुटी आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानने सोनगावला पर्यटन वाढीसाठी व खारफुटी, सागरी जैवविविधता संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी समुदाय-आधारित संवर्धन उपक्रम हाती घेतला. खारफुटीच्या पायवाटेवर पर्यटकांना घेऊन जाण्यासाठी ३० ग्रामस्थांची नेमणूक, बोटीवरून फिरणे, मगर पाहणे, पक्षी निरीक्षण तसेच सोनगाव गावात वास्तव्याची सोय करून देण्यात आली आहे. सोनगावात सकाळी साडेसात ते सायंकाळी सहा वाजता दरम्यान मगर सफारी केली जाते. ती कमी भरतीवर अवलंबून असते. कारण कमी भरतीच्यावेळी मगरी मोठय़ा प्रमाणात दिसतात. या ३० गावकऱ्यांना सुमारे सहा महिने  प्रशिक्षण देण्यात आले. वशिष्ठी नदीच्या खाडीमध्ये बोटीमध्ये सुमारे २० मगरी दिसतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. २०१९ ते २०२१ दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात, इला फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेला गड आणि वाशिष्ठी नद्यांमध्ये १०७ मगरी आढळल्या. सोनगावातील तरुण रोजगाराच्या शोधात शहरांकडे स्थलांतर करीत आहे.

कानगावमध्ये ३ मे रोजी या सफारीला सुरुवात करण्यात आली. हे गाव  कोकणपट्टय़ात वशिष्टी नदीकाठी वसले आहे. येथे वास्तव्याची व्यवस्था करण्यात आली असून पर्यटकांना स्थानिक जेवणाचा आस्वाद घेता येतो. पर्यटकांना आता खारफुटी जंगलासोबत मगरही पाहता येईल.

– वीरेंद्र तिवारी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक व कांदळवन कक्ष प्रमुख

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Magar safari state now kandalvan undertaking thorns forest ysh

ताज्या बातम्या