MAHA TET 2025 Certificate: वर्धा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही विविध परीक्षा घेत असते. त्यात TET म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ही महत्वाची म्हटल्या जात असते. कारण ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याखेरीज शिक्षक म्हणून नियुक्ती मिळत नाही. इतर शैक्षणिक पात्रता व त्यानंतर ही परीक्षा असे निवड करण्याचे सूत्र आहे.
अंतिम निकाल
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे नोव्हेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा (MAHATET) अंतिम निकाल लागल्यानंतर, आता पात्र उमेदवारांना मूळ प्रमाणपत्रे वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. राज्यातील सर्व पात्र उमेदवारांना त्यांची पात्रता प्रमाणपत्रे येत्या १८ मे २०२६ ते ०८ जून २०२६ या कालावधीत वितरित केली जाणार आहेत.महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २३ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेतील पेपर क्रमांक १ (इयत्ता १ ली ते ५ वी स्तर) आणि पेपर क्रमांक २ (इयत्ता ६ वी ते ८ वी स्तर) चा अंतिम निकाल ३ फेब्रुवारी २०२६ रोजी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात आला होता. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांची मूळ प्रमाणपत्रे संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद आणि मुंबई येथील शिक्षण निरीक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम) यांच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहेत.
स्वतः संपर्क
उमेदवारांनी स्वतः संपर्क साधण्याचे आवाहन पात्रताधारक उमेदवारांनी परीक्षा परिषदेच्या http://www.mscepune.in या अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे. उमेदवारांनी ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षा दिली होती, तेथील जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किंवा शिक्षण निरीक्षक मुंबई यांच्या कार्यालयाशी स्वतः संपर्क साधून आपले प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यायचे आहे.
प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अशी आहेत. उमेदवारांना प्रमाणपत्र घेण्यासाठी जाताना खालील कागदपत्रांच्या प्रती आणि मूळ कागदपत्रे सोबत नेणे बंधनकारक आहे.शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र (Hall Ticket) आणि गुणपत्रिका प्रत, डी.टी.एड. उत्तीर्ण गुणपत्रक/प्रमाणपत्र किंवा बी.एड. उत्तीर्ण प्रमाणपत्र/गुणपत्रक, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र तसेच माजी सैनिक असल्यास त्याबाबतचा पुरावा.ओळखपत्र (आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा निवडणूक ओळखपत्र).
कडक नियमावली.
कार्यालयांसाठी कडक नियमावली आहे. परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक आणि महेश चोथे यांनी दिलेल्या आदेशानुसार, प्रमाणपत्र वितरित करताना पारदर्शकता राखण्यासाठी कडक नियमावली करण्यात आली आहे. उमेदवाराला प्रमाणपत्र देताना, त्याच्या प्रमाणपत्राच्या मागील पृष्ठावर शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण निरीक्षक यांच्या समक्ष स्वाक्षरी घेणे आवश्यक आहे. तसेच वितरणाची पेपरनिहाय नोंदवही ठेवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
पात्र उमेदवारांना काही कारणास्तव प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास त्यांनी संबंधित कार्यालयाकडे लेखी तक्रार नोंदवावी, अशा तक्रारींची शहानिशा करून अहवाल परीक्षा परिषदेकडे पाठवला जाईल, अशी माहिती परिषदेतर्फे देण्यात आली आहे.
