वर्धा : सर्वत्र गाजलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेबाबत पुढे काय, असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्याचे उत्तर आज सायंकाळी शासनाने शोधले आहे. ही परीक्षा कशी होणार, कोण घेणार, किती वेळा घेणार, याचा तपशील जाहीर करण्यात आला आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२६ च्या आयोजनाबाबत एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आणि अत्यंत पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी ‘आयबीपीएस’ (IBPS) या नामांकित संस्थेला अधिकृत पत्र पाठवले आहे. परिषदेचे आयुक्त महेश चोधे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र जारी करण्यात आले असून, यात परीक्षेच्या सुरक्षित आणि जलद नियोजनाची विनंती करण्यात आली आहे.
परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती
यापूर्वी महाटीईटी परीक्षा २८ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून ६,००,९२५ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरले होते. यामध्ये पेपर क्रमांक १ साठी २५,८०६१ आणि पेपर क्रमांक २ साठी ३,४२,०६४ परीक्षार्थींचा समावेश होता. या विद्यार्थ्यांसाठी राज्यात एकूण १,७२९ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव परीक्षा परिषदेने जाहीर प्रकटनाद्वारे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. आता ही परीक्षा नव्याने आणि पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. पत्रातील माहितीनुसार, १ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर निर्णय देताना सेवेतील शिक्षकांसाठी टीईटी (TET) परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. त्यानुसार, सेवेत असणाऱ्या ज्या शिक्षकांनी अद्याप ही परीक्षा उत्तीर्ण केलेली नाही, त्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सन २०२८ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या न्यायालयीन आदेशामुळे राज्यातील हजारो शिक्षकांसाठी ही आगामी परीक्षा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
वर्षातून दोनदा परीक्षेचे नियोजन
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आणि शिक्षकांना पुरेशी संधी उपलब्ध करून देण्यासाठी आता ही परीक्षा वर्षातून किमान दोनदा घेण्याचे प्रस्तावित आहे. यापुढील सर्व परीक्षा ऑनलाईन कार्यपद्धतीचा अवलंब करूनच घेतल्या जाणार आहेत. शासन निर्देशानुसार, ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुरक्षित, विश्वासार्ह आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी ‘IBPS’ कडे सोपवण्याचा परीक्षा परिषदेचा मानस आहे. त्यानुसार आवश्यक ती सर्व सांख्यिकीय माहिती आणि जिल्हानिहाय तपशील आयबीपीएस संस्थेला सादर करण्यात आला आहे.
या पत्रामुळे आता आगामी महाटीईटी परीक्षा लवकरच ऑनलाईन स्वरूपात घेतली जाण्याचे संकेत मिळत असून, लाखो उमेदवारांचे लक्ष आता परीक्षेच्या नवीन तारखांकडे लागले आहे. परीक्षा परिषदेने या पत्राच्या प्रती शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव तसेच शिक्षण आयुक्तांनाही माहितीसाठी सादर केल्या आहेत.
