अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या संचालकांची बिनविरोध निवड झाली. महाबीजच्या संचालकपदासाठी गुरुवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने वल्लभराव देशमुख आणि डॉ. रणजीत सपकाळ यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध ‘पॅटर्न’ चांगलाच गाजला. आता महाबीज संचालक पदाच्या निवडणुकीतही तोच ‘पॅटर्न’ लागू झाला आहे. विशेष म्हणजे मतपत्रिकेवर ही निवडणूक होणार होती.
शेतकऱ्यांसाठी बियाण्यांचे उत्पादन व विक्री करण्यासाठी राज्य शासनाचे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) आहे. त्याचे मुख्यालय अकोला शहरात आहे. शेतकरी भागधारकांमधून महाबीजच्या दोन संचालक पदांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होती.
यामध्ये विभाग एकमधून दोन, तर विभाग दोनमधून तीन उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. या निवडणुक प्रक्रियेत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. यामध्ये विभाग एकमधून माजी संचालक नानासाहेब देशमुख यांनी, तर विभाग दोनमधून ॲड. विष्णुपंत सोळंकी व भुषण देशमूख यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे वल्लभराव देशमुख व डॉ. रणजीत सपकाळ यांची आज महामंडळाच्या शेतकरी भागधारकांमधून महाबीजच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा महाबीज संचालक निवडणूक अधिकारी विनय वर्मा यांनी केली.
महाबीजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात संचालकांची बिनविरोध निवड हा ऐतिहासिक क्षण ठरला. महाबीजचे भागधारक, सर्व विभाग प्रमुख तसेच कर्मचारी उपस्थित होते. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. रिंगणातील उमेदवारांनी माघार घेतल्याने दोन्ही संचालक बिनविरोध निवडल्या गेले आहेत.
देशमुख सातव्यांदा, तर डॉ. सपकाळ दुसऱ्यांदा संचालक
शेतकरी भागधारकांमधून वल्लभराव देशमुख महाबीज संचालक पदावर सातव्यांदा निवडून गेले आहेत. डॉ. रणजीत सपकाळ यांची दुसऱ्यांदा संचालकपदी निवड झाली. या अगोदर माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे महाबीजचे संचालक होते. त्यांच्या जागेवरच डॉ. रणजीत सपकाळ यांची वर्णी लागली.
भाव फरकाची १७ कोटी रक्कम लवकरच वितरण
महाबीजची प्रगती, भागधारक व बिजोत्पादकांच्या हितासाठी नेहमीच प्राधान्य असेल, असे नवनिर्वाचित संचालक वल्लभराव देशमुख व डॉ. रणजीत सपकाळ यांनी सांगितले. संचालक डॉ. रणजीत सपकाळ यांनी महाबीज बिजोत्पादकांना सन २०२४-२५ वर्षातील भाव फरकाची १७ कोटी रक्कम लवकरच वितरीत होईल, असे देखील जाहीर केले.

