अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात (महाबीज) सनदी अधिकाऱ्यांना ‘रस’ नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. या महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर राहण्यात अधिकाऱ्यांची उदासीनता असून ५० वर्षांच्या कार्यकाळात तब्बल ३९ व्यवस्थापकीय संचालक लाभले. गत १६ वर्षांच्या काळात तर २३ अधिकारी आले आणि बदलीवर दुसरीकडे गेले. आता २४ व्या अधिकाऱ्यांनी आता पदभार स्वीकारला. एका अधिकाऱ्याचा अपवाद वगळता कुणीही दोन वर्षांचा कार्यकाळ सुद्धा पूर्ण केलेला नाही. या पदात अधिकाऱ्यांना ‘कमी’पणाची भावना का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नियुक्ती होताच इतरत्र बदलीचे वेध
राज्याचे मुख्यालय अकोला येथे असलेल्या महाबीजची स्थापना २८ एप्रिल १९७६ रोजी झाली. महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. वरिष्ठ ‘आयएएस’ या पदावर काम करण्यास इच्छूक नसतात. या पदावर नियुक्ती होताच इतरत्र बदलीचे त्यांना वेध लागतात. नव्या अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही महिन्यातच त्यांची बदली होत असल्याचा प्रत्यय गत १६ वर्षांत वारंवार आला. महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक हे प्रवाहाबाहेरील पद असल्याचा समज असून यावर बदली म्हणजे कमी महत्त्वाची जबाबदारी दिल्याची भावना अधिकाऱ्यांमध्ये असते. शिवाय महाबीजचे मुख्यालय अकोला असल्याने याठिकाणी येण्यास अधिकारी तयार होत नाहीत. या पदावर नियुक्ती होताच अधिकाऱ्यांची बदलीसाठी धडपड सुरू होते.
२०१० नंतर महाबीजच्या ‘एम.डी.’ पदावर अधिकारी रमले नाहीत
महाबीजच्या ५० वर्षांच्या कार्यकाळात ३९ अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालकपदावर नेमणूक झाली. टी. बालारमण महाबीजचे पहिले ‘एम.डी.’ होते. पुढील काळात या पदावर अनेक मोठ्या अधिकाऱ्यांनी कार्य केले. व्ही.एस. धुमाल, डॉ. प्रदीप व्यास या अधिकाऱ्यांनी चार वर्षांचा, तर सौरभ विजय यांनी तीन वर्षे १० महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला. २०१० नंतर महाबीजच्या ‘एम.डी.’ पदावर अधिकारी फारसे रमले नाहीत. गेल्या १६ वर्षांमध्ये तब्बल २४ वेळा विविध अधिकारी व्यवस्थापकीय संचालक पदावर लाभले. यामध्ये बहुतांश वेळा अधिकाऱ्यांची बदलीवर महाबीजच्या ‘एम.डी.’ पदावर नेमणूक झाती, तर काही वेळा अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार होता. या कालावधीत अनिल भंडारी यांनी दोन वर्षाचा कालावधी पूर्ण केला. इतर बहुतांश अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यापासून ८-१० दिवसांपासून ते दीड वर्षांपर्यंतच्या कार्यकाळात इतरत्र बदली करून घेतली.
राज्य शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज
महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार २ फेब्रुवारीपासून अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्याकडे होता. आता शासनाने दिलीप स्वामी यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक पदावर केली. त्यांनी ९ एप्रिलला कार्यभार स्वीकारला. त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष राहील. दरम्यान, महाबीजचे हे नफ्यात असणारे महामंडळ असून शेतकऱ्यांच्या जिवाळ्याची संस्था आहे. या ठिकाणी व्यवस्थापकीय संचालक पदावर अधिकाऱ्यांचा वारंवार बदल होत असल्याने त्याचा गंभीर परिणाम कामकाजावर होतो. राज्य शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज दिसून येते, असे मत महाबीजचे संचालक डॉ. रणजीत सपकाळ यांनी व्यक्त केले.
