अकोला : दुष्काळामुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. या गंभीर परिस्थितीत बीजोत्पादन देखील संकटात आले आहे. त्याचा मोठा परिणाम आगामी खरीप व रब्बी हंगामावर होणार असून कृषी क्षेत्राचे भवितव्यच टांगणीला लागल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे एक लाख क्विंटलवरील बीजोत्पादन दुष्काळामुळे घटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पुढील हंगामात बियाण्यांची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

दुष्काळी परिस्थितीचा बीजोत्पादनाला फटका

यंदा ‘एल-निनो’चा गंभीर दुष्परिणाम झाला. त्याच्या प्रभावामुळे अपुरे पर्यन्यमान झाले. जमिनीतील पाण्याची पातळी खालावली. पावसाअभावी खरीप हंगामातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. उत्पादन झपाट्याने घटले. बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता बीजोत्पादनावरही मोठे प्रश्नचिन्ह लागले. दुष्काळी परिस्थितीचा बीजोत्पादनाला फटका बसला. राज्यात सर्वाधिक बीजोत्पादन घेत शेतकऱ्यांना विविध पिकांचे वैविध्यपूर्ण वाण उपलब्ध करून देणाऱ्या महाबीजच्या प्रक्रियेवर दुष्काळाचा गंभीर परिणाम झाल्याचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी म्हणाले.

एक लाख चार हजार ७८५ क्विंटल बीजोत्पादन घटण्याच अंदाज

यंदाच्या खरीप हंगामामध्ये ३० हजार ९०५ हेक्टर जमिनीवर पाच लाख ३६ हजार ८०३ क्विंटल विविध पिकांचे बीजोत्पादन घेण्याचे नियोजन महाबीजने केले. त्या दृष्टीने लागवड करून बीजोत्पादनाची तयारी सुद्धा झाली. मात्र, पावसाने दडी मारल्याने विविध पिकांच्या बीजोत्पादनावर विपरित परिणाम झाला. त्यामुळे आता चार लाख ३२ हजार ०१८ क्विंटल बीजोत्पादन होण्याचा अंदाज महाबीजच्या वरिष्ठांनी व्यक्त केला. अपेक्षित नियोजनापेक्षा तब्बल एक लाख चार हजार ७८५ क्विंटल बीजोत्पादन घटणार आहे. दुष्काळाचा सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसला. तीन लाख ४० हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याचे उत्पादन घेण्यासाठी २७ हजार ११४ हेक्टर क्षेत्रावर बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यातून दोन लाख ६२ हजार ९७४ क्विंटल वाण उपलब्ध होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. ७७ हजार ०२६ क्विंटल सोयाबीन बियाण्याचे उत्पादन कमी होईल. दुष्काळजन्य परिस्थितीचा सोयाबीनसह, कापूस, तूर, मूग, उडीद, हरभरा, ज्वारी, सूर्यफूल आदींसह अनेक पिकांच्या बीजोत्पादनावर गंभीर व मोठा परिणाम झाला. त्यामुळे आगामी हंगामात बियाण्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे देखील तज्ज्ञांचे मत आहे.

इतर राज्यात बीजोत्पादनाचे प्रयत्न, रब्बी हंगामात नियोजन

राज्यातील एकूण बीजोत्पादनामध्ये महाबीजचा १५ टक्क्यांवर वाटा आहे. यंदाच्या खरीप हंगामात पाच लाख क्विंटलवर बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला. दुष्काळी परिस्थितीमुळे सुमारे एक लाख क्विंटल बियाण्यांचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामात बीजोत्पादनाचे नियोजन केले आहे, अशी माहिती महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी दिली. विदर्भ, मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळी परिस्थितीची झळ बसली. त्याचा परिणाम बीजोत्पादनावर झाला असून सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन घटले. या पार्श्वभूमीवर गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आदी राज्यांमध्ये विविध पिकांचे बीजोत्पादन घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे महाबीजचे उत्पादन महाव्यवस्थापक व्ही. व्ही. ठाकरे यांनी सांगितले.