नागपूर : राज्यातील वीज निर्मिती क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या महानिर्मिती या शासकीय कंपनीने एप्रिल २०२६ मध्ये ऐतिहासिक कामगिरी नोंदवत एका महिन्यातील सर्वाधिक वीज निर्मितीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला. या कालावधीत कंपनीने सरासरी ८,५९६ मेगावाॅट (६,१८८.४६९ दशलक्ष युनिट) वीज निर्मिती केली. उन्हाळ्यात वाढलेल्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर ही कामगिरी ग्राहकांसाठी दिलासादायक ठरली आहे.
महानिर्मितीने यापूर्वी एप्रिल २०२२ मध्ये सरासरी ८,२६२ मेगावाॅट (५,९४८.५९६ दशलक्ष युनिट) निर्मितीचा विक्रम नोंदवला होता; तो यंदा मोडीत निघाला. या यशात जलविद्युत आणि सौरऊर्जेचा महत्त्वाचा वाटा आहे. एप्रिल २०२६ मध्ये जलविद्युत निर्मिती सरासरी १,०७७ मेगावाॅट (७७५.७२५ दशलक्ष युनिट) इतकी झाली असून तोही एप्रिल महिन्यातील आजपर्यंतचा उच्चांक आहे. सौरऊर्जेची निर्मिती ५९ मेगावाॅट (४२.४०८ दशलक्ष युनिट) इतकी नोंदवली गेली असून ती आतापर्यंतची सर्वाधिक आहे.
वाढत्या तापमानामुळे विजेची मागणी वाढत असताना उत्पादनात सातत्य राखत उच्चांक गाठणे ही मोठी कामगिरी ठरली आहे. कोळसा, जल आणि सौरस्रोतांचा समन्वयित वापर, नियोजनबद्ध देखभाल आणि प्रभावी प्रकल्प व्यवस्थापन, यांमुळे हे यश शक्य झाल्याचे ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. राज्यातील औद्योगिक तसेच नागरी क्षेत्राला स्थिर वीजपुरवठ्यासाठी महानिर्मितीची ही कामगिरी महत्त्वपूर्ण आहे.
अधिकारी काय म्हणतात…
मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन आणि अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. यांच्या सूचनांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समन्वयित व समर्पित प्रयत्नांमुळे महानिर्मितीने एप्रिल २०२६ मध्ये वीज निर्मितीचे सर्व विक्रम मोडीत काढले. वीजेची वाढती मागणी लक्षात घेता, या कामगिरीमुळे नागरिकांचा कंपनीवरील विश्वास अधिक दृढ होईल.– अभय हरणे, संचालक (संचलन), महानिर्मिती, मुंबई.
महानिर्मितीची एकूण वीज निर्मिती क्षमता किती ?
महानिर्मिती ही राज्यातील सर्वात मोठी वीज निर्मिती करणारी शासकीय कंपनी असून तिची एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमता सुमारे १३,५०० मेगावॅटपेक्षा अधिक आहे.यामध्ये कोळसा-आधारित औष्णिक प्रकल्पांचा सर्वाधिक वाटा असून त्याखालोखाल जलविद्युत प्रकल्पांचा समावेश होतो. याशिवाय, सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांद्वारेही कंपनीने अक्षय ऊर्जेकडे वाटचाल सुरू ठेवली आहे.
राज्यातील कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर, भुसावळ, परळी आदी प्रमुख औष्णिक प्रकल्पांसह विविध जलविद्युत केंद्रांमुळे महानिर्मिती राज्याच्या वीजपुरवठ्याचा कणा मानली जाते. वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन क्षमता वाढविणे, नव्या प्रकल्पांची उभारणी आणि अक्षय ऊर्जेचा वाटा वाढविणे यावर कंपनीचा भर आहे.
