नागपूर : करोना निर्बंध हटल्यानंतरही ‘महाज्योती’ने नीट आणि जेईई परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ प्रशिक्षण देण्याचे धोरण कायम ठेवले आहे. २०२४ मधील परीक्षेसाठी राज्यातील १५ हजार मुला-मुलींना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य ‘महाज्योती’ने निश्चित केले आहे.

संपूर्ण देशात करोना निर्बंध मागे घेण्यात आले असून प्रत्यक्ष शिकवणी वर्गाला सुरुवात झाली आहे. जवळपास सर्वच परीक्षा ‘ऑफलाईन’ घेतल्या जात आहेत. मात्र, ‘महाज्योती’ने चालू सत्रात दहावीची परीक्षा दिलेल्या आणि अकरावी विज्ञान शाखेला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट आणि जेईईच्या ‘ऑनलाईन’ शिकवणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ‘महाज्योती’तर्फे २०२२ पासून नीट आणि जेईईचे मोफत ऑनलाईन प्रशिक्षण सुरू आहे. २०२४ ची तिसरी तुकडी आहे. यासाठी पंधरा हजार विद्यार्थ्यांना मोफत ‘ऑनलाईन’ प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ‘महाज्योती’ने ठेवले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना, ‘ऑनलाईन’ प्रशिक्षण, नामांकित कंपनीचा आठ इंची ‘टॅब’ (कायमस्वरूपी) आणि २०२४ ची नीट परीक्षा होईपर्यंत सहा जीबी ‘इंटरनेट डेटा’, या सर्व सुविधा मोफत पुरवण्याचे ‘महाज्योती’ने जाहीर केले आहे. तसेच जेईई नीट परीक्षेची आवश्यक सर्व पुस्तकेही विद्यार्थ्यांना मोफत घरपोच दिली जाणार आहेत. ‘ऑनलाईन’ शिकवणी १ जुलै २०२२ पासून सुरू होणार आहेत. २०२२ च्या मार्च महिन्यातील दहावीच्या परीक्षेत शहरी भागातील विद्यार्थ्यांने ७० टक्के तर ग्रामीण, आदिवासीबहुल क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी ६० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांने वर्ग ११ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन, शाळा-महाविद्यालयांच्या प्राचार्याचे ‘बोनाफाईड सर्टिफिकेट’ तसेच ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील जात आणि ‘नॉन क्रिमिलेयर’ प्रमाणपत्रही सादर करणे बंधनकारक आहे.

राज्यभरातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी प्रशिक्षण वर्गाचा लाभ मिळावा हा हेतू यामागे आहे. अकरावी, बारावीचे नियमित वर्ग सुरू असतानाच हे प्रशिक्षण द्यायचे आहे व सर्व विद्यार्थी शहरात येऊन प्रशिक्षण घेऊ शकत नाही. त्यामुळे ‘ऑनलाईन’ प्रशिक्षणाशिवाय पर्याय नाही.

– प्रा. दिवाकर गमे, संचालक, महाज्योती.