लोकसत्ता टीम
नागपूर : गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर लगेच ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मीचा सण आला. त्यामुळे बाजारात वेगवेगळ्या फुलांची मागणी वाढली आहे. एरवी ५० रुपयाला मिळणारा हार आता १०० ते १५० रुपयाला तर महालक्ष्मी पूजनासाठी लागणारे हार दीड हजारपासून ३ हजार रुपयांपर्यंत विकले जात आहेत. सर्वच फुले ही शंभर रुपये किलोच्यावर आहेत.
महालक्ष्मीची उद्या पूजा होणार आहे. त्यामुळे शहरातील बर्डी भागातील फूल बाजारात लोकांची सकाळपासून गर्दी वाढली. पावसामुळे फुले खराब झाली असून बाहेरून येणाऱ्या फुलांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे हारांचे भाव वाढले आहेत. निशिगंध, झेंडू, गुलाब यासह विविध फुलांचे हार घेण्यास नागरिक पसंती देतात. दोन मोठे हार आणि दोन लहान हाराची किंमत दीड हजारापासून ते तीन हजार रुपयापर्यंत असल्याचे फूल विक्रेता संघटनेचे प्रमुख विजय वंजारी यांनी सांगितले.
आणखी वाचा-खळबळजनक! विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे जुगार अड्डे
शहरातील बर्डी भागातील फूल बाजाराशिवाय महाल इतवारी, सक्करदरा, गोकुळपेठ, बर्डी, मंगळवारी बाजार या ठिकाणी अनेक ठिकाणी फुलांची दुकाने आहेत. महालक्ष्मी सणाला फुलांचे महत्त्व आहेच. सजावट करण्यासाठी फुले घ्यावीच लागतात. काल परवा एवढा भाव नव्हता, आज फुलांच्या हाराला दीड ते दोन रुपये जोडी असा भाव असल्याचे विजय वंजारी यांनी सांगितले, शेवंती, गुलाब, मोगरा, निशिगंध (गुलछडी), लिली, जुई, जरबेरा आणि चमेलीच्या फुलांना मागणी आहे.
फूल (किलो) भाव (रुपयात)
गुलाब (डच)- ४०० ते ५००
साधा गुलाब- १५० ते २००
पिवळा गोंडा- १५० – २००
नामधारी गोंडा- १२० – १५०
कलकत्ता गोंडा- २०० – २५०
शेवंती- १५० – २००
गुलछडी- २००- २२०
कापरी गोंडा- १२० – १४०
अस्टर- १३० – १५०