दोन प्रकल्पांचे काम सुरू, चार प्रस्तावित

नागपूर : राज्याच्या उपराजधानीत मेट्रो उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेली महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशन या कंपनीने टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यात मेट्रो उभारणीचे काम हाती घेतले आहे. राज्याबाहेर तेलंगणातही आराखडा तयार करून दिला आहे. सध्या या कंपनीच्या माध्यमातून नागपूर पुणे मेट्रो उभारणीचे काम सुरू आहे. नागपूरचे काम अंतिम टप्प्यात असून जानेवारी २०२२ अखेरीस हे काम पूर्ण होण्याचा दावा कंपनी करीत आहे. त्यासोबतच पुण्यातही मेट्रोचे काम सुरू आहे. याशिवाय नागपूर मेट्रो टप्पा-२, ठाणे रिंग मेट्रो, नाशिक मेट्रो-नियो प्रकल्प आणि पुण्यातील मेट्रोचा दुसरा टप्पा हे चार प्रकल्प प्रस्तावित आहेत. नागपूर मेट्रो टप्पा -२ चा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केला असून तो केंद्राकडे विचाराधीन आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून प्राप्त तपशीलात वरील बाब नमूद आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनीही याला दुजोरा दिला आहे. नागपूरलगतच्या छोटय़ा शहरांना जोडणाऱ्या ब्रॉडगेज प्रकल्पाच्या प्रस्तावावरही सध्या रेल्वेशी चर्चा सुरू असून या गाडीचे कोच स्थानिक उद्योगपतींच्या माध्यमातून नागपुरात तयार केले जाणार आहेत. ३० जानेवारी २०१४ रोजी नागपूर मेट्रोला तत्कालीन राज्य सरकारने मंजुरी दिली होती. त्यानंतर २१ ऑगस्ट २०१४ ला केंद्राने मंजुरी दिली. १ जून २०१५ रोजी नागपूर मेट्रोच्या कामाला सुरूवात झाली. या कामासाठीच महामेट्रो कंपनीची स्थापना झाली होती. अतिशय वेगात पूर्ण होणारा प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते. आतापर्यंत १३ .५ कि.मी.चा बर्डी-खापरी व ११ कि.मी. बर्डी ते लोकमान्यनगर या दोन मार्गिकेवर मेट्रोची सेवा सुरू आहे. बर्डी ते वैष्णदेवीनगर ही तिसरी मार्गिका सज्ज आहे. कामठी मार्गावरील कामही अंतिम टप्प्यात असल्याचे डॉ. दीक्षित यांनी स्पष्ट केले. कामातील गुणवत्तेबाबत महामेट्रोला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाले आहेत, हे येथे उल्लेखनीय.

प्रवाशांची संख्या वाढल्यास प्रत्येक मिनिटाच्या फरकाने मेट्रो सोडण्याची क्षमता व्यवस्थापनाची आहे. मेट्रो पूर्ण क्षमतेने धावू लागल्यास एका तासात ६० हजार प्रवासी प्रवास करू शकतील.

– डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो.