Premium

महानिर्मितीकडे केवळ दोन ते आठ दिवसांचाच कोळसा साठा! वाॅशरिजकडे मात्र लक्षावधी टन पडून

राज्यात पावसाळ्यात विजेची मागणी वाढली आहे. महानिर्मितीच्या वीजनिर्मिती प्रकल्पात कोळशाचा वापर वाढल्याने साठा केवळ दोन ते आठ दिवसांचा राहिला आहे.

mahanirmiti coal, only 2 to 8 days coal stock remaining, maharashtra coal crisis, coal crisis in maharashtra
महानिर्मितीकडे केवळ दोन ते आठ दिवसांचाच कोळसा साठा! वाॅशरिजकडे मात्र लक्षावधी टन पडून (संग्रहित छायाचित्र)

नागपूर : राज्यात पावसाळ्यात विजेची मागणी वाढली आहे. महानिर्मितीच्या वीजनिर्मिती प्रकल्पात कोळशाचा वापर वाढल्याने साठा केवळ दोन ते आठ दिवसांचा राहिला आहे. खासगी कोल वाॅशरिजमध्ये मात्र महानिर्मितीचा लक्षावधी टन कोळसा पडून आहे. त्यामुळे कोळसा टंचाईच्या नावावर वीजनिर्मिती विस्कळीत झाल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न अनुत्तरित आहे. राज्यात भर पावसात विजेची मागणी २६ हजार मेगावाॅटपर्यंत वाढली होती. त्यापैकी २३ हजार मेगावाॅटच्या जवळपासची मागणी महावितरणची होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आताही राज्यात विजेची मागणी २३ हजार मेगावाॅटच्या जवळपास आहे. ही मागणी जास्तच असून त्यापैकी १९ ते २० हजार मेगावाॅटच्या जवळपासची मागणी महावितरणची आहे. राज्यात विजेची मागणी वाढल्याने वीजनिर्मिती वाढवावी लागल्याने कोळशाचा वापरही अपेक्षेहून जास्त वाढला आहे. त्यामुळे महानिर्मितीच्या केंद्रामधील कोळशाचा साठाही झपाट्याने कमी झाला आहे. १८ सप्टेंबर २०२३ मध्ये महानिर्मितीच्या खापरखेडा, पारस या दोन वीज निर्मिती केंद्रात केवळ २ दिवसांचा, चंद्रपूर, भुसावळ, परळी या तीन केंद्रात केवळ ३ ते साडेतीन दिवसांचा, नाशिक केंद्रात ४.५ दिवसांचा तर कोराडी केंद्रात केवळ ८.५ दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक आहे.

हेही वाचा : नागपुरातील पूरबळींची संख्या पाचवर

केंद्रीय वीज प्राधिकरणाच्या नियमानुसार प्रत्येक केंद्रात किमान १५ दिवसांचा साठा असणे अपेक्षित आहे. परंतु, हा साठा खूप कमी आहे. एकीकडे वीजनिर्मिती केंद्र कोळशासाठी अडचणीत असताना दुसरीकडे महानिर्मितीच्या मालकीचा १३ लाख टनांवर कोळसा खासगी वाॅशरिजकडे पडून असल्याची तक्रार आहे. परंतु, महानिर्मितीकडून मात्र हा साठा कमी असल्याचा दावा केला आहे. वाॅशरिजमध्ये लक्षावधी टन कोळसा पडून असतानाच दुसरीकडे महानिर्मितीने सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात आणखी ३० लाख टन कोळशाची मागणी नोंदवल्याचे सांगत त्यामागे अर्थकारण असल्याचाही तक्रारदाराचा दावा आहे. परंतु, हे आरोप महानिर्मितीने फेटाळले आहे.

हेही वाचा : बंद घड्याळातून साकारले श्री गणराय! बुलढाण्यातील साक्षीचा कलाविष्कार

‘कोल वाॅशरिजकडे साडेतेरा लाख टन कोळसा शिल्लक नसून कमी आहे. शिल्लक कोळसा तातडीने धुवून वीजनिर्मिती प्रकल्पात पुरवठ्याच्या सूचना वाॅशरिजला केल्या आहेत. यंदा विजेची मागणी वाढल्याने नेहमीच्या तुलनेत जास्त कोळसा लागला. ऑक्टोबरमध्येही हिट वाढण्याचा अंदाज असल्याने आणखी कोळसा मागवण्यात आला आहे. हे सर्व काम पारदर्शकपणे केले जाते.’ – राजेश पाटील, कार्यकारी संचालक (कोळसा), महानिर्मिती, मुंबई.

महानिर्मिती प्रकल्पातील कोळशाची स्थिती (१८ सप्टेंबर २०२३)

प्रकल्प : कोळसा साठा

कोराडी : ८.५ दिवस
नाशिक : ४.५ दिवस
भुसावळ : ३.५ दिवस
परळी : ३.५ दिवस
पारस : २ दिवस
चंद्रपूर : ३ दिवस
खापरखेडा : २ दिवस

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mahanirmiti only have 2 to 8 days coal whereas washridge have lakhs of ton coal electricity demand increased in monsoon mnb 82 css

First published on: 26-09-2023 at 10:00 IST
Next Story
विश्लेषण : नागपूरमध्ये पावसाने इतका विध्वंस कसा घडवला?