नागपूर : दरवर्षी राज्यात रेल्वे फाटकावर २१ हजार नागरिकांचा मृत्यू होतो. त्यामुळे राज्य रेल्वे फाटकमुक्त करण्याचा निर्धार सरकारने केला आहे. महारेलने याबाबत आराखडा तयार केला असून राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित कालावधीत उड्डाणपूल तयार करण्याचा ‘प्लान’ रविवारी सांगितला.

या निश्चित कालावधीत पूर्ण होणार उड्डाणपूलाचे काम

नागपुरातील डिप्टी सिग्नल परिसरात रविवारी राज्यातील ९ उड्डाणपूल, रेल्वे भुयारी मार्गाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशीष जयस्वाल, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या. मुख्यमंत्री म्हणाले, महारेलने राज्यात १४५ रेल्वे फाटकावर उड्डाणपूल तयार करण्याचा आराखडा सादर केला आहे. या आराखड्याला तत्काळ मान्यता देण्यात येणार आहे. पुढील तीन वर्षांत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीयमंत्री गडकरींच्या मंत्रालयाने केली मदत

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज राज्यातील ९ उड्डाणपूल, रेल्वे भुयारी मार्गाचे लोकार्पण झाले. यासाठी रेल्वे मंत्रालयासह केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते परिवहन मंत्रालयाने मदत केली. महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जैस्वाल यांनी १४५ उड्डाणपुलाचा आराखडा दिला असून त्याला लगेच मंजुरी देण्यात येणार आहे. यात नागपुरातील उड्डाणपुलाचाही समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबईतही महारेलचे काम कौतुकास्पद

महारेल कंपनीने राज्यात विविध भागात चांगले काम केले. रेल्वे उड्डाणपूल किंवा भुयारी मार्गच नाही तर इतर कामेही केली. मुंबईतही अवघड जागेत पूल बांधण्याचे काम महारेल पूर्ण करते आहे. मुंबईत वेळेपूर्वी काम पूर्ण केले आहे. इंटिग्रेटेड युटिलिटी डक्टचे पेटंटही महारेलच्या नावावर झाले आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महारेल्वे नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करीत असल्याचेही ते म्हणाले.

पाच जिल्ह्यातील वाहतुकीस दिलासा

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा-अमरावती रेल्वे क्रॉसिंगवर चार पदरी उड्डाणपूल, चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर-वरोरा मार्गावर चंद्रपूर तडाली रेल्वे मार्गावर मोरवा येथे उड्डाणपूल, सांगली जिल्ह्यातील टाकारी-किर्लोसकरवाडी रेल्वे मार्गावर उड्डाणपूल व भिलवाडी-नांदरे रेल्वेमार्गावर भुयारी मार्ग, नाशिक जिल्ह्यातील खेरवाडी येथे खेरवाडी-डोना रेल्वेमार्गावर भुयारी मार्ग, नागपुरातील डिप्टी सिग्नल भागात भुयारी मार्ग, इतवारी-दिघोरी रेल्वे मार्गावर चारपदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे येथील वाहतुकीला मोठा दिलासा मिळाला आहे.