Maharashtra 11th 12th Student Transfer Module : वर्धा : राज्यातील ११ वीच्या प्रवेश प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. विद्यार्थी आता आपल्या पसंतीचे कनिष्ठ महाविद्यालय निवडून आवश्यक ती कागदपत्रे सादर करतील. याच टप्प्यावर एक महत्वाचा निर्णय समोर आला आहे. आणि तो पूर्णतः प्रथमच ऑनलाईन असणार. बघू या काय तो.

विद्यार्थी बदली मोड्युल

महाराष्ट्र राज्यातील इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शिक्षण संचालनालयाने (माध्यमिक व उच्च माध्यमिक) सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ‘ ११ वी ते ११वी ‘ आणि ‘११ वी ते १२ वी ‘ विद्यार्थी बदली मॉड्यूल (Student Transfer Module) २२ जून २०२६ पासून ऑनलाइन कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.

या नवीन संगणकीय प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना माध्यम, विषय, शाखा किंवा कनिष्ठ महाविद्यालय बदलणे अत्यंत सोपे होणार आहे. ही सुविधा २२ जून रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून प्रवेश प्रक्रियेच्या अधिकृत संकेतस्थळावर (education.maharashtra.gov.in) उपलब्ध होईल.

नवीन प्रणालीतील महत्त्वाचे बदल

शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, ऑनलाइन प्रणालीमध्ये खालील प्रमुख सुविधा देण्यात आल्या आहेत:
माध्यम, विषय आणि शाखा बदल: सन २०२५-२६ मध्ये ११ वीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आता ११ वीतून १२ वीत जाताना किंवा ११ वीतच असताना आपले शिक्षण माध्यम, विषय आणि ज्ञानशाखा (Stream) बदलण्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाईल. इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश असा.राज्य मंडळाव्यतिरिक्त (CBSE, ICSI इ.) इतर बोर्डातून किंवा परराज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेता येणार आहे. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ११ वीत आणि ११ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना १२ वीत प्रवेश निश्चित करण्यासाठी विशेष सुविधा दिली जाईल.

पालकांच्या बदलीमुळे

शासनाच्या नियमांनुसार, ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांची बदली झाली आहे, त्यांना बदलीच्या अधिकृत आदेशाच्या आधारे आपले कनिष्ठ महाविद्यालय (Junior College) बदलण्याची मुभा असेल.अपवादात्मक परिस्थितीतील बदल आहेच. वरील कारणांव्यतिरिक्त काही अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास, कनिष्ठ महाविद्यालय बदलण्यासाठी ठोस पुराव्यांसह अर्ज करावा लागेल. विद्यार्थी सध्या शिकत असलेल्या महाविद्यालयातूनच ऑनलाइन अर्ज करतील आणि आवश्यक पुरावे (Documents) अपलोड करतील. हे प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे मंजुरीसाठी सादर केले जातील.

बदलाचे कारण देणे अनिवार्य

या प्रणालीचा गैरवापर टाळण्यासाठी शिक्षण विभागाने एक महत्त्वाची अट ठेवली आहे. वरीलपैकी कोणताही बदल करताना प्रत्येक विद्यार्थ्याला ऑनलाइन अर्ज भरताना त्या बदलाचे ‘स्पष्ट कारण’ नमूद करणे बंधनकारक असणार आहे. ही संपूर्ण बदली प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने व्हावी यासाठी शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना (Guidelines) प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांनी आपल्या स्तरावरून संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांना याबाबत त्वरित सूचित करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.