नागपूर : महाराष्ट्र ही संताची भूमी म्हणून ओळखल्या जाते. अंधश्रधा, अनिष्ट प्रथांना त्यांनी विरोध करीत विज्ञानवादी बनण्याचा संदेश दिला. शिक्षणाचे महत्त्व सांगत प्रचार प्रसार केला, शिक्षणाचा टक्काही वाढत आहे. परंतु अंधश्रद्धा कमी होताना दिसत नाही. लोक आजही भोंदूबाबांना बळी पडत आहे. विशेष म्हणजे यात उच्च शिक्षित आणि स्वतःला विज्ञानवादी, तर्कवादी असलेल्यांचाही समावेश आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने जादूटोणा, चमत्काराच्या नावाखाली अनेक महिलांची फसवणूक करीत अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आल्याने राज्यासह देशात मोठी खळबळ उडाली.
नागपूर विभागात तब्बल ११६ गुन्हे
जादूटोण्याच्या नावाखाली होणारी फसवणूक, अत्याचार, अमानुष वर्तन, छळ आदी प्रकार रोखण्यासाठी सरकारने कायदा केला. परंतु त्यानंतर असे प्रकार होत असून नागरिक बळी पडत आहेत. गेल्या पाच वर्षात नागपूर विभागात जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत ११६ गुन्हे दाखल झाले असून सर्वाधिक ३६ गुन्हे हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. तर ‘स्मार्ट सिटी’ असलेल्या नागपूरवरही जादूटोणा झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात ३३ गुन्हे दाखल आहेत.
नागरिकांवर अंधश्रद्धेचा पगडा कायम
विशेष म्हणजे, विभागात नागपूर जिल्हा विज्ञान, तंत्रज्ञानाच्या पायऱ्या चढत मेडिकल, शैक्षणिक हब म्हणून नावारूपास येत आहे. मात्र अद्यापही नागरिकांवर अंधश्रद्धेचा पगडा कायम असल्याचे दिसून येते. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य करणारे नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर त्यांना श्रद्धांजली म्हणत तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने जादूटोणा विरोधी कायदा पारित केला. याच्या जनजागृतीसाठी सुरुवातीला व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.
सर्वाधिक गुन्हे कोणत्या जिल्ह्यात?
अंधश्रद्धा, नरबळी, अघोरी प्रथांना प्रतिबंध घालून भोंदूबाबांकडून होणारी नागरिकांची लूट, फसवणुकीला आळा घालण्याचे काम या कायद्याच्या माध्यमातून होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. परंतु ती होताना दिसत नाही. नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकाराने हा कायदा पुन्हा एकदा चर्चेत आला. गेल्या पाच वर्षांचा विचार केल्यास नागपूर विभागात जादूटोण्याचे ११६ गुन्हे दाखल झालेत. यातील पाच प्रकरणांचा न्यायालयात निपटारा झाला. हे गुन्हे फसवणूक, अत्याचार, छळासंदर्भातील असल्याचे सांगण्यात येते. मिळालेल्या माहितीनुसार सर्वाधिक ३६ गुन्हे चंद्रपुरात दाखल आहेत. त्यापाठोपाठ नागपूर जिल्ह्यांचा क्रमांक असून येथे ३३ गुन्हे दाखल आहेत. वर्ध्यात १०, भंडारा जिल्ह्यात १५, गडचिरोली जिल्ह्यात ११ व गोंदिया जिल्ह्यातही ११ प्रकरणांची नोंद आहे.
