अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने साजिद खान पठाण यांच्यावरच पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. अकोला पश्चिम मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. यामुळे नाराज झालेले काँग्रेसमधील इच्छुक युवा नेते डॉ. झिशान हुसेन यांनी अखेर ‘वंचित’ची वाट निवडली. वंचित आघाडीने त्यांना अकोला पश्चिममध्ये उमेदवारी जाहीर केली. काँग्रेस व भाजपमध्ये बंडखोरी झाल्याने येथे बहुरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी अत्यंत वेगाने राजकीय घडामोडी सुरू आहेत. काँग्रेसने सोमवारी रात्री जाहीर केलेल्या यादीत अकोला पश्चिम मतदारसंघातून साजिद खान पठाण यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात ज्येष्ठ नेते तथा दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांनी तब्बल २९ वर्षे भाजपचा झेंडा फडकवत ठेवला. विजयाची ‘डबल हॅट्ट्रिक’ साध्य करणाऱ्या दिवंगत शर्मा यांना २०१९ मध्ये काँग्रेसचे साजिद खान पठाण यांनी कडवी झुंज दिली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपची पीछेहाट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे अकोला पश्चिममध्ये काँग्रेसचा उत्साह चांगलाच वाढला आहे.
हेही वाचा >>> मोर्शीचा तिढा सुटला; काँग्रेसचे गिरीश कराळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार
२०१९ व त्यानंतर रद्द झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांना उमेदवारी दिली होती. आता काँग्रेसकडून लढण्यासाठी १८ जण इच्छुक होते. गंभीर गुन्ह्यांमध्ये पठाण यांचे नाव असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. अखेर काँग्रेसने पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांनाच अकोला पश्चिममधून उमेदवारी दिली. काँग्रेसच्या या निर्णयामुळे इतर इच्छुकांमध्ये नाराजी पसरली.
हेही वाचा >>> वर्धा : पहिल्या टप्प्यात एमएलसी व राष्ट्रीय अध्यक्षांची हमी, तरीही केचे नॉट रिचेबल
काँग्रेसचे माजी मंत्री अजहर हुसेन यांचे पुत्र तथा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. झिशान हुसेन यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडून निवडणूक लढण्यासाठी ‘वंचित’ची वाट निवडली. वंचित आघाडीने डॉ. हुसेन यांना अकोला पश्चिममधून उमेदवारीदेखील जाहीर केली. आता काँग्रेसला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काँग्रेसच्या सुनील धाबेकरांना ‘वंचित’ची कारंजातून उमेदवारी
वंचित बहुजन आघाडीने वाशीम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघातील उमेदवार बदलला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री दिवंगत बाबासाहेब धाबेकर यांचे पुत्र तथा काँग्रेस नेते सुनील धाबेकर हे सुद्धा उमेदवारीसाठी वंचित आघाडीत दाखल झाले. त्यामुळे वंचित आघाडीने कारंजामधून अगोदर जाहीर केलेली अभिजीत राठोड यांची उमेदवारी रद्द करून सुनील धाबेकर यांना संधी दिली आहे.